कोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल

कोरोना संशयित नवीन दोन रुग्ण दाखल

जिल्हा रुग्णालयातील कोरोना नियंत्रण कक्षात मंगळवारी मृत्यू झालेला रुग्ण आणि इतर संशयित सहा रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर या रुग्णालयात बुधवारी नवीन दोन संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यांच्या लाळीचे नमुने घेवून ते औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील १३ जण उपस्थित होते. ते जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांचीही वैद्यकीय तपासणी जिल्हा रूग्णालयात झाली आहे.

या रुग्णालयातील कोरोना नियंत्रण कक्षात चोपडा परिसरातील एका ५२ वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू मंगळवारी झाला. त्यास मधूमेहासह श्‍वास घेण्यास अधिक त्रास व्हायचा. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचा मृतदेह मंगळवारीच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलो.

या रुग्णालयात आतापर्यंत एकूण ७९ संशयित रुग्णांच्या लाळीचे नमुने घेण्यात आले. यातील ७४ रुग्णांचे नमुने निगेटीव्ह आले. दोन नमुने नाकारले आहेत. तर एका रुग्णाचा नमुना पॉझिटीव्ह आला आहे. या रुग्णास कोरोना नियंत्रण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर बुधवारी दाखल संशयित रुग्णांचा अहवाल गुरुवारी प्राप्त होण्याची शक्यता आहे.

स्क्रिनिंग ओपीडीत गर्दी

मुंबई, पुणे, सुरत किंवा इतर ठिकाणाहून आलेले विद्यार्थी, कारागीर, मजूर, विविध क्षेत्रातील व्यापारी, व्यावसिक आदी जिल्ह्यात आले आहेत. सुरक्षेेच्या दृष्टीने ते जिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाबतच्या स्क्रिनिंग ओपीडीत आरोग्य तपासणी करुन घेत आहे. या स्क्रिनिंग ओपीडीत बुधवारी १९६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या स्क्रिनिंग ओपीडीत अजूनही दररोज गर्दी होतच आहे.

होम क्वॉरंटाइनची सूचना
निजामुद्दीन येथील कार्यक्रमास जळगावातील सात, भुसावळमधील दोन जण आदींचा समावेश आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे लक्षण आढळून आले नाही. पण, त्यांना होम क्वॉरंटाइनची सूचना देण्यात आल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com