अ‍ॅडमिशन ऑफलाईनच!

0

अकरावी प्रवेश; ऑनलाईनला पुढील वर्षी मुहूर्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या वर्षी राज्यात शिक्षण विभागाने मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी महापालिका हद्दीत 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली होती. यावर्षी त्यात वाढ करण्यात येऊन अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक या ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने 11 वी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नगरला मात्र, यंदा ऑफलाईन पध्दतीनेच प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी ‘सार्वमत’शी बोलतांना दिली.
गेल्या वर्षीपासून 11 वी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने प्रयोगिक तत्त्वावर मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी महापालिका हद्दीत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली. पहिलेच वर्ष असल्याने ही प्रक्रिया राबवताना शासनाच्या परिपत्रकात काही किचकट अटी होत्या. यामुळे 11 वी प्रवेशाची प्रक्रिया या ठिकाणी सप्टेंबर महिन्यांपर्यंत लांबली.
मात्र, त्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकातील त्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत. यामुळे यंदा ऑनलाईन 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यंदापासून अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक या ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने 11 वी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
दोन टप्प्यात ही प्रवेश प्रक्रिया होणार असून 2 जूनपासून संबंधित कॉलेजमध्ये ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत देण्यात येणार आहे. नगर शहर आणि जिल्ह्यात मात्र 11 वी प्रवेश ऑफलाईन पध्दतीने होणार आहे. पुढील वर्षी ऑनलाईन प्रवेशासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे टेमकर यांनी सांगितले.

गेल्या वर्षी राज्यात मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी महापालिका हद्दीत ऑनलाईपध्दतीने 11 वी प्रवेश करण्यात आला होता. यंदा नाशिक, नागपुर, अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यात ऑनलाईन पध्दतीने 11 वी प्रवेश राबवण्यात येणार आहेत.
– दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक पुणे.

 12 वीनंतर नगरमधील महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयाना सॉफ्टवेअरची प्रतिक्षा आहे. पुढील आठवड्यात 12 वीचा निकाल लागणार असून 15 जूनपर्यंत दहावीचा निकाल अपेक्षीत आहे. सध्या सोशल मिडियावर दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखांची अफवा पसरवण्यात येत आहे. पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

*