Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

प्रशासनाकडून शहरातील पाणीपुरी ठेल्यांच्या तपासणीचे आदेश

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील सावेडी नाका परिसरात पाणीपुरीत अळ्या निघाल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या अन्न व औषध प्रशासनाने, सोमवारी सायंकाळी दोन पथकाद्वारे शहरातील पाणीपुरीच्या ठेल्यांची तपासणी केली. अन्न व औषध प्रशासनाची कारवाई होणार या भीतीने अनेक परप्रांतीयांनी पाणीपुरीचे ठेले बंद ठेवले होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाच्या हाती काहीच लागले नाही. परंतु काही ठिकाणी पाणीपुरीचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे रवाना करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या नगर कार्यालयाचे सहायक आयुक्त बालू ठाकूर यांनी दिली.

शहरात परप्रांतीयांकडून विकण्यात येणार्‍या पाणीपुरी या खाद्यपदार्थाच्या ठेल्यामध्ये अळ्या आढळून आल्या होत्या. त्याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने काल शहरातील पाणीपुरी विक्री करणार्‍या ठेल्यांची तपासणी केली. नालेगाव, नवीपेठ, दिल्ली दरवाजा परिसर, नीलक्रांती चौक परिसर, चौपाटी कारंजा या भागात पथकाने चौकशी केली.

कारवाई होण्याच्या भीतीने अनेकांनी ठेले लावलेच नाहीत.पथकाने वाडिया पार्क परिसरात एका ठिकाणी पाणीपुरी विक्रेचा ठेला दिसला. तिथे पथकाने तपासणी करून पाणीपुरीचे नमुने ताब्यात घेतले. हे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, असे पथकातील अन्न सुरक्षा निरीक्षक उमेश सूर्यवंशी यांनी सांगितले. पथकात अन्न सुरक्षा निरीक्षक आदिनाथ बाचकर, एस. एम. पवार व के. एस. शिंदे यांचा समावेश होता. कारवाईच्या भीतीने अनेकांनी ठेले लावले नाहीत. तरी देखील पथकांकडून दिवसाआड शहरात तपासणी मोहीम सुरू राहील, असे बालू ठाकूर यांनी सांगितले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!