आदिवासी आयुक्तालयाची वेबसाईट टाकणार कात

0

नाशिक, दि, 1 प्रतिनिधी – आदिवासी आयुक्तालयाची नवीन वेबसाईट लवकरच येणार असून
त्यामुळे विभागाची कामे करणे सोपे होणार आहे अनेक वर्षांपासून जुनी असलेली वेबसाईट बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असून येत्या आठ दिवसात नवीन वेबसाईटद्वारे सेवा प्रदान करणे सोपे होईल, अशी माहिती आदिवासी आयुक्तालयांतील सूत्रांनी दिली.

शासनाशी निगडित सर्वच विभागांची कामे ऑनलाईन होत असताना आता त्यात आदिवासी विकास विभागही अग्रेसर आहे. आदिवासी विकास विभागाची स्वतंत्र वेबसाईट असून या विभागाचे काम ज्या महत्त्वपूर्ण विभागाकडून चालते त्या आदिवासी आयुक्तालयाचीही स्वतंत्र वेबसाईट आहे.

मागील काही वर्षांपासून ही वेबसाईट अपडेट करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे वेबसाईट न दिसणे, जाम होणे याशिवाय नवीन बदल नसल्याने काम करतांना अडचणी येत होत्या त्यामुळे नवीन वेबसाईटचे काम होणे आवश्यक होते. त्यानुसार आता आयुक्तालयाने वेबसाईट अपडेट करण्याचे काम हाती घेतलेले असून आवश्यक ते नवीन बदल संबंधित वेबसाईटमध्ये करण्यात येणार आहेत.

त्यामुळे या विभागाशी निगडित अनेक उपविभागांना काम करणे सोपे होणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांशी निगडित कामेही जलदगतीने होण्यास मदत होणार आहे. या नव्या वेबसाईटमध्ये चित्र दालन, अत्यावश्यक माहिती, सेवा, शिक्षकांशी निगडित सेवा, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक माहिती, आयुक्तालयाची कार्यालये, उपकार्यालये, अधिकारी, कर्मचारी यांचे संपर्क आदी सर्वच माहिती टाकण्याचे काम सुरू आहे. येत्या आठवडाभरात ही वेबसाईट दिसू लागणार असल्याची माहिती अधिकार्‍यानी दिली.

LEAVE A REPLY

*