Type to search

Featured सार्वमत

ठाकरे साहेब, आमचा भुयारी मार्ग करा

Share

देहरे येथील विद्यार्थ्यांची विनवणी; मंत्र्यांकडून मार्गाची पाहणी

अहमदनगर (वार्ताहर) – भुयारी मार्गाचा आमचा प्रश्न आगोदर मार्गी लावा. रेल्वे रस्ता ओलांडताना आम्हांला जीव मुठीत धरून यावे लागते. तुम्ही मनावर घेतले तर 10 दिवसांत भुयारी मार्ग चालू होईल. काळजीने आमचा हा प्रश्न सोडवा, अशी विनवणी नवभारत विद्यालयातील विद्यार्थ्यानी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देहरे (ता. नगर) विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी भुयारी मार्गाचा प्रश्न ठाकरे यांच्याकडे मांडला. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांत जाऊन बसत त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थी म्हणाले, आमची शाळा रेल्वे लाईनच्या पलीकडे आहे. रेल्वे पूल ओलांडताना आम्हांला भीती वाटते. आमच्या सारखे पाहिलीपासून दहावीपर्यतचे मुले येथे शिक्षण घेतात.

मात्र रस्ता ओलांडताना आम्हाला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. रेल्वे लाईनजवळून नगर-मनमाड महामार्ग आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. या वाहनांची भीती वाटते. तुम्हीच आमचा जीव वाचवा, अशी विनवणी केली. भुयारी मार्गाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्‍वासन यावेळी ठाकरे यांनी दिले. ही चर्चा सुरू असतानाच रेल्वे येत असल्याने दिसल्याने मंत्री विजय शिवतारे यांनी लगेच याची पाहणी केली.

देहरे गाव नगर मनमाड रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूस विभागले गेले आहे. उड्डाणपूल झाल्यामुळे येथे असणारे रेल्वे फाटक बंद करण्यात आले. ग्रामस्थ उड्डाणपुलाचा वापर न करता जुन्या फाटकाजवळून जातात. ते धोकादायक आहे. अनेकदा अपघात झालेले आहेत. जवळूनच नगर मनमाड महामार्ग जातो. रेल्वे लाईन व राज्य मार्गाच्या खालून भुयारी मार्गाची ग्रामस्थांनी मागणी आहे. त्यासाठी अनेकदा आंदोलनही केले. महाराष्ट्र राज्य मार्ग 10च्या पश्चिम बाजूस सर्व जिल्हा परिषद शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत, बँका, विविध कार्यकारी सोसायटी, बाजारपेठ, स्मशानभूमी यासह पन्नास टक्के लोक वस्ती आहे. पूर्व बाजूने बस स्टॅण्ड, दूध डेअरी, हॉटेल व्यवसाय व पन्नास टक्के लोक वस्ती आहे.

रस्ता व रेल्वे लाईन ओलांडतांना आतापर्यंत अनेकांना प्राण गमावावा लागलेला आहे. तसेच काहींना अपंगत्व आले आहे. अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे व रेल्वे लाइनचे तार कंपाउंडचे काम चालू असल्यामुळे पूर्व व पश्चिम बाजूचा मार्ग पूर्ण बंद होण्याच्या मार्गावर आहे. 2008 पासून ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी व नगर-कोपरगाव महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदार संस्थेचे सुप्रीम परवेज व संबंधित यंत्रणेच्या अधिकार्‍यांबरोबर अऩेकदा चर्चा झाली. मात्र मार्ग निघालेला नाही. भुयारी मार्गाचे काम अपूर्णच आहे. या चर्चेवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जि. प. सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, शरद झोडगे, पंचायत समिती सभापती रामदास भोर, पं. स. सदस्य व्ही. डी. काळे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, सरपंच किसन धनवटे, लक्ष्मण धसाळ, स्वप्नील लांडगे, महेश काळे, विश्वास जाधव, प्राचार्य राजेंद्र लांडे, शिरीष टेकाडे, अशोक लष्कर, एस. एन. राशीनकर आदी उपस्थित होते.

ढोकी येथे पुलाचे उदघाटन
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पारनेर तालुक्यातील ढोकी येथील पुलाचे उदघाटन रविवारी रात्री उशिरा झाले. विधानसभेचे उपाध्यक्ष ना. विजय औटी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त ठाकरे यांची जिल्ह्यातील हा पहिला कार्यक्रम होता. ढोकी येथे येण्यासाठी त्यांना खुप उशीर झाला. रात्री उशिरा झालेल्या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी ना. औटी यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक केले. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली पारनेरचा विकास होईल अशी ग्वाही दिली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!