Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नवमहाराष्ट्र उभारण्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे

Share

सिन्नर /वार्ताहर

महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी शिवसेनेला राज्यात हक्काचे सरकार द्यायचे आहे. जनतेच्या मनातला नवा महाराष्ट्र उभारण्यासाठी शिवसेनेला आशीर्वाद द्या असे आवाहन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले.
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सिन्नर येथील मातोश्री नर्मदा लॉन्स वर आयोजित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माझी जन आशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी नाही. मला मुख्यमंत्री बनायचे म्हणून यात्रा मी काढली नाही तर लोकसभेच्या निवडणुकीत तुमच्याकडे मते मागायला आलो होतो.
आता आभार मानायला आलोय, आशीर्वाद घ्यायला आलोय असे सांगत ही यात्रा माझ्यासाठी तीर्थयात्रा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले. दोन महिन्यापूर्वी सिन्नरला लोकसभेच्या प्रचारासाठी आलो. तेव्हाची गर्दी पाहून भारावून गेलो होतो.
त्या सभेला लोकांचा असणारा प्रतिसाद माझ्यासाठी नव्हता तर तो शिवसेनेसाठी, आमदार राजाभाऊ वाजे व खासदार हेमंत गोडसे यांच्यासाठी होता. मी केवळ माध्यम असून लोकांचे खरे आशीर्वाद शिवसेनेला आहेत. आज शिवसेनेच्या विचारधारेशी  एकरूप झालेल्या मतदारांचे आशीर्वाद घ्यायला, त्यांचे आभार मानायला मी आलो आहे. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मी जातो. स्वागतासाठी मोठा जनसमुदाय जमतो. जनतेचे हेच प्रेम मला हवे आहे अशी साद आदित्य ठाकरे यांनी घातली.
निवडणूक येते आणि जाते. वेगवेगळ्या पक्षांच्या संघटनांचे विविधरंगी झेंडे या निवडणुकीत फडकतात.निवडणुकीतल्या यशापयशावर या पक्षांची व संघटनांची पुढील वाटचाल अवलंबून असते. मात्र शिवसेना  देशातला एकमेव असा पक्ष आहे की सत्तेत असो की नसो आमचा भगवा सदोदित फडकत असतो.
जनतेच्या हक्कांसाठी सतत रस्त्यावर उतरण्याची तयारी शिवसेनेची असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी जात-पात-धर्म भेदाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यायला हवे. दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी जनतेचे आशीर्वाद हवेत असे ते म्हणाले. नाशिकची जनता शिवसेनेसोबत आहे.
आदित्य ठाकरे नाशिकमध्ये आले आणि त्यांच्या सोबत पावसाची देखील आगमन झाले.हा शुभ शकुन असल्याचे सांगत राज्यमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धती बद्दल माहिती दिली. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता मंत्रीपदावर पोहोचतो हे केवळ शिवसेनेतच घडते असे सांगत ना. भुसे यांनी दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या सिन्नरची जनता आमदार वाजे यांच्या माध्यमातून शिवसेनेशी जोडली गेली असल्याचे नमूद केले. शिवसेनेच्या धोरणांना साजेशी अशीच राजाभाऊंची कार्यशैली असून 20 राजकारण व 80 टक्के समाजकारण या वृत्तीने त्यांचे काम सुरू आहे.
शिवसेनेला अभिप्रेत असणारे काम सिन्नर मध्ये सुरू असून पुढील काळात ते आणखी जोमाने सुरू राहील अशी ग्वाही आमदार भुसे यांनी दिली. उदय सांगळे यांनी शिवसेनेची तालुक्यातील जडणघडण व गेल्या पाच वर्षात सत्तेच्या माध्यमातून साधलेला विकास याबद्दल माहिती दिली. शिवसेना नेतृत्व व आमदार राजाभाऊ वाजे यांच्यावर विश्वास टाकत सिन्नरच्या जनतेने सत्ता दिली.  या सत्तेचा पुरेपूर वापर इथल्या जनतेच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, संजय बच्छाव, शिवसेना जिल्हाप्रमुख  विजय करंजकर, नाशिक महानगर प्रमुख अजय बोरस्ते, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, पालिका गटनेते हेमंत वाजे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, शहर प्रमुख गौरव घरटे यांच्यासह पक्षाच्या अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,  सिन्नर नगरपरिषदेचे नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते.
चित्रपटातील ॲम्बुलन्स आणि शिवसेना
माझा शिवसेनेशी संबंध तसा पूर्वीपासून नव्हता. समजायला लागले तेव्हा सिनेमात मारहाणीचे, दंगलीचे दृश्य आले की ॲम्बुलन्स धावायच्या आणि त्या ॲम्बुलन्स शिवसेनेच्या असायच्या. एवढीच काय ती शिवसेनेची ओळख होती. पुढे बाळासाहेब ठाकरेंच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेत समाजकारण करत गेलो.
पक्षासोबत काम करायची संधी आली तेव्हा बाळासाहेबांच्या कर्तुत्वाची ऊर्जा कामी आली. निस्वार्थपणे महाराष्ट्राच्या जनतेसाठी राजकारण करणारा पक्ष म्हणून शिवसेनेबद्दलचा आदर नेहमीच आपल्या मनात असल्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले. सिन्नरकर शिवसेनेसोबत राहतील याची ग्वाही देत आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबीयांची चौथी पिढी महाराष्ट्राच्या सेवेत असून महाराष्ट्राच्या उभारणीसाठी आदित्य ठाकरे नक्कीच योगदान देतील असा विश्वास आमदार वाजे यांनी व्यक्त केला.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!