Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आदित्य ठाकरेंच्या दौर्‍यावर तरूणतुर्कांचे वर्चस्व!

Share

ज्येष्ठांना आराम? । विधानसभेच्या तोंडावर जिल्ह्यातील हालचालींवर लक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी) – युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असला, तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या या दौर्‍याचा फायदा शिवसेनेला किती होईल, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. या दौर्‍यावर संघटनेतील तरुणतुर्कांचे वर्चस्व एकप्रकारे ज्येष्ठांना अप्रत्यक्ष संदेश ठरणार तर नाही, अशी चर्चा असताना सध्या पक्षवाढीसाठी प्रयत्नशील असलेली सेना जिल्ह्यात कोणावर जाळे फेकणार आणि कोण या जाळ्यात स्वत:हून उडी मारणार, याचा अंदाजही या दौर्‍यातून येण्याची शक्यता आहे.

जनआशिर्वाद यात्रेच्या नावाने आदित्य ठाकरे राज्यभर दौरा करत आहेत. पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवडणुकीपूर्वी राज्यभर दौरे असायचे, पण आता आदित्य ठाकरे पक्षातील कोणत्याही प्रमुख नेत्यांशिवया राज्यभर दौरे करण्यास निघाले आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केले, त्यांचे आभार व ज्यांनी मतदान केले नाही, त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगण्यात येत. तरी या दौर्‍याच्या नियोजनाच्या दौर्‍या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरूणांच्या हाती राहतील, याची जाणीवपूर्वक काळजी घेतल्याची चर्चा आहे.

या दौर्‍यावर युवा सेनच्या पदाधिकार्‍यांचा वावर अधिक राहील, असे दिसते. पारनेर येथे त्यांच्या उपस्थितीत पुलाचे उदघाटन करण्यात येणार आहे, तर नगर येथे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवकांशी ते संवाद साधणार आहेत. येथून पुढे श्रीरामपूर, शिर्डी येथे ते जाणार आहेत. दौरा नियोजनात स्थानिक पदाधिकार्‍यांना सक्रीय केले आहे.

शिवसेनेचे शनिवारपासून मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. त्यासाठी आणि शहरासह पारनेर, नगर तालुक्यासाठी स्वतंत्र संपर्कप्रमुख नेमलेल्या अश्‍विनी मते येथे आल्या आहेत. त्यांनीही आपल्या कार्यक्रमाची माहिती सांगताना आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍यावर फारसे भाष्य केले नाही. त्यामुळेच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याचे नियोजन करताना त्यापासून ज्येष्ठ दूर राहतील, अशी जाणीवपूर्वक काळजी घेतल्याचे दिसून येत आहे.

ज्येष्ठांना स्थान किती?
गावागावात शिवसेनेचे संघटन असले, तरी त्यावर अद्यापही ज्येष्ठ नेत्यांचेच वर्चस्व आहे. शिवसेनेची ओळख या नेत्यांच्या नावानेच आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणार्‍या आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍यात या ज्येष्ठांना किती स्थान मिळणार, याबाबत शिवसेनेत उत्सुकता आहे. आदित्य ठाकरेंच्या निमित्ताने शहरी आणि तरूण कार्यकर्त्यांची फळी अधिक सक्रीय करण्याचे प्रयत्न असल्याचे समजते.

विधानसभेच्या तोंडावर…
आदित्य ठाकरे यांच्या या दौर्‍याचा विधानसभा निवडणुकीसाठी किती फायदा होईल, याबाबत चर्चा सुरू आहे. भाजपाच्या वाढत्या ताकदीचा अप्रत्यक्ष परिणाम सेनेवरही जाणवतो. त्यामुळे संघटन मजबूत करण्यासाठी तरुणांना जोडण्यासोबत काही नेत्यांना गाळाला लावण्याची योजना असावी, अशीही चर्चा आहे. सेना नेते अनेकजण आमच्या संपर्कात असल्याचे सांगतात. त्यात नगर जिल्ह्यातील कोणी आहेत का? असतील तर ठाकरेंच्या दौर्‍यावर याबाबत काही शिजेल का, याचीही उत्सुकता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!