Type to search

Featured सार्वमत

आत्ताच पेपर फोडणार नाही…

Share

निवडणूक लढविणार का, या प्रश्‍नावर आदित्य ठाकरे यांचे उत्तर

अहमदनगर (प्रतिनिधी) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढविली नाही. ठाकरे कुटुंबाची ही परंपरा तुम्ही खंडित करणार का, विधानसभेची निवडणूक तुम्ही लढविणार का, असा अचानक प्रश्‍न आला आणि काही काळ आदित्य ठाकरे स्तब्ध झाले. मात्र लगेच भानावर येत ‘आत्ताच पेपर फोडणार नाही’ असे सांगत बाजू सावरून घेतली. तसेच लोक काय सांगतील, त्याप्रमाणे निर्णय घेईल, असे सांगून वेळ मारून नेली. यापुढे राजकीय प्रश्न विचारू नका, असे आवाहन करण्यासही ते विसरले नाहीत.

जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ठाकरे यांनी सोमवारी येथील युवक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थी विविध प्रश्‍न विचारून त्यांच्याकडून उत्तरे घेतली. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे नेतेही तसे बोलत आहेत. हाच धागा पकडत भावेश आनेचा या विद्यार्थ्याने वरील प्रश्‍न टाकला. या प्रश्‍नाने आदित्य ठाकरे काही वेळ शांत झाले. त्यावेळी सभागृहातून ‘सीएम, सीएम’ अशा घोषणा सुरू झाल्या. त्याचा धागा पकडत ठाकरे यांनी उपस्थितांना ‘तुम्हाला काय वाटते’ असे विचारत ‘मी आत्ताच पेपर फोडणार नाही’ असे सांगितले.

जन आशिर्वाद यात्रा निवडणुकीच्या प्रचारासाठी नसून, विद्यार्थी, तरूण आणि शेतकर्‍यांच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आहे, असे सांगत लोक जे ठरवतील, त्यानुसार निर्णय घेईल, असे सांगितले. केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडाबाबत कल्याणी सातपुते यांनी प्रश्न उपस्थित करून यातील आरोपी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप आणि भाजपचे आ. शिवाजी कर्डिले यांचे नाव घेत, राजकारण्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला. ‘असे प्रकार अत्यंतत चुकीचे असून राजकारण देखील आता बदलत आहे. मात्र काही लोकांचा अजूनही गुंडगिरी, दागागिरी करून राजकारण करण्याचा प्रयत्न असल्याने अशा लोकांबाबत जनतेने आणि युवकांनीच विचार केला पाहिजे’, असे ठाकरे म्हणाले.

महिला संरक्षणाचे महत्त्वही त्यांनी विषद करत आपण मुलींना राज्यभर स्वसंरक्षणाचे धडे देणार असल्याचे सांगितले. तसेच मुलांनी मुलींशी कसे वागावे, यासाठी शालेय अभ्यासक्रमातच शिकवण असावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचेही सांगितले. शेतकरी आत्महत्या, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात येणार्या अडचणी, दिव्यांगांच्या धोरणात मुकबधीर विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय, एमआयडीसीमध्ये उद्योग आणणे, महिलांना विधानसभेत पन्नास टक्के आरक्षण आदी विषयांवर यावेळी प्रश्न विचारण्यात आले. व्यासपीठावर मनसोक्त फिरत त्यांनी विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

प्रशांत किशोर टीमचे नियोजन
‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाच्या नियोजनाची पूर्ण जबाबदारी 2014 साली लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी काम करणार्‍या आणि नंतर बिहारच्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलासाठी काम करणार्‍या प्रशांत किशोर यांच्या एजन्सीकडे होती. माउली सभागृहात आदित्य ठाकरे कोणत्या बाजूने येणार, माध्यमांशी कधी बोलणार आदी बाबतीतले नियोजन पूर्णतः याच एजन्सीकडे होते. तसेच एजन्सीचे प्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी आणि युवकांशी वेळोवेळी संवाद साधत होते.

साठ वर्षांच्या आजीला न्याय देणार
शिक्षण क्षेत्रात अर्धवेळ काम करून व नंतर पाच वर्षे पुर्णवेळ काम करून निवृत्त झालेल्या एका आजीने निवृत्तीवेतनाचा प्रश्न उपस्थित करून यासाठी मंत्रालयात पन्नास साठ चकरा झाल्याने आता मी कंटाळले असल्याचे सांगितले. त्यावर आता तुम्ही मंत्रालयात येऊ नका, आज शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा करून संध्याकाळपर्यंत तुमचा प्रश्न मार्गी लावतो, असे सांगत आजीकडून त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला.

राज ठाकरे यांच्याकडून काय शिकले?
राज ठाकरे यांच्याकडून तुम्ही राजकारणात कोणता धडा घेतला, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारा असता, ‘मी लोकांकडून धडे घेत असतो’ असे आदित्य यांनी लगेच उत्तर दिले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाबहेब ठाकरे यांच्याकडून ‘जे करायचे ते विचारपूर्वक कर’ हा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘जे करायचे ते प्रामाणिकपणे कर’ असे दोन महत्त्वाचे धडे घेतल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तसेच राजकारण करण्यासाठी कोणाकडून धडे घ्यायचे नसतात, तर लोकांकडून खूप काही शिकायचे असते, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री पदाबाबत मौन
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतानाही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मौन ठेवणेच पसंत केले. सतत प्रश्‍न विचारल्यावर ते म्हणाले, मी जनतेचा आवाज मानतो. माझ्याकडे जे प्रश्न येतात. ते सोडवायचे कसे, यासाठी मी प्रयत्न करतो. मी महाराष्ट्राची सेवा करत आहे. कोणतीही जबाबदारी घेईल, कोणते पद घेईल, यावर मी बोलणार नाही. ही वेळ बोलण्याची नाही, तर काम करण्याची आहे. निवडणुकीला अजून वेळ असल्याने अगोदर काम महत्त्वाचे आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!