Type to search

Featured सार्वमत

आढळा धरणाच्या पाणलोटाला पावसाची प्रतीक्षा

Share

धरणात केवळ 13 टक्के पाणीसाठा शिल्लक

विरगाव (वार्ताहर) – रोहिणी कोरड्याठाक गेल्या आणि मृगाचा पुर्वार्ध संपला तरीही पावसाचा तपास नसल्याने अकोले तालुक्यातील देवठाणच्या आढळा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला पावसाची तीव्र ओढ लागली आहे. 1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेच्या या धरणात आजमितीला केवळ 13 टक्के म्हणजे 136 दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. अजूनही काही दिवस पावसाने ओढ दिल्यास कधी नव्हे इतक्या भीषण पाणीटंचाईत अधिक भर पडेल. धरणाचा मृतसाठा 85 दलघफू असल्याने केवळ 51 दलघफू पाणीसाठा शिल्लक दिसतो. धरणातील अनेक दिवसांचा साठलेला गाळ गृहित धरता कदाचित आजच धरणाने मृतसाठ्याची पातळी गाठलेली असेल.

मागच्या वर्षी धरण पूर्णक्षमतेने न भरल्याने सन 2018 चा खरीप आणि सन 2019 चा रब्बी आढळेच्या लाभक्षेत्रात पिकलाच नाही. पर्यायाने बाजरी आणि गहू मोठ्या प्रमाणावर पिकविणारे लाभक्षेत्रात अन्नधान्यच न पिकल्याने आजघडीला या दोन्ही धान्यांच्या किमती 3 हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान आहेत. गहू आणि बाजरीची किंमत इतकी कधीच भडकलेली नव्हती. भूगर्भाची पाणीपातळी कमालीची खालावली असून पाणलोट आणि लाभक्षेत्राचा भूजलस्तर जवळपास कोरडाठाक आहे. मागील वर्षी याच दिवशी पाणीसाठा 180 दलघफू होता. त्यावेळी आज भेडसावत असणारी पिण्याच्या पाण्याच्या चिंतेची तीव्रता थोडी कमी होती. आज मात्र भर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिण्याचे पाणीही पूर्ण क्षमतेने मिळणे मुश्किल आहे.

माणसांचे हाल तर आहेच, पशुधनाचे हाल मात्र त्याहून अधिक आहेत. जनावरांना पिण्याचे पाणी आता मिळणे मुश्किल झाले आहे. रोहिणीचा पाया आणि मृगाची बरसात झाली असती तर निदान डोंगरदर्‍यात हिरवाई फुलली असती. जनावरांच्या चार्‍याला थोडा आधार दिसला असता. आज मात्र या परिसरातील सह्याद्रीच्या डोंगररांगा पूर्णपणे उजाड आणि काळ्याकभिन्न दिसत आहेत. रोजचा दिवस सारखाच उगवत असल्याने पाण्याच्या चिंतेने माणसांहित जनावरांच्या पोटात भितीचा मोठा खड्डा पडतो. निदान मृगाच्या उत्तरार्धात तरी पावसाचे आगमन आढळेत बहारदार होईल अशी अपेक्षा आहे. पाऊस आणखी लांबल्यास पावसाचे नाही पण भविष्याच्या चिंतेचे ढग मात्र अधिकच गडद होतील.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!