Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

वकील संभाजी ताकेंसह दोघांची कुर्‍हाडीने वार करून हत्या

Share

नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील घटनाशेतजमिनीच्या वादाचे कारणपुतण्याला अटक

नेवासा/तेलकुडगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे शेतजमिनीच्या वादातून नगर जिल्हा न्यायालयातील वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. संभाजीराव राजाराम ताके व त्यांच्यासोबत असलेल्या संतोष सुंदरराव घुणे (रा. बहिरवाडी ता.नेवासा) या दोघांची कुर्‍हाडीने वार करून हत्या झाल्याची घटना बुधवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून ते नगरला नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या घटनेने कुकाणा परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी, मूळचे नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील अ‍ॅड. संभाजी राजाराम ताके (वय 57) हे नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे राहत असून ते नगरच्या जिल्हा न्यायालयात वकिली करत होते. त्यांची जेऊर हैबती येथे वडिलोपार्जित शेती आहे. ही शेती त्यांचे जेऊर हैबती येथे राहत असलेले भाऊ शिवाजी ताके हे कसत होते. मागील 20 वर्षांपासून ते शिवाजी ताके यांना जमिनीची वाटणी करून मागत होते. त्यांच्या या जमिनीच्या वादाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे समजते. अ‍ॅड. संभाजी ताके बुधवारी महात्मा गांधी जयंतीची सुट्टी असल्याने गावाकडे जेऊर हैबतीला आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा सहकारी संतोष सुंदरराव घुणे (रा. बहिरवाडी ता. नेवासा) तसेच काही मित्रही होते. गावातील नवरात्र उत्सवानिमित्त गावातील रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी ते आले होते.

त्यांचे जेऊर हैबती येथे आल्यानंतर वाद झाले असावेत. दुपारी दोनच्या सुमारास संभाजी ताके व संतोष सुंदरराव घुणे (वय 30) यांची कुर्‍हाडीने वार करुन हत्या करण्यात आली. सदरील घटना घडल्यावर संभाजी ताके यांचा पुतण्या आरोपी शरद शिवाजी ताके याने कुकाणा दूरक्षेत्राला घटनेची माहिती दिली.

घटनास्थळी कुर्‍हाड, लाकडी दांडके, मोबाईल तसेच डस्टर कंपनीची कार (एमएच 16 बीवाय 8084) आढळून आल्याने जप्त करण्यात आले आहे. आरोपी पुतण्या शरद शिवाजी ताके (वय 36) याला नेवासा पोलीस ठाण्यात हजर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मयताबरोबर अन्य दोन मित्र होते. त्यांच्यावरही जबरी वार झाले आहेत. अशोक विष्णू शिंदे (वय.42) रा. नवनागापूर एमआयडी आणि रविंद्र शंकर गोसावी (रा. भगवानबाबा चौक, सावेडी अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले आहे.

घटनेच्या ठिकाणी दोन मृतदेह आढळून आले. या दोन्ही मयताचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासा ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाण्यात आले. त्यानंतर ते पुन्हा फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. जमिनीवरुन दोघा भावांमध्ये अनेक वेळा किरकोळ वाद झाल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक चौकशीत मिळाली आहे. घटनेची माहिती कळताच शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, नेवाशाचे पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, कुकाणा बीटचे पोलीस नाईक संतोष फलके यांनी फौजफाट्यासाह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदरील घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

जेऊर हैबती येथील हत्या प्रकरणात सध्या एका आरोपीस अटक केली असून तपास पथक पुढील पुरावे गोळा करत आहे.
– दिपाली काळे अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर

जखमींवर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुुरू आहेत. त्यांचे जबाब घेण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक पी.के.शेवाळे आणि हवालदार संतोष फलके आले होते. मात्र, जखमींची स्थिती जबाब देण्यासारखी नसल्याने जबाब घेता आले नाहीत. तत्पूर्वी नगरच्या तोफखाना पोलिसांनी जबाब घेण्याचा प्रयत्न केला होता.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!