शिमगा म्हटला की, मज्जा काही औरच असते : ऋचा इनामदार

0

होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी लोक आपले जुने सर्व राग, रोष विसरून एकमेकांना रंग लावतात आणि पुन्हा नव्याने सुरुवात करतात, जुन्या आणि अमंगल गोष्टीचा होळी मध्ये जाळून नाश करायचा, आणि नव्या चांगल्या गोष्टींचा स्विकार करायचा असा होळी साजरी करण्यामागचा खरा विचार आहे. मी दरवर्षी हा विचार अंमलात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.

होळीच्या विविध रंगांप्रमाणे रंगबेरंगी आयुष्य मी जगत असते. मला हा सण प्रचंड आवडतो. लहानपणी मी ह्या सणाची अगदी आतुरतेने वाट बघायचो. दरवर्षी आम्ही सर्व नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शेजारचे लोक एकत्र येऊन हा रंगोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करतो.

मला रंग आणि जास्तकरून पाण्याचे खूपच आकर्षण आहे. होळी बद्दल मी काय आणि किती सांगू असे होते. खूप अविस्मरणीय आठवणी मला या सणाने दिल्या आहेत. आम्ही राहायचो तिथे दोन बिल्डिंग होत्या. त्यामुळे आमची दुसऱ्या बिल्डिंगच्या मुलांसोबत स्पर्धा असायची.

आम्ही मुलं होलिका दहन झाले की रात्री घरी येऊन लगेच दुसऱ्या दिवसाची तयारी करायची. फुग्यांमध्ये पाणी भरून ठेवणे, रंग काढून ठेवणे. ते सर्व सामान बिल्डिंगच्या एका छुप्या ठिकाणी लपवणे अशी अनेक काम आम्ही त्या रात्री पूर्ण करायचो. अगदी आतुरतेने सकाळ होण्याची वाट पाहायचो.

इतका उत्साह असायचा की, त्यामुळे झोप पण यायची नाही. सकाळ झाली की पटकन खाली जायचे आणि खेळायला सुरुवात करायचो. मध्येच जी लोक रंग खेळायला खाली यायची नाही त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना बोलवायचो. तेव्हा मग वेगवेगळे पदार्थ आम्हाला खायला मिळायचे.

खेळून झाल्यावर आमची डबा पार्टी व्हायची. मग, दुपारची वामकुक्षी घ्यायची आणि पुन्हा खेळायला सुरुवात. असा आमचा होळीचा दिवस आम्ही धुमधडाक्यात आणि प्रचंड दंगा मस्ती करून घालवायचो. सर्वाना होळीच्या खूप शुभेच्छा. होळी खेळताना कोरड्या रंगाचा वापर जास्त आणि पाण्याचा वापर कमी करा.

LEAVE A REPLY

*