‘डॉक्टर डॉन’मधून पाहायला मिळणार रोहिणी हट्टंगडी यांचा एनर्जेटिक परफॉर्मन्स!

‘डॉक्टर डॉन’मधून पाहायला मिळणार रोहिणी हट्टंगडी यांचा एनर्जेटिक परफॉर्मन्स!

‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील सासू असो, किंवा ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील आई-आजी; रोहिणी हट्टंगडी या नावाची जादू आजही कायम आहे. वयाच्या ६८व्या वर्षी सुद्धा त्यांची एनर्जी जबरदस्त आहे. ‘झी युवा’ वाहिनीवर सुरू होत असलेल्या ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून त्या छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. या वयातही जबरदस्त एनर्जी असणाऱ्या या अभिनेत्रीशी मारलेल्या गप्पा.

१. या आधी तुम्ही साकारलेल्या भूमिका आणि ‘डॉक्टर डॉन’मधील भूमिका यांत नेमका काय फरक आहे?

‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत मी साकारत असलेली भूमिका सुद्धा आजीचीच आहे. पण, आजवर मी साकारलेली आजी आणि ही आजी यात फरक आहे. ‘डॉक्टर डॉन’मधील आजी एकदम डॅशिंग आणि बिनधास्त आहे. ही आजी, आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घटनांची मजा घ्यावी, आयुष्य झकास पद्धतीने जगावं अशा विचारसरणीची आहे.

२. बरीच वर्षे, तुम्ही मनोरंजन विश्वात काम करत आहात. या वयात सुद्धा तुम्ही खूप एनर्जेटिक आहात. याविषयी काय सांगाल?

या भूमिकेतील आजी जर तुम्ही पाहिलीत, तर तुमच्या लक्षात येईल, की ती एनर्जीच्या बाबतीत खूपच सॉलिड आहे. अशी भूमिका साकारायची असेल, तर अभिनेत्री म्हणून मला स्वतःला सुद्धा एनेर्जेटिक असणं गरजेचं आहे. आपल्या आवडीचं कुठलंही काम आपण करत असू, तर आपल्याला थकवा जाणवत नाही. माझं अभिनयाच्या बाबतीत तसंच होतं. स्वतःला कामामध्ये झोकून दिलं, की थकवा, वय वगैरे बाबी विसरायला होतात. माझ्या एनर्जीचं गमक विचाराल, तर ‘आवडीचं काम करताना इतर सर्व गोष्टींचा विसर पडणं’, हेच आहे.

३. ही भूमिका स्वीकारण्यामागचं नेमकं कारण काय?

ही भूमिका विनोदी धाटणीची आहे. ‘झी’ सोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच छान असतो. ही भूमिका मला आवडली, हेदेखील भूमिका स्वीकारण्याचं एक कारण होतंच. या मालिकेमुळे ओळखीच्या लोकांसोबत काम करण्याची संधी सुद्धा  मिळाली. त्यांच्या मस्तीत सहभागी होण्याची संधी यामुळे मिळणार आहे.

४. बऱ्याच कालावधीनंतर तुम्ही श्वेता शिंदेसह काम करत आहात. त्याबद्दलच्या भावना काय आहेत?

‘चार दिवस सासूचे’ या मालिकेत मी श्वेता शिंदे सोबत काम केलं होतं. पण, आमचे एकत्र सीन्स फार कमी होते. ‘डॉक्टर डॉन’च्या निमित्ताने पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. इतक्या वर्षांत काम करण्याची पद्धत सुद्धा काही प्रमाणात बदललेली असणार. मधल्या काळात श्वेताने, निर्माती म्हणूनही काम केलेले आहे. त्या अनुभवाचा फायदा तिला झालेला आहे, हे तिच्या कामातून लक्षात येत आहे.

५. सहकलाकारांसोबतच्या तुमच्या नात्याविषयी काय सांगाल?

सहकलाकारांविषयी बोलायचं झालं, तर या कलाकारांसोबत काम करण्याचा योग अद्याप फारसा आलेला नाही. देवदत्त सोबत एकदा काम केलेले आहे. या मालिकेच्या निमित्ताने आम्ही सगळेजण भरपूर धमाल आणि मजा करू यात शंका नाही. ‘डॉक्टर डॉन’ ही मालिका, ‘झी युवा’ वाहिनीवर १२ तारखेपासून सुरू होत आहे. मनोरंजनाचा डोस ठरणार असलेली ही मालिका, सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता पाहता येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com