Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

तुमच्या कारखान्यांसाठी इतरांना उपाशी मारता काय?

Share

साकळाईप्रश्नी अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा सवाल

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाणी शिल्लक नाही म्हणजे काय? मोठ्या पुढार्‍यांचे कारखाने चालण्यासाठी तुम्ही दुष्काळी भागातील गोरगरीब जनतेला उपाशी मारणार काय? असा सवाल उपस्थित करत अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी पाणी शिल्लक नाही अशा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. दुष्काळी जनता उपाशी मरताना बघवत नाही, त्यामुळे त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी तुम्ही मला मरताना पहा असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तालुक्यातील सारोळा कासार येथे आयोजित जनजागृती सभेत अभिनेत्री सय्यद बोलत होत्या. नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांसाठी ठरणार्‍या साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी अभिनेत्री सय्यद यांनी जनआंदोलनाचे हत्यार उपसले आहे. क्रांतीदिनी (दि.9 ऑगस्ट) जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करण्याचे जाहीर केले आहे. या उपोषणाला मोठ्या जनआंदोलनाचे स्वरूप येऊन राज्य सरकारवर दबाव येण्यासाठी त्यांनी शनिवार (दि.20) पासून गावोगावी जनजागृती दौरा सुरू केला आहे.

रविवारी (दि.21) खडकी, सारोळा कासार, वडगाव तांदळी, गुणवडी, रुई छत्तीसी या गावांत त्यांनी दौरा केला. सारोळा कासार येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच भानुदास धामणे होते, यावेळी शिक्षकनेते संजय धामणे, शिवसंग्राम पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कृषिराज टकले, ‘साकळाई’ उपसा जलसिंचन योजना कृती समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब नलगे, बाळासाहेब लंभाटे, नारायण रोडे, सुभाष गागरे, सूर्यभान कोतकर, राजेंद्र कडूस, सुभाष धामणे, संजय पाटील आदींसह कृती समितीचे सदस्य, विविध गावांमधील नागरिक उपस्थित होते.

साकळाई उपसा जलसिंचन योजना कृती समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे म्हणाले, 27 जुलैपर्यंत गावोगावी जनजागृती सभा होणार आहेत. दीपालीताई यांचे उपोषण सुरू झाल्यानंतर 10 ऑगस्टपासून ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलने सुरू होतील या आंदोलनांमध्ये राज्यातील वारकरी संप्रदायातील 100 कीर्तनकार रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!