भ्रष्टाचारमुक्त पोलीसदलावर भर नवनियुक्त पोलीस अधीक्षक संजय दराडे यांची ग्वाही

0

नाशिक | दि. १३ प्रतिनिधी- जिल्हा ग्रामिण पोलीस दल हे भ्रष्टाचारमुक्त करून सर्व पोलीस ठाण्यांचे कामकाज पारदर्शक करण्यात येणार आहे. यापुढे पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यालयात नव्हे तर नागरीकांना रस्त्यावर दिसतील यासर्वाद्वारे प्रत्येक नागरीकाला पोलीसांकडून न्याय मिळतोय ही भावना वाढविण्यावर आपला भर असणार असल्याचे जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनीसांगीतले.

ग्रामिण पोलीस मुख्यालयाच्या आडगाव कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्याकडून आज सकाळी ११ वाजता संजय दराडे यांनी पदभार स्विकारला. यानंतर सायंकाळी ते पत्रकारांशी बोलत होते.

दराडे म्हणाले, आपण लाचलूचपत प्रतिबंधक विभागात यापुर्वी कार्यरत होतो. या दरम्यान पैशांच्या अभिलाषेसाठी सामान्य नागरीकांची कशा प्रकारे पिळवणुक केली जाते. त्यांना कसे लूबडले जाते याचा आपला जवळून अभ्यास झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात नागरीकांची अडवणुक झालेली व त्यांच्याकडून कोणी पैसे उकळलेले मला चालणार नाही.

नागरीकांनी अशा तक्रारी थेट आपल्याकडे कराव्यात अशा पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांवर आपण कडक कारवाई करणार आहोत. प्रत्येक नागरीकाला प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍याकडून न्याय मिळतोय ही भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बदलत्या काळानुसार पोलीसींगमध्ये बदल होणे गरजेचे आहे.

आपण प्रत्येक पोलीस ठाण्यातील कामकाजाची पद्धती बदलून अधिकाधीक नागरीकांना सेवा मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक पोलीस ठाण्यांमधील जास्त गुन्ह्यांची संख्या पाहूण त्यांचा अभ्यास करून त्यावरील उपायोजनांवर भर देण्यात येणार आहे.  जिल्ह्याच्या ग्रामिण भागात दरोडा, लूट, फसवणुकी अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी भर देण्यात येणार आहे.

त्या त्या पोलीस ठाण्यांची गस्ती पथके, दरोडा प्रतिबंधक पथक, निर्भया पथक या सर्व पथकांच्या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येऊन त्यांच्यावर वरिष्ठांचे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या अंतर्गत टॉप २० गुन्हेगारांच्या याद्या बनविण्यास सांगण्यात आल्या आहेत.

त्यांच्या पुन्हा चौकशा व बारकाईने अभ्यास करून अशांवर मोक्का, एमपीआयडी तसेच इतर मोठ्या प्रतिबंधात्मक कारवायांवर भर देण्यात येणार आहे. यासह यापुर्वी तंटामुक्त, मोहल्ला कमिटी, पोलीस मित्र, ग्रामसुरक्षा दल अशा सर्व समित्यांचा आढावा घेऊन त्या अधिक सक्रिय करण्यात येणार आहेत.

हे करत असताना जिल्हा पोलीस प्रशासनाचा प्रमुख म्हणून माझे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या अडचणी, प्रश्‍न सोडविण्यावरही आपला भर राहिल. त्यांच्या अस्थापना, रजा, आरोग्य, निवासस्थाने, त्यांच्या मुलांचे शिक्षण, रोजगार यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत.

नाशिककरांंच्या अपेक्षांना खरा उतरणार
मी नाशिककर आहे. यामुळे आपोआपच सर्व नाशिककरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नाशिकचाच असल्याने येथील वातावरण, कृषी प्रधानता, ग्रामिण जीवन, भौगोलिक स्थिती, नागरीकांच्या मानसिकता यांचा माझा अभ्यास आहे. यासह अधिक गाठीभेटींवर भर देऊन नागरीक व पोलीसांमधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व नाशिककरांनी माझ्याकडून केलेल्या अपेक्षांना मी खरा उतरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी दराडे यांनी सागीतले.

स्वतंत्र सोशल मिडिया सेल
व्हॉटसऍप, फेसबुक, ट्विटर अशा सोशल मिडियावर युथचा सहभाग मोठा आहे. शेतकरी आंदोलन तसेच यापुर्वी दंगलीतही याचा मोठा वापर झाला. हे टाळण्यासाठी स्वतंत्र मिडिया सेल सुरू करण्यात येऊन युथची जागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच याद्वारे सर्व अधिकार्‍यांचे क्रमांक, व्हॉटसऍप नंबर जाहिर करण्यात येणार असून नागरीकांना कुठेही अवैध धंदे, गैर प्रकार, अन्याय, अत्याचार, वाहतुक, चुकत असलेले पोलीस, लाचेची मागणी होत असेल अशा वेळी व्हीडिओ अथवा त्याचे छायाचित्र पाठविल्यास तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत. यासाठी संजय दराडे – ९८२३१३३३९१० या क्रमांकावरही नागरीकांनी केव्हाही संपर्क करावा असे आवाहन दराडे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*