Type to search

Featured सार्वमत

अकोलेत 3 मजुरांचा तर श्रीगोंद्यात मायलेकीचा बुडून मृत्यू

Share

विहिरीचे खोदकाम करताना क्रेन तुटल्याने दुर्दैवी घटना 

अकोले (प्रतिनिधी)- क्रेनचा वायर रोप तुटून विहिरीत पडल्याने तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील देवठाण शिवारात काल सोमवारी दुपारी घडली. या अपघाती मृत्यूबद्दल आढळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांत बाळासाहेब दत्तात्रय शेळके(वय-40,रा.देवठाण ),गणेश दत्तू कदम(वय-30,रा.हिवरगाव आंबरे,ता.अकोले) व नवनाथ गोविंद शिंदे(वय-40,रा.वडगाव लांडगा,ता.संगमनेर,हल्ली रा.हिवरगाव आंबरे,ता.अकोले)यांचा समावेश आहे. देवठाण शिवारात रावसाहेब दगडू जोर्वेकर यांच्या विहीरीचे खोदकाम सुरू आहे. यातील मयत हे विहिरीत कामावर होते. दुपारच्या सुट्टीनंतर क्रेनमध्ये बसून विहिरीत उतरत होते. अचानक क्रेनच्या माडीचा रोप तुटला.त्यामुळे ते विहिरीच्या तळाला पडून जबर दुखापत होऊन मयत झाले. या अपघातात बाळासाहेब शेळके व गणेश कदम यांचा जागीच मृत्यू झाला तर नवनाथ शिंदे यांना उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुभाष रामहारी जोर्वेकर यांचे शेत गट नं.376 मधील विहीरीत ही घटना घडली.

मयत यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुभाष जोर्वेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नं.51/19,सी आर पी सी 174 प्रमाणे या घटनेची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बन्सी टोपले हे करीत आहेत. यातील मयत बाळासाहेब शेळके हा पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके यांचा चुलत भाऊ आहे.मयत बाळासाहेब शेळके यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.देवठाण येथे रात्री त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील मयत गणेश कदम व नवनाथ शिंदे हे दोघे मेव्हणे आहेत. त्यामुळे या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

कर्जत पाठोपाठ पाणी टंचाईने घेतले बळी

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- कर्जतमधील घुमरी येथील शेततळ्यात आई व दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील शेततळ्यात पाणी काढताना पडून कमल बापू पानसरे, (वय 36,)व त्यांची मुलगी वर्षा बापू पानसरे (वय 16) या मायलेकीचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.घारगाव येथील घोटवी रोड वर बापू बाळासाहेब पानसरे यांची शेतजमीन असून त्यात शेतीला पाणी देण्यासाठी मोठे शेततळे बनविले आहे. काल सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कमल बापू पानसरे व त्यांची मुलगी वर्षा बापू पानसरे या दोघी मायलेकी गुरे आणि शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी शेत तळ्यावर गेल्या असता पाणी काढताना पाय घसरून तळ्यात पडल्या. दोघींपैकी एक पहिल्यादा पाय घसरून शे तळ्यात पडली असावी आणि वाचवण्यासाठी उडी मारल्याने एकीचा मृत्यू झाला असावा. शेततळ्यात सुमारे 15-20 फूट खोल पाणी असल्याने व त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या ठिकाणी कोणीही नसल्यामुळे त्यांना कोणीही वाचवू शकले नाही. त्या घरी लवकर न आल्याने कमल यांचे सासरे बाळासाहेब पानसरे हे त्यांना पाहण्यासाठी शेततळ्यावर गेले असता त्यांना शेततळ्यात मायलेकी पडल्याचे समजले. मग त्यांनी आरडाओरडा करत शेजार्‍यांना बोलावून घेतले. याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये खबर देण्यात येऊन मयलेकीचा मृतदेह बाहेर काढण्यात येऊन श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. वर्षा पानसरे हिला नुकत्याच झालेल्या एसएससी परीक्षेत ती 75 टक्के गुण मिळवून पास झाली होती. परंतु तिचे पुढील शिक्षण घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!