नेवासाफाटा येथील राजमुद्रा चौकातील सुशोभिकरण ओट्यावर ट्रक घुसला

0
नेवासा (तालुका प्रतिनिधी)- नगर-औरंगाबाद राज्य महामार्गावरील शेवगाव रस्त्यावरील राजमुद्रा चौकात शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने चौकातील सुशोभीकरण करण्यात आलेल्या ओट्यावर ट्रक घुसला. यामध्ये या सुशोभिकरण करण्यात आलेल्या ओट्याचे मोठे नुकसान झालेले आहे. ही घटना पहाटेच्या वेळी घडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. हा अपघात पाहिल्यानंतर जुना अपघात अनेकांच्या डोळ्या समोर उभा ठाकला.
औरंगाबादहून – नगरकडे मालवाहतूक ट्रॅक (क्रमांक एम.एच.14-7611) चालला होता. नेवासा फाटा येथे आल्यानंतर ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट शेवगाव चौकातील राजमुद्रा चौकात असलेल्या सुशोभिकरण करण्यात आलेल्या ओट्यावर चढला. यामध्ये या सुभोभिकरण करण्यात आलेल्या ओट्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हा अपघात घडल्यानंतर परिसरात असलेल्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालकाला ट्रकमधून बाहेर काढले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
अपघात झालेल्या राजमुद्रा चौकात नेहमीच वर्दळ असते. हा अपघात झाला तेव्हा पहाटेची वेळ होती. म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दिवसा जर हा अपघात झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. या अगोदर सात वर्षांपूर्वी याच चौकात ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने चार जणांना आपला जीव गमाविण्याची वेळ आली होती. हा अपघात पाहिल्यानंतर अनेकांना जुन्या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या.
दरम्यान या अपघातात राजमुद्रा चौकातील सुभोभिकरण ओट्याचे नुकसान झालेले आहे. तसेच ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हा ट्रक पाहण्यासाठी काल सकाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

वाहचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे ः पेचे
सात वर्षांपूर्वी असाच एक अपघात झाला होता. त्यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आजचा अपघात पाहून जुन्या अपघाताच्या आठवणीं डोळ्यासमोर दिसल्या. आजचा अपघात पहाटेच्या वेळी झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. असे अपघात होऊ नये, म्हणून वाहनचालकांनी नेवासा फाटा येथून जात असताना वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसे प्रशासनाने खबरदारी उपाय म्हणून रस्त्याच्या दुतर्फा अपघाती जागा व वाहने सावकाश चालवा, याचे फलक लावणे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणासाहेब पेचे यांनी व्यक्त केली.

गतीरोधक बसवावे ः निपुंगे
नगर-औरंगाबाद रस्त्यावरून रोज हजारो वाहनांची वर्दळ होत असते. नेवासा फाटा हे वर्दळीचे ठिकाण आहे. पण येथे जाताना वाहनांच्या वेगाची मर्यादा कमी नसते. त्यामुळे खबरदारीचा अपाय म्हणून प्रशासनाने नेवासा फाटा परिसरात गतीरोधक बसावे, अशी मागणी नेवासा फाटा येथील राजमुद्रा गु्रपचे अध्यक्ष सतीष विष्णू निपुंगे यांनी व्यक्त केली.

संरक्षण कठडे उभारा ः हांडे
शेवगाव चौकातील राजमुद्रा चौकात मागची व आत्ताची अपघाताची घटना लक्षात घेता हा भाग अपघातग्रस्त बनलेला आहे. येथे अपघातग्रस्त भाग म्हणून फलक उभारण्यात यावे, तसेच रस्त्याच्याकडेला प्रवाशांच्या सोयीसाठी फूटपाथ प्रशासनाने तयार करून त्याला संरक्षण कठडे उभारावे, अशी मागणी राजमुद्रा ग्रुपचे सदस्य प्रताप हांडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*