लातूरच्या अपघातात मृतांमध्ये बेलपिंपळगावच्या शुभम शिंदेचा समावेश

0

गावावर शोककळा; रात्री उशिरा अंत्यसंस्कार; लातूरला घेत होता शिक्षण; 20 व्या वाढदिवशीच काळाचा घाला

बेलपिंपळगाव (वार्ताहर)- लातूर जिल्ह्यात शिक्षण घेत असलेल्या नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील गरीब कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचा लातूर येथे अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या युवकाचा याचदिवशी 20 वा वाढदिवस होता व गावावरुन तो लातूरला पोहचल्यावर लातूर-नांदेड महामार्गावरील भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये त्याचाही समावेश होता. अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या आई-वडीलांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

शुभम शरद शिंदे वय 20 वर्ष हा युवक लातूर जिल्ह्यातील लोदगा येथील फिनिक्स अकॅडमीच्या फूड टेक्नॉलॉजीला द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. दि. 28 नोव्हेंबरला पहाटे लातूर-नांदेड महामार्गावरील कोळपापाटी नजीक मंगळवारी पहाटे जो भीषण अपघात झाला त्यात त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील शरद शिंदे व सविता शिंदे यांचा तो एकुलता एक मुलगा होता. घरची परिस्थिती जेमतेम आहे पण आपला मुलगा उच्चशिक्षित व्हावा म्हणून हे माता पिता काबाडकष्ट करून त्याच शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होते.

बेलपिंपळगाव येथे सर्व तरुण मुलांचा तो चांगला मित्र होता. काल सकाळी जेंव्हा ही बातमी गावात कळाली त्यावेळी सर्वांचा काळजाचा ठोका चुकला. कारण बुधवारी दुपारी कॉलेजला जाणार म्हणून तो मंगळवारी सकाळी सर्व मित्रांना भेटला आणि मित्रांनी त्याचा 28 नोव्हेंबर वाढदिवस आहे म्हणून शुभेच्छा दिल्या आणि दुपारी वडील त्याला गाडीत बसवून आले. पहाटे 3 वाजेपर्यंत आई वडील त्याला फोन करत होते. 3 वाजता तो स्टेशनवर उतरला होता. आईला फोन केला तुम्ही आता झोपा मी पोहचलो आहे. हा त्याचा आईला शेवटचा फोन आहे याची कल्पनाही करवत नाही.

सकाळी जेव्हा गावातील माजी सभापती दिगंबर शिंदे यांना अपघाताच्या घटनेचा फोन आला. त्यावेळी त्यांनी शुभमच्या आई व वडील, चुलते, यांना व गावातील काही मित्र घेऊन घटनास्थळी दाखल झाले. सर्वांच्या काळजाचा ठेका चुकला बघून काल दिवसभर गावात भयान शांतता पसरली होती. अचानक घडलेली घटना सगळ्या गावाला चटका लावून गेली. अनेक मित्रांना माहीत नसल्याने बर्‍याच मित्रांनी फेसबुक वरून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अचानक मृत्यूची बातमी कळताच सर्वाना धक्का बसला.

रात्री 11.30 ला मोठ्या दुःखद साश्रुनयनांनी शुभम वर अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी गावातील मित्र, नातेवाईक, लातूर येथिल कॉलेज मित्र, शिक्षक परिवार उपस्थित होता. यावेळी आई सविता शिंदे व वडील शरद शिंदे यांचे दुःख कोणाला बघवत नव्हते.

असा झाला अपघात –
लातूर-नांदेड महामार्गावरील कोळपा पाटी नजीक रात्री 11 वाजता मागील टायर फुटल्याने नळेगावहून लातूरच्या दिशेने सोयाबीनची पोती घेऊन निघालेला आयशर टेम्पो (क्र. एमएच 04 सीजी 2736) रस्त्यालगत थांबलेला होता. भरधाव वेगातील क्रुझरने पहाटे 4 वाजता जोरदार धडक दिली. त्यावेळी समोरुन येणारी दुसरी क्रुझरही या दोन्ही वाहनांवर धडकली. चाकूर तालुक्यातील लातूर रोड येथील रेल्वे स्थानकात उतरलेल्या प्रवाशांना घेऊन लातूरकडे ही क्रुझर (एमएच 24 व्ही 1104) जात होती. त्याचवेळी पंढरपूरहून नांदेडकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या क्रुझरला (एमएच 13 बीएन 2454) ही जीप धडकली. यात 7 जण ठार तर 13 जण जखमी झाले. मयतांमध्ये बेलपिंपळगावच्या शुभम शरद शिंदेसह विजय तुकाराम पांडे (नाशिक), दत्तू बळीराम शिंदे (नांदेड), उमाकांत सोपान कारुले, मीना उमाकांत कारुले, तुकाराम ज्ञानोबा दळवे व मनोज चंद्रकांत शिंदे (चौघेही रा. लातूर) यांचा समावेश आहे.

 

LEAVE A REPLY

*