बोलेरो-ट्रकचा भीषण अपघात; 7 ठार

0

दौंड तालुक्यातील पिता-पुत्र, भावंडांचा समावेश, नेवाशाच्या ट्रक चालकास अटक

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-औरंगाबाद महामार्गावर धनगरवाडी शिवारात बुधवारी पहाटे बोलेरो मोटार-मालमोटारीचा भीषण अपघात झाला. यात मोटारीतील सर्व सातहीजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये पिता-पुत्रासह व दोन सख्या भावांचा समावेश आहे. मृत प्रवासी हे पुणे जिल्ह्यातील यवत (ता, दौंड) येथील आहेत. ते बुलढाणा जिल्ह्यात सैलानीबाबाच्या दर्शनासाठी निघाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मालमोटारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर रामभाऊ गायकवाड (वय 45), अंकुश दिनेश नेमाने (वय 45), मुबारक अबसान तांबोळी (52), बाळू किरण चव्हाण (वय 17), स्वप्नील बाळू चव्हाण (17), गोकुळ रामभाऊ गायकवाड (वय 40), अरुण पांडूरंग शिंदे (35) अशी मृतांची नावे आहेत.
मंगळवारी रात्री हे भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानीबाबा यांच्या दर्शनासाठी एम. एच 12 एफएफ 3392 बोलेरोमधून निघाले होते. नगरकडून औरंगाबाला जात असताना नगर तालुक्यातील धनगरवाडी परिसरात असतांना त्याच्या समोरून एम. एच 20 एटी 4650 ही मालमोटार आली. पहाटेची वेळ असल्याने दोन्ही वाहने भरधाव होती. त्यामुळे दोन्ही वाहनांचे नियंत्रण सुटल्याने ती एकमेकांना जाऊन आदळली. या अपघातात बोलेरो वाहन मालट्रकच्या बोनेटखाली घुसले. यामुळे बोलोरीतील भाविकांना बाहेर पडता आले नाही. परिणामी अपघातानंतर सातही जणांचा त्यात जीव गुदमरून मृत्यू झाला.
अपघाताची माहिती एमआयडीसी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक अ‍ॅड. विनोद चव्हाण यांनी बोलेरो वाहनात अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघात इतका भीषण होता की ट्रकमध्ये अडकलेले बोलेरो वाहन सहजासहजी बाहेर काढता आले नाही. अखरे पहाटे 3 वाजता एकमेंकात अडकलेले दोन्ही वाहने बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलविण्यात आले होते. पोलीस, स्थानिक नागरिक व प्रवासी यांच्या मदतीने बोलेरोमधील काही भाविकांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, एकही प्रवासी जिवंत नव्हता.

डायरीवरून लावला शोध
घटना घडल्यानंतर मयत झालेले भाविक कोण आहेत. ते कोठे राहतात. त्यांची ओळख पटत नव्हती. मात्र, पोलिसांनी वाहनातील काही कागदपत्रे मयतांच्या खिशातील डायर्‍या व चिठ्ठ्या वाचून साडपलेल्या काही मोबाईल नंबरच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क साधत सर्व मयत नातेवाईकांशी संपर्क साधला. बुधवारी सकाळी सर्व मयत भाविकांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. मृत भाविकांमध्ये मनोहर गायकवाड व गोकुळ गायकवाड या दोन सख्या भावांचा समावेश आहे. तर बाळू चव्हाण व स्वप्नील चव्हाण हे पिता-पुत्रदेखील अपघातात ठार झाले आहेत.

अपघात घडल्यानंतर पोलिसांनी भाविकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघातग्रस्त ट्रक आणि बोलेरो ही दोन्ही वाहने एकमेंकात अडकून पडले होते. यामुळे अपघातग्रस्तांना मदत करणे अशक्य झाले. मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहाणी केली आहे. घटनेतील ट्रकचालक अजिनाथ कैलास इलग (रा. चिंचोली, ता. नेवासा) यास अटक करण्यात आली आहे.
– अ‍ॅड. विनोद चव्हाण (सहायक पोलीस निरीक्षक)

LEAVE A REPLY

*