ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरुणाचा मृत्यू

0
अकोले (प्रतिनिधी)- ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात आंबड येथील एका 38 वर्षीय तरुणास प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना धामणगाव आवारी येथील तळेवाडी पाझर तलावाच्या वळणावर मंगळवारी दुपारी घडली.
तालुक्यातील आंबड येथील भास्कर शांताराम कानवडे (वय 38) याने शेतीच्या कामासाठी धुमाळवाडी येथून पाहूण्यांचा ट्रक्टर आणला होता.
काम आटोपल्यावर ट्रक्टर पोहच करण्यासाठी धुमाळवाडी येथे जात असताना धामणगाव आवारीच्या तळेवाडी येथील पाझर तलावाच्या वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टरने तीन पलट्या खाऊन 10 फूट खड्ड्यात गेला. छताचा पूर्ण मार डोक्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच आंबड व तळेवाडी येथील दत्तू जाधव, प्रमोद भोर, किरण कोल्हाळ, राहूल भोर, प्रवीण जाधव, संदीप भोर, प्रा.भूषण जाधव, डॉ. भागवत कानवडे, प्रकाश भोर, सागर भोर, अनिल जाधव, सोयल शेख, अनिल भोर, विशाल कोल्हाळ, प्रमोद जाधव, बाळासाहेब कानवडे, दत्ता नवले, सागर आवारी, सतीश आवारी, नारायण आवारी, पांडुरंग भोर, अमोल भोर, संतोष भोर, बाळासाहेब भोर, बाबाजी भोर, लक्ष्मण कानवडे आदी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमी भास्करला जेसीबी मशिनच्या मदतीने बाहेर काढले. त्यानंतर आंबड येथील तरुण कार्यकर्त्यांनी त्यास प्राथमिक उपचारासाठी येथील डॉ. भांडकोळी हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. पुुढे संगमनेर येथे डॉ. तांबे हॉस्पिटलमध्ये व तेथून नाशिक येथील व्हॉकार्ड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. नाशिक येथे उपचारादरम्यान मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालवली. नाशिक येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले.
बुुधवारी दुपारी आंबड येेथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, एक बहीण, आजी असा परिवार आहे. भास्कर कानवडे सुस्वभावी होता. त्याच्या अपघाती निधनाबद्दल आंबड व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

*