पिकअप जीप-रिक्षा अपघातात महिलेचा मृत्यू ; आठ जखमी

0

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील अपघात; अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर

नेवासा (प्रतिनिधी) – नगर-औरंगाबाद महामार्गावर वडाळा बहिरोबा शिवारात शनिवारी सकाळी अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या अ‍ॅपे रिक्षाला बोलेरो पिकअप जीपने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील सुमारे आठ प्रवासी जखमी झाले. या अपघातात शांताबाई चक्रनारायण (वय-70, रा. वडाळा मिशन) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
घोडेगाव ते नेवासा दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या व प्रवाशांनी खचाखच भरलेल्या अ‍ॅपे रिक्षा क्र.एम.एच. 17-ए.ई. 139 ला वडाळा बहिरोबा शिवारात बोलेरो पिक अप जीप क्र.एम.एच.12 – 4343 ने मागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की रिक्षातील प्रवासी धक्क्याने रस्त्यावर बाहेर पडले. लक्ष्मीबापू अवसरमल (वय – 38, रा.पुणे), सोनाली संतोष कालगंगे (वय – 30, रा.सोनई), रेणूका आव्हाड (वय-26, रा.सोनई), सुभद्रा काकडे (वय-58, रा.सोनई), सचिन काकडे (वय-6, रा.सोनई), हे प्रवासी गंभीर जखमी झाले.
जखमींवर वडाळा मिशन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  अ‍ॅपे रिक्षाचालक अन्वर सय्यद हा देखील किरकोळ जखमी आहे. दरम्यान, नगर-औरंगाबाद महामार्गावर बेफाम, बेदरकार, बेकायदा तसेच अत्यंत बेशिस्तपणे राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे. परवाना नसतानाही शेकडो वाहने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून कसलीही पर्वा न करता भरधाव वेगाने धावत असतात.
प्रवाशांच्या सुरक्षेचे कुठलेही उपाय न करता अत्यंत असुरक्षितपणे प्रवासी वाहतूक केली जात असल्याने या मार्गावर घडणारे अपघात नित्याचेच झाले आहेत. नेवासा, शनिशिंगणापूर तसेच सोनई या तीन पोलीस ठाण्यांच्या कार्यकक्षेत प्रचंड प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक राजरोस बोकाळली असताना तिला रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.
यातून मोठी रक्कम महिन्याकाठी हप्तास्वरुपात वसूल केली जात असल्यामुळे सोन्याची अंडी देणार्‍या या कोंबडीला राखण्याचे काम काही पोलीस कर्मचारी करत असल्याचा आरोप नेहमीच होत असतो. कागदपत्रे नसलेली व कालबाह्य, जीर्ण झालेली वाहने तसेच ड्रायव्हिंगचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसलेले व वाहन चालवण्याचा परवाना नसलेले बहुतांश व्यसनी लोक यात राजरोस सामिल झाल्याने प्रवाशांचे जीवनच दररोज डावावर लागत असते.
नेवासा तालुक्यातील तीनही पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात या अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून किती बळी गेल्यानंतर संबंधितांना याचे भान येणार आहे असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनीच आता याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी होत असून या अवैध प्रवासी वाहतुकीमागील अर्थकारणाचा शोध घेऊन तिचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी जोर धरत आहे.

अवैधकडे वाहतुकीकडे दुर्लक्ष, भाविकांची पिळवणूक  –  नेवासा तालुक्यात शनिशिंगणापूर, संत ज्ञानेश्वर मंदिर, मोहिनीराज मंदिर, म्हाळसाचे माहेर, श्रीक्षेत्र देवगड, श्रीक्षेत्र वरखेड आदी राज्य, राष्ट्रीय पातळीवर किर्तीप्राप्त देवस्थाने आहेत. पर्यटनाबरोबरच देवदर्शनाच्या निमित्ताने देशभरातून तालुक्यात येत असलेल्या भाविकांच्या गर्दीला पर्वणी समजून वाहने तपासणी, सुरक्षेच्या गोंडस नावाखाली अडवणूक करून पिळवणूक करण्याचा गोरखधंदा काही पोलीस करत असल्याचा आरोप आहे. पर्यटन, देवदर्शनाच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासात भर पडण्याऐवजी पोलिसांच्या साडेसातीला घाबरून एकदा आलेला पर्यटक परत येण्याचे धाडस करत नसल्याचे एका देवस्थानच्या प्रमुख विश्वस्ताचे सूचक उद्गार खूप काही सांगून जातात.     

LEAVE A REPLY

*