पुढार्‍यांनी शेतकर्‍यांचे दायित्व स्वीकारावे : ना. विखे

0
विखे पाटील यांनी 208 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे घेतली दत्तक,  वाढदिवशी नवीन पायंडा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांकडे गांभीर्याने पहावे : शांतिलाल मुथा
अहमदनगर (प्रतिनिधी) – सत्कार, स्वागत आणि पुष्पगुच्छांना फाटा देत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आपल्या वाढदिवशी अहमदनगर जिल्ह्यातील 208 शेतकरी कुटुंबांना दत्तक घेऊन नवा पायंडा ठेवला. बळीराजाच्या आत्महत्या टाळायच्या असतील तर पुढार्‍यांनी राजकारण बाजूला ठेवून आपआपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सर्वांगीण आधार देण्याचे दायीत्व स्वीकारले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी विखे पाटील परिवार व त्यांच्या स्वयंसेवी संस्थांमार्फत पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब सहाय्य योजनेचे लोकार्पण करण्यात आले. अहमदनगर येथील नंदनवन लॉन्सवर झालेल्या अत्यंत भावनिक कार्यक्रमात विखे पाटील यांनी आत्महत्या केलेल्या 208 शेतकर्‍यांच्या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक शांतीलाल मुथा होते.
या दत्तक योजनेतील 208 लाभार्थी कुटुंबांच्या साक्षीने लोकार्पण झाल्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आज आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून केवळ सरकारवर टीका करून थांबणार नाही.
शेतकर्‍यांसाठी आमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत राहू. शेतकर्‍यांची व्यथा सरकारसमोर आक्रमकपणे मांडत राहू आणि सोबतच आमची नैतिक जबाबदारीही पूर्ण करू. घरातील कर्त्या व्यक्तीच्या आत्महत्येनंतर हतबल झालेल्या शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा निर्णय त्याच जबाबदारीचा एक भाग आहे.
या योजनेच्या माध्यमातून भविष्याच्या चिंतेने ग्रासलेल्या या 208 कुटुंबांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण करू शकलो आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास थोडा फार हातभार लावू शकलो तर यापेक्षा मोठे समाधान असू शकत नाही, असेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथा यांनी विखे पाटील कुटुंबाच्या या उपक्रमाचे मुक्त कंठाने कौतूक केले. ते म्हणाले की, या कुटुंबाची सर्वसामान्यांप्रती असलेली आस्था मी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या काळापासून प्रत्यक्षपणे अनुभवली आहे.
तीच आस्था डॉ. सुजय विखे पाटील यांच्या रूपात चौथ्या पीढीतही कायम असल्याचे या योजनेतून स्पष्ट झाले आहे.2013 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील मंत्री असताना बीड जिल्ह्यात तलावाचा गाळ उपसण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. पण् मंत्री असतानाही ते केवळ पाहणी करून थांबले नाही तर त्यांनी स्वतः श्रमदान केले आणि शेतकर्‍यांप्रती आपली तळमळ कृतीतून स्पष्ट केली, अशी आठवण मुथा यांनी याप्रसंगी सांगितली.
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना सर्वांगिण आधार देण्याची गरज त्यांनी विषद केली. ते म्हणाले की, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांपैकी एक तृतियांश मुलांमध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्ती बळावत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे शांतीलाल मुथा यांनी सांगितले.
या योजनेची संकल्पना मांडून ती मूर्त रूपात आणणारे डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रवरा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रास्ताविक केले. योजनेची पार्श्वभूमी सांगताना ते म्हणाले की, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनामुळे विखे पाटील कुटुंबांचा मार्गदर्शक हरपल्यानंतर अनेक दिवस प्रचंड पोकळी जाणवत होती.
कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या जाण्याने काय परिस्थिती निर्माण होते, याचा अनुभव पदोपदी येत होता. त्याचप्रमाणे शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबावर कोसळणारा दुःखाचा डोंगर किती मोठा असेल, याचाच विचार सतत माझ्या डोक्यात घोळू लागला. त्यामुळे अशा कुटुंबांसाठी काय करता येऊ शकेल, याचा अभ्यास करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. या सर्वेक्षणातून समोर आलेले चित्र मन सुन्न करणारे होते.
त्यामुळे या कुटुंबांना आधार देण्यासाठी म्हणून पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या नावाने योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याचे लोकार्पण केले. आपण निराधार आहोत की काय, अशी भावना या कुटुंबांमध्ये बळावली होती. परंतु, ही भावना कमी करून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा प्रयत्न आम्ही या योजनेच्या माध्यमातून करणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले.
मागील चार पिढ्यांपासून विखे पाटील कुटुंब समाजकारणात आहे. आपले समाजासाठी काही तरी देणे लागते, या भावनेतून आम्ही काम करतो आहोत. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकासाठी आम्ही अपघात विमा योजना सुरू केली आहे. त्याचा हप्ता विखे पाटील कुटुंबाकडून चुकता केला जातो. मागील अनेक वर्षांपासून डॉ. विखे पाटील फाऊंडेशनच्या रूग्णालयात मोफत किंवा सवलतीच्या दरातील औषधोपचाराच्या रूपात दरवर्षी कोट्यवधी रूपये लोकसेवेसाठी खर्च केले जातात.
जलक्रांती अभियानाच्या माध्यमातून राहता-शिर्डी परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढविण्याचे मोहिम आम्ही राबवली. परंतु, या कामांची कधी प्रसिद्धी केली नाही. कारण लोकांसाठी कामे करा; त्याची प्रसिद्धी करू नका, अशी शिकवण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी आम्हाला दिली होती, असे सांगून युवक नेते डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, मी पहिल्यांदा या योजनेची प्रसिद्धी करावी, असे आवाहन माध्यमांना करतो आहे. ही योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली तर कदाचित आणखी काही जणांना असाच एखादा उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन मिळू शकेल.
आसू आणि आत्मसन्मान
आत्महत्या केलेल्या तीन शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात आपली व्यथा मांडली. घरातील प्रिय व्यक्ती गमावल्याचे दुःख त्यांच्या शब्दांतून प्रकर्षाने जाणवत होते. परंतु, संकटाच्यावेळी आपल्या पाठीशी कोणीतरी भक्कमपणे उभे राहिल्याने आयुष्याची पुढील लढाई लढण्यासाठी मिळालेला आत्मविश्वासही त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता.
अहमदनगर तालुक्यातील करिष्मा अस्लम शेख यांनी पतीच्या आत्महत्येनंतर जगणे कठीण झाले होते, असे सांगितले. अशा वेळी विखे पाटील कुटूंब मदतीला धावून आले. त्यांनी दत्तक घेतल्यामुळे भक्कम आधार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. श्रीगोंदा तालुक्यातील प्रितम संतोष शिंदे हिने आपली व्यथा सांगताना एका हिंदी कवितेचा आधार घेतला.
संगमनेर तालुक्यातील अश्विनी अशोक नवले हिने तिच्या पित्याने गळफास घेतल्याची घटना उपस्थितांना सांगितली. यावेळी तिला आपले अश्रू आवरता आले नाही आणि ती बोलत असताना असंख्य उपस्थितांचेही डोळे पाणावले. शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबांला खुप काही सोसावे लागते. त्यामुळे थकित कर्जासाठी शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये, असे भावनिक आवाहन तिने याप्रसंगी केले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम आणि युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रतिभा रघुवंशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. विखे पाटील कुटुंबाने मागील चार पिढ्यांपासून लोकसेवेचा वसा कायम ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पांगरमल येथील विषारी दारू कांडात बळी गेलेल्या नागरिकांच्या वारसाला प्रत्येकी 25 हजार रूपयांचा धनादेश तर मोफत अपघात विमा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 लाख रूपयांचा धनादेश या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
माजी खासदार दादा पाटील शेळके, आ. भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हसके, माजी आमदार नंदकुमार झावरे, संभाजीराव फाटके, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत ससाणे, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती अनुराधाताई नागवडे, माजी महापौर अभिषेक कोळमकर, सुभाष पाटील, वसंतराव कापरे, माधवराव मुळे, श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती नानासाहेब पवार, उपसभापती, सचिन गुजर, प्रवरा बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, व्हा. चेअरमन अशोक असावा, मुळा-प्रवरा संस्थेचे व्हा. चेअरमन जी. के. बकाल, राहाता बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, प्रवरा कारखान्याचे व्हा. चेअरमन पोपटराव लाटे, बाळासाहेब हराळ, बाळासाहेब गिरमकर, मोहन पालवे, सुभाष डांगे, ऊसतोडणी कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष गहिनीनाथ थोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक कोल्हे, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यासह विखे पाटील कुटुंबातील जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील, धनश्रीताई विखे पाटील आदी सदस्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन स्मिता गुणे व प्रमोद रहाणे तर आभार प्रदर्शन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे पाटील यांनी केले.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंब सहाय्य योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेचा लाभ शासकीय अनुदानास पात्र ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील 208 शेतकर्‍यांची पत्नी, आई-वडील, मुले-मुली यांना मिळणार आहे.
या योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, मुलींचा विवाह सोहळा,आरोग्य सुविधा आदी जबाबदार्‍या विखे पाटील कुटूंब स्वीकारणार आहे. याशिवाय या 208 शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी आणि महिलांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी तसेच बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. संबंधित शेतकरी कुटुंबाचे घर राहण्यास योग्य नसेल तर त्यांना घर दुरुस्तीसाठीही सहकार्य केले जाणार आहे. शिवाय या कुटुंबांचा अपघात विमा देखील काढला जाणार आहे.

विखे मुख्यमंत्री असते तर..
मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहे. यावर ठोस अशा उपयाची गरज निर्माण झाली आहे. मात्र त्यासाठी सत्ता असणे गरजेचे आहे. खासदार बाळासाहेब विखे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न होते. मात्र विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री असते तर हा कार्यक्रम घेण्याची वेळ आली नसती, असे सुजय विखे म्हणाले.

अन् अश्रू अनावर…
पांगरमल येथील दारू कांडात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना विखे कुटुंबीयींच्या वतीने मदत देण्यात आली. यावेळी आपघातग्रस्तांच्या वारसांनाही तब्बल 50 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले. मदत मिळाल्यानंतर शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. सर्वच उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

*