‘लाचलुचपत’चे तोफखाना, झेडपीत छापे : पोलीस संजय काळे, लिपिक सुनील सोनवणे व सुनील साबळे चतुर्भुज

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – नाशिक व नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. 8) एकाच वेळी दोन ठिकाणी छापे टाकलेे. यात तोफखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी संजय बबन काळे यास अटक करण्यात आली होती. त्याने एका गुन्ह्यात तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
तर एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे रजा रोखीकरणाचे बिल देण्यासाठी झेडपीतील वरिष्ठ लिपिक सुनील दादू सोनवणे (रा. सावेडी) याने दोन हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना सहआरोपी सुनील हरिभाऊ साबळे (रा. चांदा, ता. नेवासा) याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
तोफखाना पोलीस ठाण्यात 5 नोव्हेंबर रोजी कल्याण रोड येथे एका हॉटेलवर अवैध दारू विक्रीप्रकरणी छापा टाकण्यात आला होता. त्यात काळे हे फिर्यादी झाले होते. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या वडिलांना गोवण्याचा प्रयत्न काळे यांनी केला होता. दरम्यान आरोपी न करण्यासाठी त्यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
हा प्रकार तक्रारदाराने नाशिकच्या ‘लाचलुचपत’ विभागाला कळविला होता. या पथकाने बुधवारी (दि.8) न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या समोरील एका चहाच्या टपरीवर सापळा रचला. काळे हा रक्कम स्वीकारण्यासाठी आला असता त्यास पथकाने रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच दरम्यान नगरचे पोलीस उपअधीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी जिल्हा परिषदेच्या शेजारील वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात सापळा रचला होता.
एका सेवानिवृत्त मुख्यध्यापकाने त्यांच्या मंजूर झालेल्या रजा रोखीकरणाच्या बिलाची मागणी केली होती. हे बिल देण्यासाठी भविष्य निर्वाह निधी खात्याचा वरिष्ठ लिपिक (माध्यमिक) सुनील दादू सोनवणे (रा. सावेडी) याने दोन हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम त्याचे सहकारी लिपिक सुनील हरिभाऊ साबळे (जवाहर माध्यमिक विद्यालय चांदा, ता. नेवासा) याचे मार्फत वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयाच्या गॅलरीत स्विकारली. त्यामुळे या दोघांना लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.
या दोन्ही कायवाया कर्मचार्‍यांचा अभाव असताना एकाच वेळी करण्यात आल्या आहे. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे पोलीस उपअधिक्षक विष्णु ताम्हाणे, सुनिल पवार, वसंत वाव्हाळ, नितीन दराडे, राजेंद्र सावंत, दत्तात्रय बेरड, तन्वीर शेख, प्रशांत जाधव, विजय गंगुल, राधा खेमनर, आंबादास हुलगे, या पथकाने केली. आज तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*