लाचखोर जाधवची कारागृहात रवानगी

0
नाशिक । एका आर्थिक गुन्ह्यातील साक्षीदारास आरोपी न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंंगेहाथ पकडलेल्या पोलीस उपनिरीक्षकास आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

निवांत जगजितसिंह जाधव (33, रा. टाकळीरोड) असे संशयीत उपनिरिक्षकाचे नाव आहे. जाधव यांने शुक्रवारी (दि.17) सायंकाळी सहाच्या सुमारास तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारली होती. त्याच्या आज करण्यात आलेल्या घरझडतीत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती काहीच लागले नसल्याचे सुत्रांनी सांगीतले.

जागेच्या सातबाराच्या उतारर्‍यावर नोंद न करता संशयितांनी बनावट दस्तऐवजामार्फत व्यवहार करून फसवणुक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात 5 मार्च 2017 रोजी एका दाम्पत्यासह इतर दोघांविरोधात मोफा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील फिर्यादीचा मावस भाऊ हा यातील साक्षीदार आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेतर्फे उपनिरीक्षक जाधव हा करत होता.

गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या तक्रारदारास पुरवणी दोषारोपत्रात आरोपी करण्याची धमकी जाधव याने दिली होती. आरोपी न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे त्याने 50 हजार रुपयांची लाच मागितली होती यामुळे तक्रारदाराने याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागाचे उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांनी सापळा रचून टाकळी रोडवर जाधव यास लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाधव यांच्या घराची झडती घेतली असता त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. जाधव यास आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे जाधवची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*