Type to search

Featured सार्वमत

अभिषेक कळमकर यांचा नवा फंडा

Share

‘अहमदनगर स्पीक्स’ फोरमची स्थापना : नगर शहराचा श्वास मोकळा करणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी महापौर यांनी आता जनतेत जाण्यासाठी ‘अहमदनगर स्पीक्स’ हा नवा फंडा काढला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा फोरम स्थापन केला असला, तरी तो राजकारण विरहित असेल, असे दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘बघायचं नाही, बोलायचं’ असे या फोरमचे तत्त्व आहे.  शहरातील नागरिकांच्या अनेक समस्या असतात. त्या सुटाव्यात म्हणून त्यांचा सतत संघर्ष असतो. मात्र समस्या सुटत नाहीत. त्यांना न्याय मिळावा, त्यांच्या पाठीशी कोणी असावे, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी एखादे व्यासपीठ असावे, यासाठी हा फोरम स्थापन करत असल्याचे त्यांनी सांगितले. फेसबूकवर फोरम सुरू झाला असला, तरी जाहीरपणे त्याची सुरूवात काल मंगळवारपासून करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. सध्यातरी या फोरमसाठी मीच पुढाकार घेतला आहे. यथावकाश फोरमची काम करण्याची पद्धत, त्यातील टीम हे जाहीर करण्यात येईल, असे सांगत यावर जास्त बोलण्यास त्यांनी नकार दिला. प्रभागातील समस्यांसाठी नगरसेवक निवडून दिलेले असतात. शहरात मुलभूत समस्यांशिवाय इतर अनेक समस्या असल्याचे सांगत शहराचा कोंडलेला श्वास रिकामा करण्याचे काम या फोरमच्या माध्यमातून होईल, असे ते म्हणाले.

आलेल्या समस्या सोडविण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी करावयाचे प्रयत्न ठरविण्यासाठी कालांतराने समिती स्थापन करण्यात येणार असून, यात विविध तज्ज्ञांचा समावेश असेल. पुढाकार माझा असला तरी नगरकर आणि विशेषतः तरूणांसाठी ही मोटी चळवळ असेल. राजकारण विरहित असलेला हा फोरम स्थापन करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावरच का मुहूर्त निवडला, असे विचारता गेल्या तिन महिन्यांपासून यावर आमचे काम सुरू होते. गणेशोत्सवात त्याची सुरूवात करत आहोत. विकृतांवर मात करण्यासाठी हा मुहूर्त योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचे अनेक प्रश्न श्रेयवादाच्या राजकारणामुळे गुंतलेले आहेत. अनेकांचा श्वास यात गुदमरत आहे. तो मोकळा करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. हे करत असताना माझे प्रोफेशन असलेले राजकारणही चालूच ठेवणार असल्याचे ते म्हणाले. फोरमच्या कामकाजाची पद्धत आजच जाहीर केली तर किंवा कोणत्या समस्या आहेत, त्याची माहिती जाहीर केली तर अनेक अडचणी निर्माण होतील. काही जण त्या अडचणी दाबून टाकण्याचा प्रयत्न करतील, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. महापौर म्हणून काम केलेले असल्याने कोणती समस्या कशी सोडवायची, ती कोणापर्यंत पोचवायची याचा अंदाज मला आलेला आहे. माझ्यासोबत माझे सहकारी यात पुढाकार घेऊन प्रश्न सोडविण्याचा, नगरला अत्याधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे कळमकर म्हणाले.

सुप्रिया सुळे यांना कल्पना
एका राजकीय पक्षात काम करत असताना हा फोरम स्थापन करणे किती संयुक्तिक आहे, राजकीय पक्षाच्या माध्यमातून समस्या सुटत नाहीत का, असे विचारले असता सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविणे महत्त्वाचे असल्याचे अभिषेक कळमकर यांनी सांगितले. तसेच या बाबत पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना माहिती दिलेली असून, राजकारण विरहित उपक्रम असल्याने त्यांनी त्यास परवानगी दिली असल्याचेही कळमकर म्हणाले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!