Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

राष्ट्रवादीत दंगामस्ती

Share

संभाव्य उमेदवार समर्थकांचा राडा शिवीगाळ, चप्पलही भिरकावली

अहमदनगर (प्रतिनिधी)– जनतेने सत्तेतून भिरकावून दिल्यानंतरही राष्ट्रवादीतील दंगामस्ती कमी झालेली नसल्याचे शनिवारी झालेल्या राड्यावरून अधोरेखित झाले. आमदार संग्राम जगताप विरुद्ध माजी महापौर अभिषेक कळमकर व किरण काळे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कार्यक्रम स्थळ सोडल्यानंतर अचानक वाद उफाळून आला. वादानंतर चप्पलही भिरकावण्यात आल्या. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. तीन तास पोलीस ठाण्यात ‘गर्दी’ केल्यानंतर समेट घडून प्रकरण मिटले. दरम्यान, मेळाव्यापूर्वीही या दोन गटांच्या समर्थकांमध्ये रोड शो दरम्यान चांगलीच रेटारेटी झाली.

ज्येष्ठ नेते शरद पवार शनिवारी नगरच्या दौर्‍यावर होते. त्यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. मेळाव्यानंतर पवार व प्रमुख नेते वाहनात बसून निघून गेले. ते गेल्यानंतर अगोदरच एकमेकांच्या विरोधात बाह्या सरसावून असलेले आ. जगताप व कळमकर यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. शहर राष्ट्रवादीत आ. जगताप आणि कळमकर असे दोन गट पडले आहेत. किरण काळे यांनीही आमदार जगताप यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. नगर शहर विधानसभा निवडणुकीसाठी कळमकर व काळे इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. काळे यांनी तसे जाहीर केले आहे. पवार आल्यानंतर त्यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आ. जगताप व कळमकर यांच्या समर्थकांमध्ये तीव्र स्पर्धा लागली होती. पवार यांच्याजवळ जाण्यासाठी त्यांच्यात रेटारेटी झाली. घोषणायुद्धही चांगलेच रंगले.

पवार कार्यक्रम स्थळावरून गेल्यानंतर कळमकर व काळे तेथे उभे असताना आमदार जगताप समर्थकांनी त्यांना शिविगाळ सुरू केली. काहींनी त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावल्याची चर्चा आहे. हा प्रकार झाल्यानंतर ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्यासह अभिषेक कळमकर, त्यांचे समर्थक आणि किरण काळे यांनी थेट कोतवाली पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांनी झाला प्रकार सांगितल्यानंतर अर्ज देण्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार अभिषेक कळमकर व किरण काळे यांनी दोन स्वतंत्र अर्ज लिहून दिले. त्यामध्ये आ. जगताप समर्थकांनी शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली, असे नमूद करण्यात आले होते. या काळात पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता.

प्रकरण वाढू नये म्हणून राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व ज्येष्ठ नेते अशोक बाबर तेथे आले. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कळमकर आणि काळे ऐकण्यास तयार नव्हते. काही वेळाने तेथे आ. संग्राम जगताप आले. पोलीस ठाण्यातच कळमकर आणि जगताप यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. या दरम्यान काळे यांनी तेथून काढता पाय घेतला. बराचवेळ खल झाल्यानंतर सर्व बाहेर आले. दोन्ही अर्ज ज्येष्ठ नेते कळमकर यांनी आपल्याजवळ घेतले आणि फिर्याद द्यायची नसल्याचे सांगितले. एकाच वाहनात बसून दादाभाऊ कळमकर, आ.जगताप व अभिषेक कळमकर पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. प्रकरण आपसात मिटले असले या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!