उक्कडगावातून पाच वर्षीय बालिकेचे अपहरण

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील उक्कडगाव येथील पाच वर्षीय राणी पाटील गायकवाड या मुलीचे खाऊचे आमिष दाखवून तीच्या नातेवाईकानेच अपहरण केल्याची घटना घडली आहे. याबाबत घटनेबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखा पाटील गायकवाड यांचा अहमदनगर तालुक्यातील मेहेकरी येथील पाटील दशरथ गायकवाड यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. साधारणपणे चार ते पाच महिन्यांपूर्वी रेखा व त्यांचे पती यांच्यात भांडण झाल्यामुळे रेखा या तिन्ही मुलांसह उक्कडगाव येथे आई वडिलांजवळ राहून शेतात मजुरीचे काम करतात. दि. 8 ऑगस्ट रोजी रेखा या गावातच शेतमजुरीच्या कामासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यादिवशी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रेखा यांची बहीण उषा यांनी रेखा यांना त्यांची पाच वर्षीय मुलगी राणीचे मामा लहू देवराम पवार (रा. जलालपूर, ता. कर्जत) यांनी राणीला खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे सांगितले.
त्यावर रेखा व त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र राणीचा शोध घेतला. त्यांच्या मूळगावी मेहेकरी येथे राणीचे वडील पाटील गायकवाड तसेच जलालपूरला मामा पवार यांच्याकडे विचारणा केली, परंतु राणीचा कुठेच तपास लागला नाही. दोन दिवस शोध घेऊनही राणी न सापडल्यामुळे राणीच्या आई रेखा गायकवाड यांनी दि. 10 रोजी बेलवंडी पोलीस ठाण्यात आरोपी लहु देवराम पवार (रा. जलालपूर, कर्जत) यांच्याविरुद्ध राणी हिला खाऊसाठी पैसे देतो असे आमिष दाखवून पळून नेल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचापुढील तपास पोलीस करीत असून नातेवाईक असलेल्या आरोपीनेच अशा लहान मुलीचे अपहरण का व कशासाठी केले असेल, याचा शोध पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

*