संगमनेरातून युवकाचे अपहरण; जुन्नर येथे विजेच्या खांबाला बांधून मारहाण

jalgaon-digital
3 Min Read

नऊ जणांविरुद्ध गुन्हा; आरोपींच्या नातेवाईकांकडून युवकाच्या आईला दमबाजी

संगमनेर (प्रतिनिधी) – मोबाईलवरून वाईट शिवीगाळ करू नको, असे म्हणाल्याचा राग येऊन नऊ जणांनी एका जणास संगमनेरातून चारचाकी वाहनात घालून उचलले. ते थेट पिंपळवंडी व जुन्नर येथे नेऊन विजेच्या खांबाला बांधून त्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा संगमनेर शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तर याच प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांनी अपहरण केलेल्या युवकाच्या आईला दमबाजी केल्याने दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अखलाक असिफ शेख (वय 24, रा. कुरण, ता. संगमनेर) हा घरी असताना त्याच्या भावाच्या मोबाईलवर इमरान कुरेशी हा भावाला शिवीगाळ करत होता. तेव्हा अखलाक याने सदर मोबाईल भावाकडून घेतला व इमरान कुरेशी यास शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली. याचा इमरान कुरेशी याला राग आला. दरम्यान अखलाक शेख हा रात्री 10 वाजेच्या सुमारास संगमनेर नाटकी येथे रोडवर गॅरेजसमोर उभा होता. त्यावेळी फयाज कुरेशी व इमरान कुरेशी (रा. कसाईवाडा, जुन्नर) हे दोघे तेथे आले. त्यांनी मोबाईलवरुन शिवीगाळ का केली असे विचारत अखलाक शेख याची गचांडी पकडून त्याला मारुती इरटिका चारचाकी वाहनात टाकले. वाहनात अगोदरच कसाईवाडा येथे राहणारे अयाज कुरेशी, मुजाहिद कुरेशी, महम्मद गौस, सादिक गफुर कुरेशी हे बसलेले होते.

त्यावेळी त्यांनी अखलाक शेख यास शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली व वाहन पुण्याच्या दिशेने सुरु केले. अखलाक शेख याच्या खिशातील 15 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल देखील त्यांनी काढून घेतला. पिंपळवंडी येथे पुलावर येऊन आयाज कुरेशी व इमरान कुरेशी यांनी अखलाक यास वाहनातून खाली उतरवून पुलावर नदी पात्रात लटकवून पुन्हा वर घेऊन हाताने मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा वाहनात टाकले व त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकू असे म्हणत जुन्नर येथे नेले. तेथे कसाईवाडा येथे विजेच्या खांबाला अकलाख यास जनावरांच्या दोराने बांधले व इमरान कुरेशी, फयाज कुरेशी, इसराल बेपारी, सादीक गफृर बेपारी, शादाफ कुरेशी, अयाज कुरेशी, मुजाहिद कुरेशी, महम्मद गौस, सादिक गफूर कुरेशी व इतरांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.

याबाबत अखलाक असिफ शेख याने जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील 9 जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता 367, 327, 341, 324, 143, 147, 149 प्रमाणे दाखल केला आहे. दरम्यान अखलाक शेख याचे संगमनेरातून अपहरण केल्याने सदर गुन्हा शून्यने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आला असून 641/19 प्रमाणे दाखल झाला आहे.

दरम्यान याप्रकरणातील फिर्यादी अखलाक शेख याची आई निलोफर आसिफ शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) हिला गुलजार पठाण (जुन्नर), अजीज कुरेशी (जुन्नर) यांनी संगमनेरला येऊन धमकावले. तुझ्या मुलाला फिर्याद मागे घ्यायला लाव नाहीतर तुझ्या मुलांना महागात जाईल, नाहीतर त्यांना परत उचलून घेऊन जाऊ, अशी धमकी दिली. याबाबत निलोफर शेख हिने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *