फोटो गॅलरी व बातमी : साकूरच्या आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थी भोगतायत यातना

0

करपलेल्या चपात्या, जेवणासाठी ताटंही नाहीत, शौचालय तुंबलेली, परिस्थिती
पाहून अध्यक्षा विखेही गहिवरल्या, आदिवासी मंत्री विष्णू सावरांकडे तक्रार करणार

अहमदनगर, साकूर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यातील साकूर येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची व्यथा याठिकाणी असणारी असुविधा, शाळेच्या परिसरापासून वर्गापर्यंत आणि स्वयंपाक घरात असणारी अस्वच्छता, करपलेल्या चपात्या आणि पाण्यासारखी आमटी, जेवणासाठी वाटी सोडा ताटांची पंचायत, पाहताक्षणी उलट्या होतील अशी शौचालयाची अवस्था पाहिल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे गहिवरल्या. या आश्रम शाळेतील 1 ली ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर याठिकाणी दररोज अशी परिस्थिती असल्याची माहिती समोर आली.

संगमनेर तालुक्यातील साकूर येथे लग्न समारंभानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालीनीताई विखे संगमनेर तालुक्यातील साकूरला मंगळवारी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आश्रमशाळेला अचानक भेट देऊन पहाणी केली. यावेळी जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या समवेत रऊफ शेख, बुवाजी खेमनर, लहानु पा. खेमनर, बाळासाहेब खेमनर, महादू कुदनर, एकनाथ पा. वर्पे, भाऊसाहेब डोलनर, सिराज शेख, तुळशिराम खेमनर आदी उपस्थित होते.

लग्न समारंभास उशीर असल्याने विखे यांनी गावात असणार्‍या आश्रम शाळेला अचानक भेट दिली. दुपारी 12 ची वेळ असल्याने जेवणाची सुट्टी होती. त्याठिकाणी आदिवासी मुले शाळेच्या पटांगणात खाली मातीत जमिनीवर पंगत करून बसलेले होते. सोसाट्याचा वारा, धुळीसोबत मुले अन्न खात होती. यावेळी अनेक मुलांसाठी ताट शिल्लक नसल्याने एका ताटात एकापेक्षा जास्त मुले जेवताना विखे यांनी पाहिले.

यावेळी त्या आदिवासी आश्रम शाळेतील व्यवस्थेबद्दल संताप व्यक्त करत शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याविषयी आत्मीयता व्यक्त करत अध्यक्षा विखे यांनी नगरला आल्या आणि पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच संबंधित आदिवासी आश्रम शाळेच्या अव्यवस्थापना बद्दल पुराव्यानिशी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या तक्रार करणार असल्याची माहिती दिली.

ताटात वाटी नसल्याने त्याठिकाणी पाण्यासाठी आमटी आणि करपलेल्या चपात्यासोबत आदिवासी मुले आपला उदर भरत होती. शाळेच्या परिसरात सर्व स्वच्छता, धुळीचे साम्राज्य होते. विद्यार्थ्यांच्या साहित्याच्या पेट्या वर्गा बाहेर एका ओळीत मांडण्यात आल्या होत्या. वर्गात विद्यार्थ्यांचे अंथरुण पांघरूणाचे कपडे होते. त्यातूनही कुबट वास येत होता. मग अध्यक्षा विखे यांनी आपला मोर्चा स्वयंपाक घराकडे वळवला. त्याठिकाणी चक्क एका मोठ्या तव्यावर बांबूच्या साह्याने चपात्या भाजण्याचे काम सुरू होते. स्वयंपाकीकडे विचारणा केली असता मी आजच आलो असल्याचे उत्तर त्याने दिले.

त्यानंतर विखे यांनी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिली. ज्या स्टिलच्या पिंपात पाणी होते. त्याकडे पाहून सामान्य व्यक्ती उलट्या करेल अशी त्याची अवस्था होती. पिंपाचे झाकण काढले तर पाण्याच्या तळाशी चक्क अळ्या होत्या. हे आळ्या मिश्रीत पाणी विद्यार्थी पित होते. शौचालयांची अवस्था पाहिली तर चक्कर येईल अशी स्थिती असल्याचे विखे यांनी सांगितले. नाकाला रुमाल लावून विखे यांनी आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात या सर्व दुरवस्थेचे फोटो काढले. याठिकाणी कोणाचाच कोणाला मागमूस नसल्याचे चौकशीअंती विखे यांच्या निदर्शनास आले.

आश्रम शाळेच्या दुसर्‍या मजल्यावर काही मुली वर्गात बसून होत्या. त्यांच्याकडे विचारणा केली असता ताटे शिल्लक नसल्याने त्यांना जेवण मिळाले नव्हते. यासह शाळेच्या इमारतीत दररोज विद्यार्थ्यांना स्वच्छता करावी लागते. शाळेत धड शिकवले जात नसल्याचे विखे यांनी 9 वीच्या विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्‍नांतून समोर आले. संतप्त झालेल्या विखे यांनी लग्न समारंभ उरकून नगर गाठले त्याठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आश्रम शाळेचे पितळ उघडे कले. याठिकाणी आपण स्वस्थ बसणार नाही. फोटासे आश्रम शाळेची तक्रार आदिवासी मंत्री सावरा यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षा विखे पाटील यांनी ग्रामीण रुग्णालय, साकूर येथेही अचानक भेट देत तपासणी केली. यावेळी केवळ दोनच कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होते. बाह्यरुग्ण तपासणी बंद होती तर आंतररुग्ण विभागात केवळ दोनच रुग्ण अ‍ॅडमिट होते. एकही नर्स, शिपाई हजर नव्हते. केवळ एकमेव फार्मासिस्ट टकले हजर होते. यावेळी सिस्टर हे ड्युटी करून गेल्याचे टकले यांनी सांगितले असता, ड्युटी करून जायला काय हाफ डे होता काय? अशा शब्दांत सुनावले. डॉक्टर उपस्थित नसल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. टकले यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. मात्र टकले यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.

  • आदिवासी आश्रम शाळेतील परिस्थिती अस्वच्छता, त्या ठिकाणी विद्यार्थी भोगत असणार्‍या यातना पाहून माझ्याकडे बोलण्यास शब्द नाहीत. शाळेतील अन्न पाहून मी माझा डबा खाल्ला नाही. या प्रकाराबाबत मी स्वत: पाठपुरावा करून दोषींना योग्य शासन होण्याचा प्रयत्न करणार आहे.
    – शालीनीताई विखे पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद
  • विखे यांनी भेट दिली त्यावेळी आश्रम शाळेत साधारण 250 जवळपास विद्यार्थी होते. त्यात 150 विद्याथिर्र्नी होत्या. शाळेत एकूण 400 च्या पुढे पट असल्याची माहिती देण्यात आली. शाळेत केवळ तीन शिक्षका उपस्थित होत्या. त्यांनी आपण नवीन असल्याचे सांगितले. या ठिकाणी मुख्याध्यापक यांची तीन दिवसांपासून शाळेच्या मस्टरवर सही नसल्याचे दिसून आले. शाळेतील वर्गात असणार्‍या ग्रिन बोर्डचे केवळ प्लायवूडचे अस्तित्व शिल्लक होते.
  • या आश्रम शाळेत मुख्याध्यापकांसह 18 कर्मचार्‍यांचा आकृतिबंध मंजूर आहे. यातील केवळ तीन शिक्षक शाळेत मंगळवारी हजर होते. शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव एस.आर. खेडकर असून एस.एच.पवार अधीक्षक आहे. यासह याठिकाणी सहा प्राथमिक शिक्षक, 5 स्वयंपाकी, 1 चौकीदार आणि 3 कामाठी यांची नियुक्त आहे. मात्र, 15 जण या ठिकाणी गैरहजर होते. यातील तिघांचे रजेचे अर्ज असल्याची माहिती विखे यांना देण्यात आली.

LEAVE A REPLY

*