Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआरोग्यदूत : शाळेची भीती

आरोग्यदूत : शाळेची भीती

डॉ योगिता पाटील 

बहुसंख्य मुलांना शाळेत जाण्याचा मोठाच उत्साह असतो. जर मोठे भावंड आधीच शिकत असेल, तर शाळेत जाणे म्हणजे मुलांसाठी मोठे होण्याचे लक्षण असते.

- Advertisement -

त्यामुळे आपल्याला मोठेच महत्त्व प्राप्त झाल्यासारखे त्यांना वाटते. जर शाळेचे वातावरण आकर्षक असेल आणि आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर आणि शिक्षकांबरोबर त्यांचे सूर जुळले तर त्या नवीन आयुष्यात ती झपाट्याने रुळतात.

अशा मुलांच्या वर्तनात स्वावलंबनाची वृत्ती वाढीस लागल्याचे दिसून येते. ती मदतीस तत्पर असतात. जबाबदार आणि मेहनती असतात. सर्वसाधारणपणे त्यांना शाळा खूपच आवडते आणि त्यांच्या वर्तनात अधिकाधिक सुधारणा होत राहतात.

मूल शाळेत नाकारले गेले की त्याच्या मनात शाळेविषयी प्रचंड भीती निर्माण होते. सेपरेशन अ‍ॅक्सायटी डिसऑर्डर (एसएडी) किंवा सोशल फोबिया (एसपी) यामुळे हे लक्षण दिसू लागते. वीसपैकी एका मुलाच्या मनात अशा प्रकारे शाळेविषयीची भीती निर्माण झालेली असते आणि मुलींच्यामध्ये ती अधिक प्रमाणात आढळते. लहान मुलांना आपल्या काळजी वाहकांपासून दूर होण्याची कल्पनाही सहन होत नाही. त्याला ती विरोध दर्शवतात. हेच एसएडी होय. मोठी मुले सामाजिक व्यवस्थांमध्ये मिसळण्याबाबत चिंताग्रस्त होतात (एसपी) पोटदुखी आणि डोकेदुखी या अशा मुलांच्या सर्वसामान्य तक्रारी असतात. सुमारे 75 टक्के मुले शाळेत जाण्यास नकार दर्शवतात आणि त्यांना चिंतेप्रमाणेच नैराश्याचाही काही अंशी त्रास होतो.

कारणे

शाळेविषयी प्रचंड भीती निर्माण होण्यास कित्येक प्रकारचे घटक कारणीभूत असतात. पालक आणि मुलांमधील नातेसंबंधात विसंगती, घरगुती हिंसा, घटस्फोट किंवा पालकांचे व्यसन ही यापैकी महत्त्वाची कारणे होत. मज्जापेशींमधील दौर्बल्य किंवा लिहिणे व वाचन करण्याची क्षमता नसणे किंवा कमी असणे (डिसलेक्सिया) यामुळे मुलाला शाळेची भीती किंवा तिरस्कार वाटतो. आपल्या भोवतालच्या मुलांएवढे आपण सक्षम नसल्यामुळे आपल्या वाट्याला येणारा अवमान टाळण्यासाठी मूल शाळेत जाण्यास उत्सुक नसते. दृष्टीच्या किंवा श्रवणविषयक समस्यांमुळे शाळेत न जाण्याची वृत्ती मुलामध्ये बळावते. विविध अवयवांचे कार्य चालू राहण्यासाठी आवश्यक असणारे प्रमस्तिष्क व अनुमस्तिष्क यांना जोडणार्‍या मेंदूच्या भागाचे नियंत्रण अत्यल्प प्रमाणात असण्यामुळेही असे घडते. यालाच ‘न्युरोनल डिसऑर्गनायझेशन’ (चेतापेशींचे असंघटन) असे म्हणतात.

शाळेविषयीची प्रचंड भीतीचे स्पष्टीकरण देण्यासाठी एक साधा सिद्धांत मांडता येऊ शकतो. शाळा आणि घर यांच्यामध्ये जणू काही एखादा भयावह, अक्राळविक्राळ कुत्रा असल्यामुळे मूल शाळेत जाण्यास घाबरते. मुलाला शाळेत जाण्यापूर्वी आई भरपूर, शर्करायुक्त नाश्ता देते. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी बाहेर पडल्याबरोबर मुलाच्या शरीरात अ‍ॅड्रेनालिनची लाट तयार होते आणि त्यामुळे शाळेत जाण्याच्या कल्पनेनेच ते विव्हळ बनते.

व्यवस्थापन

शाळेत जाण्याविषयी वाटणारी प्रचंड भीती ही कित्येक घटकांच्या संयुक्तीकरणातून निर्माण होत असते. याचे व्यवस्थापन करण्यासाठी पालकांचे व्यवस्थापन किंवा अगदी कौटुंबिक उपचारांचीही गरज असते. शाळेच्या सेवकांना किंवा शिक्षकांना यात सहभागी करून घेणे अत्यंत उपयुक्त ठरते. कारण चिंताग्रस्त मुलाकडे शिक्षकांना, समुपदेशकांना किंवा शाळेच्या परिचारिकांना विशेष लक्ष पुरवावे लागते. मुलांना शांतपणे शाळेत पाठवणे आणि त्याने किंवा तिने एकेक दिवस शाळेत पूर्ण दिवस जाऊन आल्यानंतर शाबासकी म्हणून त्याला किंवा तिला बक्षीस देणे यासाठी प्रशिक्षित करण्यात आलेले पालक तशाप्रकारे वागून सहसा मुलांच्या मनातील शाळेविषयीची प्रचंड भीती दूर करण्यात यशस्वी ठरतात. जर मुलाच्या मनात शाळेविषयी कायमस्वरुपी प्रचंड भीती ठाण मांडून बसलेली असेल, तर मुलाला  मानसशास्त्रज्ञाकडे न्यावे लागते. काहीही झाले तरी अशा मुलांच्या मनातील शाळेविषयीची भीती दूर करण्याचा दर मोठा असून बहुतांश मुले त्यावर मात करून शाळेत जाऊ लागतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या