Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआरोग्यदूत : कान सांभाळा

आरोग्यदूत : कान सांभाळा

कानावर कधीही थापड मारू नये. कानावर थापड बसल्यास कानाच्या पाळीवर मुका मार बसतो. त्यामुळे थोडी सूज येते. तसेच पडद्यालादेखील छिद्र पडते. आतल्या बाजूने किंचित रक्तस्त्राव होतो. कान दुखतो. थोडावेळपर्यंत चक्करही येते. कानाला अचानकपणे बहिरेपणा वाटतो.

कान साफ करताना काडीचा मार जर पडद्याचा भाग सोडून इतर ठिकाणी लागल्यास जखम झाल्यास थोडी वेदना होते व थोडा रक्तस्त्राव कानाच्या बाहेर वाहताना दिसतो. याचवेळी पडद्यालाही मार बसल्यास बहिरेपणा जाणवतो.

- Advertisement -

कानात करंगळी टाकून खाजविल्यास काही वेळा बोटाच्या टोकावरील नखामुळे कानाच्या बाह्यनलिकेच्या बाह्य भागात सूक्ष्म जखमा होतात. कानातील आतून येणार्‍या पूवामुळे अथवा सभोवतालच्या परिणामामुळे ह्या जखमांमध्ये दाह वाढतो. दाहामुळे फार तीव्र वेदना होतात. कानाला बाहेरून साधा स्पर्शही झाल्यास ह्या वेदना होतात.

कानात टाकलेल्या पिचकारीच्या प्रवाहामुळे कानातील पडद्यावर परिणाम झाल्यास कानातून पू वाहतो. कान किंचित दुखतो व बहिरेपणा येतो. म्हणून अप्रशिक्षित व्यक्तीने पिचकारीच्या मदतीने कान साफ करण्याचा प्रयत्न करू नये.

कानात कोणतीही छोटी वस्तू अडकल्यास व या वस्तूने कानाच्या बाह्यनलिकेचा भाग पूर्णपणे व्यापल्यास बहिरेपणा येतो व वेदना होते.

डोक्याला मार लागल्याने कानाच्या सभोवतालचे हाडाला तडा जाऊन कानात (बाह्य, मध्य व काही वेळा अंतकर्णात) रक्तस्त्राव साचतो. कानातून बराच रक्तस्त्राव होतो. रक्त कानात जाते व गोठते यामुळे बहिरेपणा येतो.

उपचार

कानात कोणत्याही कारणामुळे इजा झाल्यास लगेच कोणतेही औषध कानात टाकावयाचा मोह टाळावा.

कानात पाणी टाकून कान धुवू नयेत.

कानातील रक्तस्त्राव बाहेर आल्यास जखम झालेल्या कडेवर झोपावे, त्यामुळे सर्व रक्तस्त्राव आत न साचता बाहेर येतो.

कानातून सारखा रक्तस्त्राव चालू राहिल्यास कानावर निर्जंतुक केलेल्या कापसाचा थर ठेवून त्यावरून बँडेज बांधावे.

रक्तस्त्राव जर थांबला तर कानावर कापूस तसाच राहू द्यावा व डॉक्टरांकडे जावे. तेव्हा डॉक्टरांनादेखील कल्पना येते की, रक्तस्त्राव किती प्रमाणात झालेला आहे.

कानातील रक्तस्त्राव डॉक्टरांना निर्जंतुक केलेल्या कापसाच्या मदतीने साफ करू द्यावा. डॉक्टर अ‍ॅण्टिबायोटिक्सच्या गोळ्या व वेदना शमण्याच्या गोळ्या देतात.

जर पडद्याला इजा झालेली असेल तर बहिरेपणा येतो. पडद्यावरील छोटे छिद्र काही दिवसांमध्ये सहज भरून निघते. मोठ्या आकाराचे छिद्र शस्त्रक्रिया केल्यावरच भरून निघते. परंतु ते छिद्र निसर्गत:च भरून निघते की नाही, हे पाहण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा काळ जाऊ द्यावा लागतो.

डोक्याला मार लागलेला असल्यास बर्‍याचदा रक्त मध्यकर्णात साचते. अशावेळी मध्यकर्णातील रक्त पूर्णपणे नैसर्गिकरित्या विरघळून शोषण्यास काही आठवड्यांचा अवधी लागतो. हे रक्त पूर्णपणे शरीरात शोषले गेल्यानंतरच बहिरेपणा बरा होण्याची शक्यता असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या