Type to search

आरोग्यदूत फिचर्स

आरोग्यदूत : मधुमेह आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Share

आयुर्वेदात प्रकृतीप्रमाणे अवस्थेप्रमाणे मधुमेहात औषधे सांगितली आहेत व एकच औषध सगळीकडे सांगितलेले नाही. फक्त शिलाजित या औषधाची वाग्भटांच्या ग्रंथात एकमेव चिकित्सा सांगितली आहे. परंतु त्याच्यासुद्धा प्रकृती अवस्था, कशाबरोबर घ्यावे हे ठरविणारा वैद्यच असावा. स्वत: रुग्ण नसावा. हे प्रकार वाढले आहेत. आयुर्वेदाच्या नावाखाली जाडपणा, मधुमेह, कॅन्सर इत्यादी व्याधींवर प्रमाणित नसलेली व्यक्ती औषध देते व पळून जाते व त्याने रुग्णावर केलेले प्रयोग आम्हा वैद्य, डॉक्टरांना निस्तरावे लागतात. आयुर्वेदाच्या गोळ्या स्वत:हून साईड इफेक्टस नाहीत म्हणून खाणे  अयोग्यच. त्याचा विचार निश्चितच करावा. या काही प्रकारामुळे आयुर्वेद शास्त्र बदनाम होते. चुकीच्या लोकांच्या हातात आयुर्वेद जाऊन त्याच धंदा केलेला दिसतो आहे. हे लोकांना टाळले पाहिजे. त्या लोकांना ओळखले पाहिजे.

मधुमेहामध्ये आयुर्वेदाने जे आहार-विहाराचे, पथ्य-अपथ्याचे इतके सुरेख वर्णन केले आहे की ते सर्वांनीच अवलंबावे व व्याधीची कारणे जर नाहीशी केली तर व्याधी निश्चितच नियंत्रणात राहतो. मधुमेहात इतर अवयवांवरील परिणाम कमी करण्यासाठी किंवा होऊ न देण्यासाठी आयुर्वेदात सुंदर कल्प आहे की जे आम्ही वापरतो आहे व यशस्वीरित्या रुग्णास सुखी ठेऊ शकतो. परंतु इन्शुलिनवर असणारे व अधिक प्रमाणात साखर असलेल्यांनी एकदम बंद करून दुसरे कोणतेही औषध स्वत:हून घेऊ नये. कारण मधुमेह वाढत गेल्यास त्याचा परिणाम शरीराला घातक ठरू शकतो. इंजेक्शनचा उल्लेख आयुर्वेदशास्त्रात नाही. त्यामुळे त्याविषयी बोलणे योग्य नाही. तसेच आमच्यासमोर आजपर्यंत आयुर्वेदीक इंजेक्शन आलेले नाही. जर व्यवस्थित देखरेखीखाली आयुर्वेदीय वनस्पती चिकित्सा व आधुनिकशास्त्र याचा उपयोग रुग्णाने केला तर त्याचा फायदा आरोग्यास होईल.

शेवटी एवढेच की, आयुर्वेद हे संशोधित शास्त्र आहे. वैद्यांना उपचार करण्याचा नैतिक अधिकार आहे. योग्य आयुर्वेदतज्ज्ञांकडून तो करून घ्यावा व कोणत्याही इतर गोष्टींवर विश्वास ठेवून या मोठ्या आजारांसाठी ‘धन्वंतरी’ शोधत बसू नये व शरीरस्वास्थ्य बिघडवू नये. शास्त्रीय वाद करण्यापेक्षा जे चांगला ते चांगले व या वेगवेगळ्या शास्त्रांनी एकाच बैठकीत बसून योग्य गोष्टी वेचून चिकित्सा या असाध्य रोगांवर ठरवावी.

एकच औषध आयुर्वेदात अनेक ठिकाणी वापरता येते?

अनेकांना याविषयी शंका व थट्टा करण्याचा मोह होतो, हे कसे? याचे कारण स्पष्ट आहे. आयुर्वेद शास्त्रकारांनी प्रत्येक औषधांचा इतका विस्तृत अभ्यास करून ठेवला आहे, की त्या वनस्पतींचे उपयोग कोणकोणत्या व्याधींमध्ये, अवस्थेमध्ये होतात, याचे विस्तृत वर्णन ग्रंथात आहे. उदा. त्रिफळा हे मलविरेचक म्हणून, तसेच डोळ्यांना हितकर म्हणून, जखमा बरे करण्यावर इत्यादी अनेक ठिकाणी वापरता येते. याची आधुनिक शास्त्राशी तुलना केल्यास एकाच व्याधीवर संशोधन सुरू असताना त्याच व्याधीवरचा शरीरावर परिणाम पाहतात. परंतु आधुनिक औषधीसुद्धा इतर व्याधींवर वापरली जातात. उदा. हल्ली ‘व्हायग्रा’ हे औषध हृदयाच्या तक्रारीवर संशोधित केले, परंतु ते गाजले ते त्याच्या ‘संभोगशक्ती’ वाढवण्याच्या क्षमतेसाठी. संशोधने चालूच असतात व त्याचे परिणाम निघतच असतात. परंतु आयुर्वेद शास्त्रकारांनी ते मुळातच ग्रंथात लिहून ठेवले आहे. फक्त वैद्याने बुद्धीक्षमतेने त्याचा उपयोग केला पाहिजे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!