नगरमध्ये 26 लाखांची हवाला रक्कम जप्त, दोघांना अटक

0

धरपकडीत पोलीस जखमी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरातील माळीवाडा येथे सहकारनगर परिसरात 26 लाख रुपयांची हवाला रक्कम कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यात एका व्यापार्‍यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या धरपकडीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी (दि.28) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आरोपी हे लाखो रुपयांची हवाला रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत पोलीस निरीक्षक अभय परमार यांना माहिती सांगितली.

परमार यांनी सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर परिसरात सापळा रचला. आरोपी खाकी रंगाची पैशाची पिशवी घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी हटकले. कोठे जात आहे अशी विचारणा केली असता त्यांनी अडखळत उत्तर दिले. पिशवीत काय आहे ? अशी विचारणा करताच आरोपींनी पळापळ करण्यास सुरूवात केली. आरोपींना पकडत असताना एका पोलीस कर्मचार्‍याच्या बोटाला जखम झाली आहे.

जखमी होऊनही पोलीस कर्मचार्‍याने आरोपीस सोडले नाही. त्याच्या ताब्यातील पिशवी, गाड़ी, व अन्य मुद्देमालासह त्यास पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. ही रक्कम कोठून आणली, कोणाची आहे, कोठे चालवली आहे, याबाबत विचारणा केली असता आरोपींनी सांगण्यास टाळाटाळ केली. या घटनेप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ही घटना राजकीय व्यक्तींना समजताच त्यांचे काही कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. रात्री पोलिसांनी पैसे मोजण्याचे मशिन आणून रक्कम मोजली आहे. आज पोलिसांनी ही रक्कम ज्या ठिकाणी पकडली, त्याच ठिकाणी यापूर्वी 98 लाखांची हवाला रक्कम पकडली आहे. त्यामुळे माळीवाडा परिसरातील हा रस्ता हवालापॉईंट ठरत आहे.

LEAVE A REPLY

*