संगमनेरातील दरोडेखोरांची टोळी गजाआड

0

दुचाकीसह शस्त्र साठा जप्त, कनकापूर शिवारातील घटना

आश्‍वी बुद्रूक (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील कनोली रोडवरील कणकापूर शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोराच्या टोळीतील चौघांना पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी पाठलाग करत ताब्यात घेत जेरबंद केले आहे. ही घटना सोमवारी रात्री 2.45 वाजेच्या सुमारास कनकापूर शिवारात घडली. या गुन्हेगारांमुळे मागील काही दिवसापासून आश्‍वी परिसरात सुरु असलेल्या चोर्‍यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, हवालदार एकनाथ बर्वे, संजय मंडलिक, भारत जाधव, होमगार्ड राजेद्रं साळवे व प्रताप वाघ हे सर्व सोमवारी गस्तीवर होते. ओझर बुद्रुक-कनोली रस्त्यावरील कनकापूर शिवारातील मारुती मंदिरालगत राहणारे रवी पचपींड यांच्या वस्तीजवळील शेतात पहाटे 2.45 वाजेच्या सुमारास काही व्यक्तींच्या संशयीत हालचाली दिसून आल्याने पोलीस निरीक्षक चव्हाण व सहकारी यांना जीपच्या उजेडात पाच ते सहा व्यक्ती दबा धरुन बसले असल्याचे दिसले.

चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी सदर व्यक्तींचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांमध्ये गणेश बबन सुर्यवंशी (वय 30) रा. हनुमंतगाव ता. राहाता, मारुती सोमनाथ पवार (वय 20), अशोक इंद्रभान माळी (वय 20), सागर शिवदास माळी (वय 19) सर्व राहणार ओझर बुद्रुक, ता. संगमनेर अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडील हिरो होंडा मोटार सायकल क्रमांक एम. एच.17, झेड. 3903, कोयता, चाकू, नायलॉन दोरी व मिर्ची पुड जप्त केली आहे.

ताब्यात घेतलेल्या चौघांकडे चौकशी केली असता संतु उर्फ उंबर्‍या माळी रा. बारागाव नादूंर, ता. राहूरी व सोमनाथ श्रीरंग बर्डे रा. ओझर बुद्रूक, ता. संगमनेर हे दोघे आधांराचा फायदा घेत पसार झाले असून हे सर्व जण दरोड्याच्या उद्देशाने आल्याची माहिती पुढे आली आहे.

कणकापूरचे पोलीस पाटील संतोष शिंदे यांना बरोबर घेत दोन पंच समक्ष या घटनेचा पचंनामा करण्यात आला आहे. आश्‍वी परिसरात मागील काही दिवसात घरफोडी व मोटार सायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहे. मात्र कनकापूर शिवारात दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीला पोलिसांनी पकडल्याने येथून मागील घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल एखनाथ बर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आश्‍वी पोलीस ठाण्यात वरील चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी आश्‍वी व परिसरातील गावांमध्ये अवैध धंदे, वाळू तस्कर, रोड रोमिओंवर सिंघम स्टाईलने कारवाई करुन गुन्हेगारांवर वचक निर्माण केला असून त्यात सोमवारी रात्री दरोडेखोरांची टोळी जेरबंद केल्याने श्री. चव्हाण यांच्या सिंघम स्टाईलची परिसरात चर्चा होत आहे. दरोडेखोरांच्या टोळीतील गुन्हेगार हे सराईत असून जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी ‘सार्वमत’शी बोलतांना व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*