पांढरीपूल घाटात अट्टल दरोडेखोर जेरबंद

0
पोलिसांवर चाकू हल्ला
अहमदनगर (प्रतिनिधी) – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चौघांच्या एलसीबी पोलिसांनी मंगळवारी रात्री मुसक्या आवळल्या. पांढरीपूल घाटात धराधरीच्या खेळात दरोडेखोरांनी पोलिसांवर चाकू हल्ला केला, पण पोलीस तो चुकविण्यात यशस्वी ठरले. या झटापटीत चारचाकी वाहनासह काही दरोडेखोर पसार झाले आहेत.
अभिमान शिवदास पवार (रा.वडजी, पैठण), सारस विठ्ठल काळे (रा. राहडगाव, पैठण), प्रवीण अर्पण भोसले (रा. देउळगाव, श्रीगोंदा) आणि सचिन रूस्तम चव्हाण (रा. निपाणी जळगाव, पाथर्डी) अशी पकडलेल्या चार दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चाकू, कटावणी, लाकडी दांडके असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील अभिमान पवार आणि सारस विठ्ठल काळे हे दोघे अट्टल दरोडेखोर आहेत. अभिमान पवार यांच्याविरुध्द औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, करमाड, पाचोडा, पैठण येथे दरोड्याचे 12 गुन्हे दाखल आहेत. दुसरा अट्टल दरोडेखोर सारस काळे याच्याविरुध्द पैठण, बुलढाणा, औरंगाबाद येथे दरोड्याचे पाच गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांत हे दोघेही फरार आहेत.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबर्‍याकडून पांढरीपूल घाटात दरोड्याच्या तयारीत टोळी उभी असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. आता लगेच पोलीस पोहचले तर ते मिळतील अशी टीप मिळाली. त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते. एसपी रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय पवार यांनी एलसीबीचे एपीआय श्रीधर गुठ्ठे, राजकुमार हिंगोले यांच्या नेतृत्वाखाली मधुकर शिंदे, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे,
फकीर शेख, भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, सोन्याबापू नाणेकर, रवींद्र कर्डिले, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, विजय ठोंबरे, विजय वेठेकर, सचिन आडबल, विशाल अमृते, विनोद मासाळकर, मच्छिंद्र बर्डे, किरण जाधव, रोहिदास नवगिरे, बबन बेरड यांची टीम पांढरीपूल घाटाकडे रवाना केली.
घाटाच्या पहिल्याच वळणावर जीप व दोन मोटारसायकलवर संशयित बसल्याचे पोलिसांना दिसले. पोलीस जीप त्यांच्याजवळ थांबताच त्यांनी पोलिसांवर चाकू हल्ला केला. मात्र पोलिसांचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचा हल्ला फेल गेला. या झटापटीत जीपमध्ये असलेले आरोपी जीप घेऊन पसार झाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले.

 

LEAVE A REPLY

*