Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

भुजबळांना समर्थन; ‘आआपा’साठी डोक्याला ताप; दमानिया, प्रीती शर्मा संतप्त

Share

नाशिक । कुंदन राजपूत

नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना समर्थन देणे, आम आदमी पक्षातील अतिउत्साही कार्यकर्त्यांना महागात पडले आहे. पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया व प्रीती शर्मा मेनन यांनी भुजबळांवर मनी लॉण्ड्रिंग व घोटाळ्यांचे आरोप केले होते.

परिणामी भुजबळ काका- पुतण्यांना तुरुंगवारी देखील घडली. मात्र, त्याच भुजबळांना समर्थन दिल्याने पक्षात वादळ उठले आहे. दिल्लीतील पक्षाच्या ‘जेआरसी’ कमिटीने या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून चौकशी लावली आहे. दोषी आढळल्यास भुजबळ फॉर्मचा पाहुणचार घेणार्‍यांची पक्षातून हकालपट्टी देखील केली जाऊ शकते.

भाजपचा वारू रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर इतर पक्षांना सहकार्य करावे, असा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला होता. हा धागा पकडत नाशिकमधील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना समर्थन दिले.

भुजबळ फार्मची पायरी चढत समीर भुजबळांना जाहीर पाठिंंबा देत फोटेसेशन देखील केले. या मुद्यावरुन पक्षात वातावरण तापले असून पक्षात दोन गट पडले आहे. मोदी व शाह यांना रोखण्यासाठी इतरांना समर्थन द्यावे, असे आदेश असले तरी गुन्हेगारी स्वरुपाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, नये असे सांगण्यात आले आहे.

अशी स्पष्ट भूमिका असताना गंभीर गुन्हे दाखल असलेले व तुरुंगवारी केलेल्या भुजबळांना पक्षाने समर्थन दिल्याने अनेकांंच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पक्षाच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व प्रीती शर्मा – मेनन यांनी भुजबळ काका – पुतण्या यांच्या भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा उघडला होता.

महाराष्ट्र सदन घोटाळा, मनी लॉण्ड्रिंग व इतर घोटाळ्यांवर आरोप केले होते. या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची ईडीने चौकशी केली होती. तसेच, या प्रकरणी त्यांना एक ते दीड वर्षे तुरुंगात मुक्काम करावा लागला होता.

एकीकडे पक्षाच्या या दोन्ही नेत्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई छेडली असताना त्यांच्याच पक्षाचे काही पदाधिकार्‍यांनी परस्पर भुजबळांना समर्थन दिले. या मुद्यावरुन पक्षात वादळ उठले आहे. पक्षाने ज्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारला त्यांनाच समर्थन दिल्याने पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याची चर्चा रंगली आहे.

भाजपला सत्ता मिळू नये, हा आमचा हेतू आहे. पण त्याचा अर्थ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवाराला समर्थन देणे हे कदापि मान्य नाही. भुजबळांना आमचा पाठिंबा नाही.

– जितेंद्र भावे, प्रदेश प्रवक्ता, आम आदमी पक्ष

मोदी व शाह हे सत्तेवर येता काम नये, ही केजरीवाल यांची भूमिका आहे. त्यामुळे वैयक्तित माझा पाठिंबा भुजबळांना आहे. पक्षाने कोणाला पाठिंबा द्यावा, हे सांगितले नाही.

– स्वप्नील घिया, प्रदेश उपाध्यक्ष, युवा आघाडी

समीर भुजबळांवर भ्रष्टाचाराचे गंभीर गुन्हे आहेत. ते सध्या या प्रकरणी जामिनावर बाहेर आहेत. गुन्हेगार स्वरुपाच्या उमेदवाराला समर्थन हे पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात आहे. आमचा पक्ष भुजबळांविरोधात आहे. ज्यांनी पक्षाला गृहीत धरत समर्थन दिले त्यांचावर कारवाई केली जाईल.

– प्रीती शर्मा- मेनन, राष्ट्रीय प्रवक्ता आम आदमी पक्ष

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!