चालत्या दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला

0

5 जण जखमी : जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द येथील घटना

 

आळेफाटा (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द गावच्या हद्दीत बिबट्याने वेवेगळ्या दुचाकीवरून जाणार्‍या दुचाकीस्वारांवर हल्ला केला. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी (दि.9) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

 

सध्या जुन्नर तालुक्यात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ऊस तोडणी चालू झाली आहे. त्यामुळे बिबट्यांचा निवारा कमी होत असल्यामुळे बिबटे सैरभैर झाले आहेत. बिबट्याचे पाळीव प्राण्यांबरोबरच माणसांवरही हल्ले होऊ लागले आहेत

 

जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द गावच्या हद्दीत ओतूर ओझर मार्गावर असलेल्या लोकेश्वर मळ्याजवळ गुरुवारी (दि.9) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने या मार्गावरून जाणार्‍या वेगवेगळ्या दुचाकींवर हल्ला करून तब्बल पाच जणांना जखमी केले आहे, अशी माहिती नारायणगाव वन परिमंडलच्या वनपाल मनीषा काळे यांनी दिली.

 

 

या हल्ल्यात दुचाकीवरील विलास लक्ष्मण वायकर, मधुकर कृष्णाजी येंधे, कैलास महादू येंधे (सर्व रा. हिवरे खुर्द ता. जुन्नर), उषा सुभाष कदम (रा. नेतवड, ता. जुन्नर) व फारुक इस्माईल इनामदार (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) हे जखमी झाले आहेत. यातील तीन जखमींना त्वरित वनविभागाने ओतूर प्रथमिक आरोग्य केंद्रात प्रथमिक उपचारासाठी दाखल करून प्राथमिक उपचार केले.

 

बिबट्याच्या हल्ल्याची बातमी समजताच जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनीही ओतूर प्रथमिक आरोग्य केंद्रात जाऊन बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. घटना घडल्यानंतर सहायक वनसंरक्षक वाय. बी. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी रात्रभर गस्त घालून ओतूर ओझर मार्गावरून येणार्‍या सर्व वाहनांना व दुचाकी चालकांना बिबट्याच्या संभाव्य धोक्याबद्दल सतर्क करण्याचे काम केले.

 

सदर जखमींना आज शुक्रवारी सकाळी वनविभागाकडून बिबट्या प्रतिबंधक लस व पुढील उपचार करण्यासाठी पुण्याच्या यशवंतराव चव्हाण मेमोरीयल हॉस्पिटल येथील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

*