Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगरच्या कन्येमुळे ठाकरे यांच्या कार्यक्रमात बदल

Share

महिला महाविद्यालय परिसरातील अस्वच्छतेची पर्यावरण मंत्र्यांसह पाहणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरच्या महाविद्यालयीन कन्येने प्रश्‍न उपस्थित केला आणि न राहवून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची पावले महाविद्यालय परिसरातील अस्वच्छतेची पाहणी करण्यासाठी वळली. जाताना त्यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनाही सोबत घेतल्याने महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले.

जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी नगरमध्ये होते. त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवकांशी गप्पा मारण्यासाठी, त्यांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माउली सभागृह विद्यार्थ्यांच्या गर्दीने खचाखच भरले होते. नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने आदित्य ठाकरे आले, तरीही विद्यार्थी त्यांची प्रतीक्षा करत होते. या संवादाच्या कार्यक्रमात राधाबाई काळे महिला महाविद्यालयाची श्रद्धा तापकीर हिने महाविद्यालय परिसरात असलेली अस्वच्छता, कुत्र्यांचा त्रास याबाबत पोटतिडकीने प्रश्‍न उपस्थित केला. ती म्हणाली, ‘आमच्या महाविद्यालयाच्या जवळच कचरा टाकण्यात येत असल्याने आम्हा वसतिगृहात राहणार्‍या मुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे.

केवळ कचराच नव्हे, तर तेथे हॉटेलमधील वेस्टेज देखील टाकण्यात येते. त्यामुळे तेथे कुत्र्यांची संख्या वाढली असून, ते कुत्रे दिवसेंदिवस हिंस्त्र होत चालले आहेत. सुमारे दोन डझन कुत्रे तेथे सतत फिरत असल्याने विद्यार्थिनींना धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सातत्याने संबंधित यंत्रणेला निवेदन दिले, प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले, मात्र काहीही फरक पडत नाही.’ तिच्या प्रश्‍न मांडण्यामागील गांभीर्य ओळखून ‘तुमचे महाविद्यालय या सभागृहापासून किती दूर आहे’ असा प्रतिप्रश्‍न केला. ‘पाच-दहा मिनिटाच्या अंतरावर’ असे उत्तर त्या विद्यार्थिनीने देताच ‘कार्यक्रम संपल्यानंतर मी स्वतः तेथे पाहणीसाठी येतो. माझ्याबरोबर पर्यटनमंत्री रामदास कदम असतील. आपण लगेच हा प्रश्‍न मार्गी लावू’ असे सांगताच विद्यार्थ्यांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.

कार्यक्रम संपल्यानंतर लगेच ठाकरे आणि मंत्री कदम यांनी महाविद्यालय परिसरात जाऊन पाहणी केली. याची माहिती तो पर्यंत महापालिका प्रशासनापर्यंत पोचली होती. ठाकरे आणि मंत्री कदम पाहणीसाठी येत असल्याचे समजताच आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रभारी आर. जी. मेहेत्रे आपल्या सहकार्‍यांसह तेथे आले. ठाकरे व कदम यांनी आयुक्तांशी चर्चा केली. ‘आजच्या आज येथे सफाई झाली पाहिजे’ अशी तंबीच मंत्री कदम यांनी दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच तेथे जेसीबी आला अन सफाईचे काम हाती घेण्यात आले. ठाकरे यांनी केवळ पाहणी करून थांबले नाहीत, तर ‘काम झाल्यानंतर मला लगेच फोटो टाका’ अशा सूचना नगरसेवक योगिराज गाडे यांना केल्या. या महाविद्यालयाकडे येणार्‍या रस्त्याचाही प्रश्‍न विद्यार्थ्यांनी मांडला. आमदार निधीतून या रस्त्यासाठी निधी मंजूर आहे. रस्त्याचे अर्धवट काम देखील झालेले आहे. ते काम तातडीने पुर्ण करून घेण्यात येईल, असे आयुक्त भालसिंग यांनी सांगितले. काम लगेच मार्गी लागल्यामुळे विद्यार्थीनींनी ठाकरे यांच्या भूमिकेचे जल्लोषात स्वागत केले.

महापालिकेचे वाभाडे
स्वच्छतेबाबत महापालिकेच्या कारभारावर सातत्याने टीका होत असते. मात्र भर सभागृहात महापालिकेच्या कारभाराचे आणि हॉटेल व्यावसायिकांच्या कृतीचे वाभाडे निघाले. शाळा, महाविद्यालय परिसरातील स्वच्छतेबाबत तरी महापालिकेने वेळीच दखल घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिवसभर व्यक्त करण्यात येत होती.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!