आदिम लगीन सोहळ्यातून संस्कृतीचे दर्शन ; बातमी वाचल्यानंतर तुमचीही मान अभिमानाने उंचावेल

0
भाऊराव रोंगटे | इगतपुरी तालुक्यात प्रथमच व नाशिक जिल्ह्यात दुसर्‍यांदा शेनवड (गरुडेश्वर) ता.इगतपुरी येथे मंगळवारी धर्मपूर्व आदिम लगीन सोहळा पार पडला.आदिवासी संस्कृती महान आहे हे दाखविण्याचा प्रयत्न यातुन केला गेला.

धर्मपुर्व लगीन सोहळा ही संकल्पना मागील वर्षी कळवण साक्री या ठिकाणी आदिवासी जाणकार बांधवांच्या उपस्थितीत पार पडला होता.

सुशिक्षित बांधवांनी सुरू केलेल्या पुढारलेपणाच्या प्रथा समाजविघातक आहेत हे आता सर्वदूर झाले आहे. पुन्हा आपल्या संस्कृतीचे, देवदेवतांचे , महापुरुषांचे गोडवे आपणच गायला हवे अशी समाजामध्ये क्रांतिकारी विचारशैली पुढे येत आहे.

याचाच हा परिपाक होय. सह्याद्रीचा राघोजी भक्त हे धर्मपुर्व लगीन सोहळा बघण्यासाठी व नवरा नवरीस आशिर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आनंद सोहळ्यात नवरा मुलगा चि.भाऊसाहेब व नवरी मुलगी चि. ममता हे दोघेही सुशिक्षित आहेत. लग्नाआगोदर नवरा, कलवरी यांची बैलगाडीवरून मांडवापर्यंत वाद्यवृंद व आदिवासी कलापथक यांच्यासह मिरवणूक काढण्यात आली.मंडपात आल्यानंतर नवरा नवरीसह मंचाकडे वाद्यवृंदासह आगमन झाले.

धर्मपुर्व आदिम लगीन सोहळा का व कशासाठी याचे आदिवासी साहित्यिक व विचारवंत कृष्णकांत भोजने, शाहिर ढवळा ढेंगळे, किसन ठाकरे यांनी याबाबत मार्गदर्शन केले. मांडवमंत्र रचनाकार व कवी रमेश भोये यांनी निसर्गपूजा,धरतीपूजा व आदिवासी क्रांतिकारकांबाबत माहिती देऊन नवरा नवरी यांना लगीन सोहळ्यापुर्वी निसर्गपूजा,धरतीपूजा व आदिवासी क्रांतिकारकांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करण्यास सांगितली व पुष्पांजली अर्पण करण्यास सांगितले.

त्यानंतर मंचावर दोन्ही परिवारातील आई-वडील, मामा-मामी, नवरा-नवरी, कलवर्‍या व दोन्ही बाजूकडील पंचांना आमंत्रित करण्यात आले.आदिवासी गायक राजाराम चौरे यांनी पहाडी आवाजात मांडव मंत्र गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.

धर्मपुर्व आदिम लगीन सोहळ्या दरम्यान आदिवासी कलापथकांनी विविध नृत्याविष्काराचे सादरीकरण केले.यावेळी वधू-वराने पारंपारिक आदिवासी वेशभूषा केली होती.

निवासी अस्तित्व, अस्मिता व संस्कृतीचे संवर्धन करणार्‍या या परिवर्तनवादी आदिवासी ऊच्चशिक्षीत जोडप्याचे व कुटूंबाचे आदिवासी संस्कृती संवर्धन मंडळ, इगतपुरी तसेच तालुक्यातील आदिवासी समाजातर्फे तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

*