Friday, April 26, 2024
Homeनाशिकआधार क्रमांक लिंक नसणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार

आधार क्रमांक लिंक नसणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार

नाशिक । प्रतिनिधी 

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्‍ती योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज भरण्याची गरज नाही. बॅंकाकडूनच थकबाकीदारांची यादी घेण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी कर्जदारांची स्वतंत्र यादी येत्या आठवडाभरात प्रसिद्ध करण्यात येणार येणार आहे.

- Advertisement -

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अमंलबजावणीच्या पूर्वतयारीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून महसूल, सहकार  व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्याच्या प्रधान सहकार सचिव आभा शुक्ला यांनी चर्चा केली. यावेळी सर्व विभागीय आयुक्‍त, उपनिबंधक बैठकीत सहभागी झाले होते.

शासनाची कर्जमुक्‍ती योजना व ती राबविण्याबाबतची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून देण्यात आली.  दि. १  एप्रिल ते दि. ३१  मार्च २०१९ पर्यंत कर्ज घेतलेले व दि.३० सप्टेंबरपर्यंत दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ दिला जाणार आहे. कर्जाची रक्‍कम गृहीत धरता अनेकांची थकबाकी ही दोन लाखांच्यावर जाणार असल्याचे समजते.

मात्र, पहिल्या टप्प्यात फक्त दोन लाखांपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचीच माहिती गोळा करण्याची सूचना प्रधान सहकार सचिवांनी दिली.  योजनेचा लाभ देताना संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देण्यात येणार असून अद्याप ज्यांची आधारकार्ड बँक खात्याशी जोडली गेली नसतील अशा शेतकऱ्यांची माहिती बँकांनी तात्काळ सादर करावी असे शासनाचे निर्देश आहेत.

या योजनेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्या-त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समितीही गठित करण्यात आली आहे. सर्व बॅंकांना आठ दिवसांत शेतकऱ्यांची माहिती पाठविण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या