आढळा खोर्‍याचा संपर्क तुटला

0

सोमठाणा येथील म्हाळुंगी नदीवरील पूल गेला वाहून

समशेरपूर (वार्ताहर) – अकोले तालुक्यातील उत्तर आदिवासी भागातील आढळा खोर्‍यातील दळणवळणाचा एकमेव महत्त्वाचा असलेल्या ठाणगाव, तिरडे कोकणवाडी, विश्रामगड या मार्गावरील सोमठाणा येथील म्हाळुंगी नदीवरील दगडी फरशी पूल पुराच्या पाण्याने मध्यभागी फुटून वाहून गेला. त्यामुळे संपूर्ण दळणवळण खंडित झाले आहे.
बांधकाम निकृष्ट असल्याने पुराच्या पाण्याने फरशी फुटून वाहून गेली. त्यामुळे मार्ग पूर्ण बंद झाला आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले, असून परिसराचा संपर्क तुटला आहे. गतवर्षीच हा रस्ता वाहून गेलेला आहे. परंतु शासनाने त्यात गतवर्षी माती भराव करून मलमपट्टी करून मार्ग चालू केला. आणि या वर्षी पहिल्याच पावसात पुन्हा माती भराव वाहून जाऊन रस्ता पूर्ण बंद झाला.
यामुळे जनता मरण यातना सहन करीत आहे. शालेय विद्यार्थ्यांची कुचंबणा होऊन काही मुलाची शाळा बंद झाली आहे. एसटी बंद झाली आहे. फुटलेल्या पात्यातून दोन पर्यटक वाहून गेले होते परंतु ग्रामस्थांनी त्यांना वाचविले. हा प्रकार घडल्यानंतर कोणीही पलीकडे जाण्याचे धाडस करीत नाही. मार्ग बंद पडल्याने शाळा बंद, आजारी माणसाना दवाखान्यात नेता येत नाही. बाजार बंद, तालुक्याला जाणे बंद अशा नानाविध प्रश्नांनी जनता त्रस्त होत आहे.
यामुळे परिसरातील म्हाळुंगी, सोमठाणा, शिवाजीनगर, तिरडे, शेरेवाडी, कोकणवाडी, पेढेवाडी, बिताका, पाचपट्टा या परिसरातील जनतेला त्रासाचा सामना करावा लागत आहे. शासनाने त्वरित घटनास्थळांची पाहणी करुन रस्ता दुरुस्त करावा अन्यथा आदिवासी रस्त्यावर उतरतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गोगा गोडे, पोपट गोडे, काशिनाथ गोडे, रामू गोडे, पांडूरंग गोडे, म्हसू गोडे, लीलाबाई जाधव, उत्तम गोडे, रामजी गोडे यांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*