आढळा, कोटमारा धरण ओव्हरफ्लो

0

लाभधारक शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण

देवठाण (वार्ताहर) – तालुक्यातील आढळा विभागासह संगमनेर व सिन्नर तालुक्यातील काही गावांना वरदान ठरणारे देवठाण येथील 1060 दलघफू साठवण क्षमतेचे आढळा धरण सोमवारी सकाळी 11 वाजता पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरुन सायकाळी 6 वाजता 277 क्युसेकने पाणी वाहू लागले आहे.
आढळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने धिम्यागतीने धरणात पाण्याची आवक सुरु असून सांडव्यावरुन सकाळी 11 वाजता 255 क्युसेक तर सायं.277 क्युसेक पाणी ओसंडून वाहू लागले आहे. अकोले तालुक्यातील देवठाण, वीरगाव, पिंपळगाव निपाणी, गणोरे, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग, राजापूर, वडगाव लांडगा, निमगाव भोजापूर, धांदरफळ, पिंपळगाव कोंझिरा, चिकणी, चिखली, सिन्नर तालुक्यातील कासारवाडी, नळवाडी अशा तीन तालुक्यातील सोळा गावांना या धरणाच्या पाण्याचा लाभ होतो.
या तीन तालुक्यांच्या लाभ क्षेत्रातील तीन हजार 914 हेक्टर सिंचन क्षेत्रा रब्बी हंगामासाठी या पाण्यावर अवलंबून आहे. धरणातील 975 दलघफू सिंचनासाठी उपयुक्त पाणीसाठा असून उर्वरीत 85 दलघफू मृत पाणीसाठा आहे. सकाळपासून पर्यटक शेतकर्‍यांची धरणावर वर्दळ होती. मोटार सायकल, चारचाकी वाहने थेट धरणाच्या भिंतीवरुन गेटकडे येवून गेट जवळ थांबत होती. ही बाब सुरक्षितेच्या दृष्टीने चिंताजनक दिसत होती.
सन 1979 पासून ते 2017 पर्यंत धरण 24 वेळा पुर्ण क्षमतेने भरलेले आहे. धरणाची उंची 40 मीटर असून पाणलोट क्षेत्र 177 चौ.की.मी. आहे. सांडव्याची लांबी 144 मीटर असून धरणाची लांबी 623 मीटर आहे. सांडव्याची वहन क्षमता 1582 घनमीटर आहे.
धरणाला दोन कालवे असून उजवा कालवा 11.80 किमी लांबीचा असून डावा कालवा 8.80 किमी लांबीचा आहे. डाव्या कालव्याची वहन क्षमता 42 क्यूसेक व उजव्या कालव्याची सिंचन क्षेत्र 2422 हेक्टर असून डाव्या कालव्याचे सिंचन क्षेत्र 1492 हेक्टर आहे. खरीप हंगामासाठी साधारणपणे 780 हेक्टर सिंचन होते.
धरण ओव्हरफ्लो झाल्याने लाभधारक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून पर्यटकांनी मात्र धरणाकडे ये जा सुरु केली असून पर्यटकांची एकच गर्दी धरण परिसरात दिसत आहे. आढळा परिसराला वरदान ठरलेले हे धरण असून सोळा गावांतील लाभधारक शेतकर्‍यांचे जीवन अवंलबून आहे.

संगमनेर (प्रतिनिधी)-तालुक्यातील कच नदीवरील बोटा परिसरातील 1 हजार 155 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचे कोटमारा धरण सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भरून वाहू लागल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.


ब्राह्मणवाडा पाणलोट क्षेत्रात प्रचंड प्रमाणात पावसाचे तांडव सुरु असल्याने तेथून उगम पावणारी कच नदी भरून वाहू लागली आहे. बेलापूर बदगी तलावही सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला व हे पाणी आंबीदुमाला, कुरकुटवाडी, बोटा परिसरातील कोटमारा धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरवात झाली. पाण्याची आवक माठ्या प्रमाणात झाल्याने सोमवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान हे धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले आहे.

 

LEAVE A REPLY

*