आढळेचे पहिले रब्बी आवर्तन पुढील वर्षी

0
वीरगाव (वार्ताहर) – यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसामूळे अकोले तालुक्यातील देवठाणचे आढळा धरण परतीच्या पावसापर्यंत पाच वेळा ओव्हरफ्लो झाले. लाभक्षेत्राच्या भुजलस्तरातही बर्‍यापैकी वाढ झाल्याने रब्बी हंगामाची पिके शेतात उभी राहूनही अद्याप लाभक्षेत्राकडून पाणीमागणी न झाल्याने रब्बीच्या पहिल्या आवर्तनाचे चाक बहुधा नव्या वर्षातच फिरेल.
अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील 3914 हेक्टर क्षेत्राचे सिंचन या धरणातील 1060 दलघफू पाण्यावर अवलंबून आहे. वीरगाव, देवठाण, हिवरगाव आंबरे, पिंपळगाव निपाणी, गणोरे, जवळे कडलग, वडगाव लांडगा, चिकणी, निमगाव भोजापूर,राजापूर,कासारवाडी,नळवाडी,धांदरफळ,पिंपळगाव कोंझिरा या गावांना धरणाच्या आवर्तनाचा लाभ होतो.
दरवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच रब्बीच्या आवर्तनाची मागणी जोर धरते.यंदा मात्र लाभक्षेत्रातील साठवण तलाव,कोल्हापूर बंधारे,शेततळी आणि विहीरींमध्ये पाणीपातळी चांगली टिकून आहे.अजूनपर्यंत लाभक्षेत्रातून पाण्याची मागणी होत नसल्याने रब्बीच्या पाणी नियोजन बैठकीचे आयोजन केले नसल्याची माहिती जलसंपदाचे उपविभागीय अभियंता जी.जी.थोरात यांनी दिली.धरणाचा आज अखेर पाणीसाठा 1039 दलघफू असल्याचे त्यांनी सांगितले.
मागच्या वर्षी पहिले आवर्तन 25 डिसेंबर रोजी सोडण्यात आले होते.लाभक्षेत्राची अजुनपर्यंत टिकून असलेली पाणीपातळी आणि विहीरींमधील पाणी विचारात घेता आवर्तनाची मागणी अजून सुरु झाली नाही.त्यामूळे आढळेच्या यावर्षीच्या पहिल्या आवर्तनाचे पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यातून शेतात खेळण्यासाठी 2018 सालचा जानेवारी उजाडण्याची शक्यता आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा मागणी मागणी अर्जातही मोठी घट होईल. आढळेच्या पहिल्या आवर्तनापुर्वी मात्र कालवे, चार्‍या, पोटचार्‍या यांची स्वच्छता मोहिम जलसंपदा खात्याने हाती घेऊन लाभक्षेत्राला पुर्ण क्षमतेने पाणी मिळेल याची दक्षता घेण्याची गरज असल्याचे अनेक लाभधारकांनी सांगितले.

अगस्ती सहकारी साखर कारखाना आणि संगमनेर सहकारी साखर कारखाना यांच्या सहकार्याने श्रमदानातून कालवे आणि चार्‍यांची दुरुस्ती केली जाईल. लाभधारकांना पुर्ण क्षमतेने पाण्याचा लाभ मिळण्यासाठी जलसंपदा खाते प्रयत्नशील राहिल.उजव्या आणि डाव्या कालव्यातील अनावश्यक गवत, झाडेझुडपे यामूळे पाणी वहनात अडचणी येतात. यासाठीची स्वच्छता मोहिम तातडीने सुरु करण्यात येईल.
जी.जी.थोरात
उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग

LEAVE A REPLY

*