Friday, May 3, 2024
HomeUncategorizedमनोधैर्य वाढवणारा विजय

मनोधैर्य वाढवणारा विजय

– अवंती कारखानीस

माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी महिला पत्रकार प्रिया रमानी यांच्यावर दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात प्रिया रमानी यांना नवी दिल्लीच्या एका न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे.

- Advertisement -

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी रवींद्रकुमार पांडे यांनी म्हटले की, लैगिंक शोषण हे आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाचे खच्चीकरण करण्याचे काम करते. एखाद्या व्यक्तीची सुरक्षितता ही सन्मानाच्या आधारावर करता येत नाही. सामाजिक प्रतिष्ठा लाभलेला व्यक्ती देखील लैंगिक शोषण करु शकतो, हे या प्रकरणातून सिद्ध झाले आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

एशियन एजच्या निवासी संपादक सुपर्णा शर्मा यांनी एम.जे. अकबर यांच्यावर शोषणाचे आरोप केले होते. शर्मा यांच्या मते, 1993-96 या काळात एम. जे. अकबर हे त्यांचे बॉस होते आणि तेव्हाच त्यांनी असभ्य वर्तन केले होते. रमानी यांच्या निकालानंतर सुपर्णा शर्मा यांनी म्हटले की, मीटू प्रकरणात कदाचित पहिल्यांदाच न्यायालयाने म्हटले की, आपण न्यायालयाकडे दहा किंवा वीस वर्षांनी आलात तरी आम्ही आपल्या मतांवर विश्वास ठेवू.

दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीची प्रतिष्ठा महिलांच्या आत्मसन्मानापेक्षा मोठी होऊ शकत नाही. या निर्णयाच्या वेळी न्यायालयाने म्हटले की, आपली प्रतिष्ठा एखाद्या महिलेच्या अब्रुपेक्षा मोठी नाही. दिल्ली न्यायालयाचा हा एक चांगला निर्णय असून यामुळे महिलांच्या मनोधैर्यात उंचावले आहे.

2018 मध्ये मीटू अभियान भारतात जोरदारपणे राबवण्यात आले. यात मोठ्या सेलिब्रिटींविरुद्धचे आरोप समोर आले. बॉलिवूड आणि माध्यमातील लैंगिक शोषणावरुन आंदोलन पेटले होते. अनेक महिला पत्रकार आणि नायिकांनी उघडपणे चर्चा केली. सुपर्णा शर्मा म्हणतात की, या निर्णयामुळे दोन-तीन पातळीवर परिणाम हाणार आहे. मीटू अभियानानंतर एक नेरेटिव्ह तयार झाला आहे की, जेव्हा मुली एखाद्या मोठ्या व्यक्तीचे नाव घेतात तेव्हा त्यांच्यावर आरोप होतात, मात्र त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला देखील दाखल केला जातो.

रमानी यांच्या प्रकरणात शंभर कोटींचा मानहानीचा दावा होता. 20-30 वकिलांची टीम आणून फिर्यादीला धमकावले जाते. परंतु आता निकालाने लोकांना भिती घालण्याची शक्ती कमी होऊ शकते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एम.जे. अकबर यांच्यावर आरोप करणार्‍या महिलांची संख्या 20 हून अधिक आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर बर्‍याच प्रतिक्रिया पाहवयास मिळत आहेत. महिला पत्रकार, लेखकांनी देखील प्रिया रमानी यांच्या हिंमतीला दाद दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निकालाने महिलांचे मनोधैर्य वाढणार आहे. अडीच वर्षांपासून हा खटला सुरू होता. त्या बंगळूरला राहतात, पत्रकार आहेत. या खटल्यासाठी त्या सतत दिल्लीला येत होत्या. त्यांचे धाडस पाहून अनेकांना जगासमोर सत्य आणण्याची प्रेरणा मिळाली आहे.

मीटू चळवळीनंतर नोकरदार महिलांसाठी कार्यालयातील वातावरण बदलले आहे. मात्र न्यायालयाने म्हटले की, समाजातील ताकदवान लोक शोषण करु शकतात. मात्र एक नवा दृष्टीकोन तयार होत असून भविष्यात एखादी महिला मीटू सारखे प्रकार समोर आणेल, तेव्हा त्याकडे गांभीर्याने पाहिले जाईल.

एम.जे. अकबर यांच्याविरोधात अनेक महिलांनी आरोप केले आहेत. दिल्ली न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा आहे. या निकालाने यापुढे नोकरदार महिलांचे लैगिंक शोषण होणार नाही, असे ठामपणे म्हणता येणार नाही. मात्र लहानसहान गोष्टीतील विजयाने समाजात बदल होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या