Blog : तुला या बुटांनी चालता येते? त्याने निरागसपणे विचारले तेव्हा मी खो खो हसले…

0

माझे आईवडील खूप गरीब आहेत. त्यांच्या काळजीचे मुख्य कारण होते मी. मी मोठी झाले तेव्हा माझ्या सभोवतलाच्या सर्वांनाच माझ्या लग्नाची काळजी वाटायला लागली. माझ्यासारख्या काळ्या आणि बुटक्या मुलीला नंतर नवरा मिळणार नाही असेही ते म्हणत असत.

तेव्हा चेहऱ्यावर भरपूर पावडर फासणे आणि उंच टाचांचे बुट घालून चालणे हा माझा नित्यक्रम होऊन बसला. पण त्यामुळे मला होतकरू स्थळांकडून मला नकार येत असे.

मला स्वयंपाक करता येतो का? मी किती कमावते असे प्रश्न मला कठीण जात. त्यातही कुणी जरा चालून दाखव, किंवा माझे केस खरे आहेत की खोटे हे बघण्यासाठी ते ओढून पाहत तेव्हा तर मी फार अवघडून जाई.

माझ्या नवऱ्याची पहिली भेट मला चांगली आठवते. तेव्हा आम्ही घराबाहेर जवळच असलेल्या शेतात एकत्र भेटलो. खरे तर मला असे भेटणे फारच घृणास्पद वाटत होते. पण मी त्याच्याशी भेटून बोलावे यासाठी माझ्या घरच्यांनी फारच दबाव टाकला. त्यामुळे त्याला भेटावे लागले.

या भेटीत आम्ही शांत बसलो होतो. मी माझ्या जोड्यांकडे पाहत पहिला प्रश्न कधी विचारतो, त्याची वाट पाहत होते. तू या बुटांनी कशी काय चालते? बुटांकडे बोट करून त्याने पहिला प्रश्न विचारला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर अतिशय प्रामाणिकपणाचे भाव होते. ते पाहून मी खो खो हसत सुटले.

त्यानंतर तो म्हणाला की तुला काही विचारायचे असेल तर विचार. ते ऐकून मी क्षणभर स्तब्ध झाले. कारण असे माझ्याबाबत यापूर्वी कधीच घडले नव्हते. माझी काही प्रश्न असू शकतात याबाबत कुणीही जाणून घेतले नव्हते. मी म्हणाले की तुला कशा प्रकारच्या मुलीसोबत लग्न करायला आवडेल्?

मला अगदी तुझ्यासारखी हसणारी बायको हवी? तो उत्तरला. ‘माझी कमाई तशी कमी आहे आणि माझ्यात वेगळे असे गुणही नाहीत. पण मी कधीकधी स्वयंपाक चांगला बनवतो आणि जुनी गाणी गातो. तुला मी जर लायक वाटत असेल तर मी माझ्या आईला घेऊन येतो.’

आता आमच्या लग्नाला सहा महिने झाले आहेत. मी पुन्हा कधीही ते बूट घातले नाहीत. त्याने माझ्यासाठी आता चपला आणल्या आहेत. कामावरून आम्ही एकत्रच घरी येतो.  वाटेत आम्ही भाजीपाला विकत घेतो आणि अघळपघळ गप्पा मारतो. पण आम्ही प्रेमाबद्दल कधीही बोलत नाही. (तसे बोलण्यास आम्ही लाजतो. त्यामुळेच आतापर्यंत ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, असं एकमेकांना सांगू शकलो नाही.) अशा प्रकारे रेंगाळल्यामुळे घरी जाताना खूप वेळ लागतो. पण आम्हाला एकमेकांसोबत मैलोन्‌मैल चालायला आवडते.

  • ही आहे शमीना बेगम (१९) हिने सांगितलेली तिची साधी गोष्ट. तिच्या नवऱ्याचे नाव आहे मोमीनूल इस्लाम. दोघेही बांग्लादेशात राहणारे. यंत्रमाग कामगार आहेत. बांग्लादेशात राहणारा प्रसिद्ध छायाचित्रकार जीएमबी आकाश  याने आपल्या फेसबुकपेजवर अशा कितीतरी साध्या, सामान्य माणसांचे तळातले जगणे छायाचित्रांच्या माध्यमातून जिवंत केले आहे. त्याची फोटोग्राफी अप्रतिम आहेच शिवाय लिखाणाची शैलीही साधी सरळ आहे. त्याच्याच वॉलवरून अनुवादीत ही गोष्ट फोटोसह इथे दिली आहे.

LEAVE A REPLY

*