पंचवटीत युवकावर चाकू हल्ला; सकाळी अर्धा तास टोळक्याचा नंगानाच

0

नाशिक : शहरात मागील आठवड्यात सलग घडलेल्या खुनाच्या घटना ताज्या असतानाच आज सिनेस्टाईल मोटारसायकलने पाठलाग करून युवकावर टोळक्याने चाकुहल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी घडली. यामुळे परिसरात दहशत पसरली असून मालेगाव स्टॅण्ड पोलीस चौकीच्या मागेच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सचिन उर्फ बंडू गायकवाड असे हल्लयात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. संशयित आरोपी विकी जाधव आणि त्याच्या पाच ते सहा साथिदारांनी रामकुंड परिसरात गायकवाडवर हल्ला चढवला.

जीवाच्या भीतीने गायकवाडने मालेगाव स्टॅण्डकडे पलायन केले. मात्र, हल्लेखोरांनी त्याचा मोटारसायकलवरून पाठलाग केला. मालेगाव स्टॅण्ड पोलिस चौकीजवळ संशयितांनी गायकवाडला गाठून त्याच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. मात्र, येथून निसटून गायकवाड एरंडवाडीच्या म्हणजे त्याच्या घराच्या दिशेने पळाला.

संशयितांनी त्याचा पाठलाग सुरू ठेवत त्याच्या मानेवार, खांद्यावर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केलेत. यानंतर, संशयितांनी धूम ठोकली. भल्या सकाळी रामकुंड ते मालेगाव स्टॅण्ड या भागात सिनेस्टाईल घडलेल्या या थराराने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली. भल्या सकाळी तब्बल अर्धा तास गुंडाचा हा नंगानाच सुरू असताना पोलिसांना त्याची भणकही लागली नाही हे विशेष.

एरंडवाडी परिसरातील नागरीकांनी जखमी गायकवाडला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्याची पकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हल्लेखोर सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समजते.

LEAVE A REPLY

*