औरंगाबाद – Aurangabad
मौलाना आझाद चौकातील (Maulana Azad Chowk) प्लास्टिक बॅगच्या गोदामाला रविवारी सायंकाळी साडेपाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, गोदाम जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एका बंबाने आग आटोक्यात आणली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
नितीन भानुशाली यांच्या मालकीचे आंचल ट्रेडिंग कंपनी नावाचे गोदाम व दुकान मौलाना आझाद चौकातील रस्त्यावर आहे. सायंकाळी गोदामाला अचानक आग लागली. प्लास्टिक पिशव्या असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला स्थानिक नागरिकांनी पाचारण केले. अग्निशमन दलाने अवघ्या काही मिनिटात आग आटोक्यात आणली. या आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. तसेच आगीचे कारण देखील समजू शकले नाही. या घटनेची नोंद सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.