मिनी फुटसाल राज्य स्पर्धा आजपासून

0

नाशिक । दि. 14 प्रतिनिधी
फुटसाल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या अधिपत्याखाली फुटसाल असोसिएशन ऑफ नाशिकच्या वतीने 12 वर्षा आतील व 14 वर्षा आतील राज्य फुटसाल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 17 व 18 नोव्हेंबर 2018 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

विभागीय क्रीडा संकुल येथे या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि.17) साय. 5 वाजता सुनिल पूर्णपात्रे सरचिटणीस भारतीय फुटसाल महासंघ यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे हे असणार आहेत. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक महानगरपालिकाचे नगरसेवक मच्छिंद्र सानप , रुची कुंभारकर , शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे , अविनाश खैरनार हे उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतून निवडलेला संघ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.

यामुळे स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी फुटसाल असो. ऑफ नाशिक चे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे , सचिव दिपक निकम , नितीन हिंगमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय देशपांडे , विक्रम दुधारे , अविनाश वाघ , पांडुरंग गुरव , सातिश बोरा , अमोल आहेर , अन्वर खान , सनी रॉय , प्रशांत जोशी , राजू जाधव , मनिषा काठे आदी प्रयत्नशील आहेत.

कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिकचा लालकृष्ण सोनवणे

0

नाशिक : बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चार दिवसीय कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज लालकृष्ण सोनवणे याची निवड झाली आहे. नुकत्याच सुरत येथे झालेल्या विनू मंकड चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना लालकृष्ण ने उत्कृष्ठ गोलंदाजी करत सर्वाधिक १४ गडी बाद केले होते.त्यामुळे कुचबिहार करंडकासाठी त्याची निवड निश्चित होती.

यापूर्वी या स्पर्धेमध्ये नाशिकच्याच डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव व मुर्तुजा ट्रंकवाला यांनी महाराष्ट्र संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली होती.

दिनांक १९ नोव्हेंबर पासून २५ जानेवारी पर्यन्त भारतातील विविध मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राची ची हिमाचल, छत्तीसगड ,दिल्ली, तामिळनाडू, मुंबई, उत्तर प्रदेश,बडोदा व विदर्भ यांच्याशी लढत होणार आहे.
त्याच्या या निवडीचे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून त्यास शुभेच्छा दिल्या.

 

कुस्ती दंगलमध्ये स्टायलिश मृण्मयीच्या मोहक अदा!

0

नाशिक । दि. 14 प्रतिनिधी
झी टॉकीज वाहिनीवर महाराष्ट्राच्या कुस्तीची परंपरा दाखवणारा ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ हा कार्यक्रम 2 ते 18 नोव्हेंबरदरम्यान संध्याकाळी 6 ते 10 वाजता पाहायला मिळत आहे.

या कार्यक्रमात कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, फर्जंद, मोकळा श्वास, पुणे व्हाया बिहार यांसारखे अनेक चित्रपट आणि कुंकूसारख्या लोकप्रिय मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलेली सौंदर्यवती मृण्मयी देशपांडे ही अभिनेत्री, प्रवीण तरडे यांच्याबरोबर महाराष्ट्र कुस्ती दंगलीचे समालेचन करत आहे. तिचे अभिनय कौशल्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे आणि आता तिचे सूत्रसंचालनसुद्धा घराघरांत आवडत आहे. सूत्रसंचालनाबरोबर मृण्मयीच्या रोज बदलणार्‍या स्टायलिश ड्रेसची सध्या चर्चा सुरू आहे.

2 नोव्हेंबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत कुस्तीमध्ये मृण्मयीने आजपर्यंत 13 वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत आणि राहिलेल्या दिवसांत मृण्मयीची काय स्टाईल असेल याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. याबद्दल मृण्मयीला विचारले असता ती म्हणाली, मला रंग खूप आवडतात. त्याचप्रमाणे नवनवीन स्टायलिश कपडे घालायलासुद्धा. सध्या झी महाराष्ट्र कुस्ती दंगलीमध्ये सूत्रसंचालन करताना स्वतःची स्टाईल बनवणे आणि वेगळे दिसणे अतिशय महत्त्वाचे होते आणि मला वाटते मी त्यात यशस्वी ठरले असावी.

महसुली दस्ताऐवज आता ऑनलाईन ?

0

नाशिक । दि. 16 प्रतिनिधी
सरकारी कामकाजातील जुने रेकॉर्ड शोधणे अवघड काम होते. मात्र, आता संगणकावर एका क्लिकवर हे जुने दस्ताऐवज नागरिकांना घरबसल्या मिळवता येणार आहे. नवीन वर्षात ही सेवेस प्रारंभ होणार असून नागरिकांना घरबसल्या डिजिटल दस्ताऐवज उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून यासंदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला.

जिल्ह्यात 1966 पैकी 1942 गावांतील जमीन महसूली भूमी अभिलेखांचे संगणकीकरणाचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. राहिलेल्या 24 गावांचे येत्या 15 डिसेंबरपर्यंत हे कामकाज पूर्ण करण्याचे निर्देश जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी दिले.

राज्यात 3 वर्षांपासून सुरू असलेल्या ब्रिटीशकालीन दस्तांच्या संगणकीरणाच्या कामकाजाचा आयुक्त चोक्कलिंगम यांनी आढावा घेतला. त्यात, नाशिकला 16 तर मालेगावला 8 अशा 24 गावांचे कामकाज थंड पद्धतीने सुरू असल्याने संबंधिताना सूचना देत, हे कामकाज चुकाविरहित (एररलेस) येत्या 15 डिसेंबरपर्यत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नवीन वर्षात संगणकीय दस्त
राज्यात ब्रिटिशांनी जमिनी मोजण्याची पद्धत सुरू केली. तेव्हापासून ब्रिटिशकालीन नकाशानुसार भूमापन चालते. त्या आधारावर महसुली कामकाज चालते. मात्र आता दीडशे ते दोनशे वर्षांच्या नकाशे जीर्ण झाले असून त्यांच्या तुकडे झाले आहेत. अशा सगळ्या नकाशांचे 2015 पासून राज्यात स्कॅनिंग सुरू आहे. मात्र, अजूनही ते काम पूर्ण नाही. हे सगळे कामकाज डिसेंबरला पूर्ण करून नवीन 2019 वर्षात ऑनलाईन पद्धतीने जुने सातबारा, नकला यासह विविध 12 प्रकारचे दस्त नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

1 कोटी 84 लाख दस्त
नाशिक जिल्ह्यात 1 कोटी 84 लाख इतके जमिनीचे दस्त आहेत. तर भूमिअभिलेख विभागाचे 27 लाख कागद रेकॉर्ड आहेत. त्यात, महसूल विभागाच्या दस्त 1 कोटी 56 लाख एवढी संख्या आहे. जुने दस्त मिळवण्यासाठी फायली शोधणे, त्यांचे संगोपन करणे हे काम जिकिरीचे झाले आहे. लोकांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे हे सर्व रेकॉर्ड स्कॅन करून ते संगणकातील डेटामध्ये साठवले आहे. त्यामुळे आता एका क्लिवर हे रेकॉर्ड नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहे.

जलदगतीने निपटारा करा
नाशिक शहरात 16 तर मालेगावला 8 अशा 24 गावांत धिम्या पद्धतीने स्कॅनिंगचे कामकाज सुरू आहे. नाशिक तालुक्यातील व विशेषत: शहरातील कामकाजाबाबत यापूर्वीच्या बैठकांत नाराजी व्यक्त करण्यात आली. आज पुन्हा या तालुक्यांना जलद कामाचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले.

हे दस्त मिळणार
जुने सातबारा, जुने फेरफार नोंदवही, चालू खाते उतारा, कडई पत्रक, इनाम पत्रक, जन्म- मृत्यू रजिस्टर, भूमी अभिलेख विभागातून टिपण, गुणाकार बुक, आकारफोड, क. जा. प., आकारबंद, योजनापत्रक, एकत्रीकरण योजना नोंदवही, दुरूस्ती योजना, शुद्धीपत्रक, एकत्रिकरण जबाव धारिका, शेतपुस्तक, एकत्रीकरण गाव पीसी क्लास्टर रजिस्टर, वसेलवार बुक, क्षेत्रबुक, ताबेपावती, एकत्रिकरण योजनेवेळचे नकाशे.

उन्हाळ-लाल कांद्याचे दर घसरले

0
उमराणे | विनोद पाटणी दीपावली सणाच्या दहा दिवसाच्या सुट्टीनंतर कांद्याचे लिलाव सुरू झाले असले तरी भावात मात्र दररोज घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे ढग गडद झाले आहेत.
आज उन्हाळी कांद्याच्या दरात १०० रूपये तर लाल कांद्याच्या दरात २०० रूपये घसरण झाल्याने शेतकरी निराश झाले. कर्नाटक, राजस्थान व हरियाणा या राज्यात नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने भावात घसरण होत असल्याचे व्यापार्‍यांतर्फे सांगण्यात आले. मात्र हक्काच्या लाल कांद्याच्या दरात दिवसेगणिक होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
उमराणे कृषि उत्पन्न बाजार समितीत दिवाळीच्या सुट्टीनंतर दोन दिवसापुर्वी कांद्यासह शेतमाल लिलावास प्रारंभ झाला. सुट्टीनंतर बाजार सुरू होत असल्याने कांद्यास चांगला भाव मिळेल या आशेने शेतकर्‍यांनी लाल कांद्यासह उन्हाळी कांदा विक्रीसाठी बाहेर काढला आहे. मात्र दररोज लाल व उन्हाळी कांद्याचे दर घसरत असल्यामुळे उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.
आज सकाळी कांद्याच्या लिलावास समिती आवारात प्रारंभ झाला. लाल कांद्याच्या दरात २०० रूपये तर उन्हाळी कांद्याचे भाव १०० रूपयांनी कमी झाल्याचे लिलावप्रसंगी शेतकर्‍यांच्या निदर्शनास आले.
उन्हाळी कांद्यास ३०० ते ९५० रूपये असा भाव होता. सरासरी ७०० रूपये भाव उन्हाळीस मिळाला. तर लाल कांद्यास ८०० ते २२०० रूपये क्विंटलप्रमाणे भाव मिळाला. सरासरी १७०० रूपये भाव शेतकर्‍यांना मिळाला. गत महिन्यात उन्हाळी कांदा २२०० ते २३०० रूपये भावापर्यंत विकला गेला होता. दिवाळीनंतर हा कांदा ९५० ते १ हजार रूपयांपर्यंत खाली घसरल्याने शेतकरी निराश झाले आहेत.
वाहनांच्या गर्दीने आवार फुलले
चांगल्या दराच्या अपेक्षेने तळ हातावरील फोड्याप्रमाणे जपलेला लाल कांदा शेतकरी चाळीबाहेर काढत आहे. आज उमराणे बाजार समितीत ९३१ वाहनांव्दारे लाल कांदा तर ३५१ वाहनांव्दारे उन्हाळी कांदा विक्रीसाठी शेतकर्‍यांनी आणल्याने संपुर्ण आवार वाहनांच्या गर्दीने गजबजून गेले होते. मोठ्या प्रमाणात आवक झाल्यांने रात्री उशीरापर्यंत लिलाव सुरू होते.
लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याची शेतकर्‍यांनी चाळीत चांगला भाव मिळण्याच्या आशेने साठवणूक करून ठेवली आहे. मात्र उन्हाळ कांद्यापाठोपाठ आता लाल कांद्याचे दर देखील घसरू लागले आहेत. अगोदरच चाळीतील कांदा सडल्यामुळे तसेच वजन घटल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यातच भाव देखील मिळत नसल्याने दुहेरी फटका शेतकर्‍यांना बसला आहे.
अत्यल्प पावसामुळे इकडून तिकडून पाणी उपलब्ध करून घेत लाल कांदा जगवला. संपुर्ण कुटूंबाने दिवसरात्र यासाठी परिश्रम घेतले. दिवाळीपुर्वी २ हजार ते २२०० रूपये दरात विकला जाणारा कांदा आज १ हजार २१ रूपये भावाने विकावा लागला. प्रचंड मेहनत घेत खर्चही केला पण अपेक्षित भाव मिळाले नसल्याने आगामी संपुर्ण वर्ष काढायचे तरी कसे? असा प्रश्‍न पडला असल्याची चिंता दहिवड येथील शेतकरी उत्तम चव्हाण यांनी बोलतांना व्यक्त केली.
तर चांगला भाव मिळेल या आशेने उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. १२ ते १३ ट्रॅक्टर उत्पादन देखील निघाले भावाच्या प्रतिक्षेत कांदा साठवून ठेवला होता. चाळीत कांदा सडण्यासह वजन देखील घटल्याने आर्थिक नुकसान झाले. त्यातच दर देखील अपेक्षित न मिळाल्याने निराशा पदरी पडल्याची प्रतिक्रिया वायगाव येथील शेतकरी निवृत्ती अहिरे यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केली.

डिजीपी नगर-२ येथील विखे पाटील शाळेचे बांधकाम पाडण्याची नोटीस

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी  येथील विखे पाटील फाउंडेशनच्या डीजीपी नगर मधील शाळेचे बांधकाम अनधीकृत ठरवून ते पाडण्याची नोटीस नाशिक महानगर पालिकेने बजावली आहे. विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विखे पाटील फाऊंडेशन, पुणे या संस्थेची डिजीपी नगर-२ येथे शाळेची इमारत असून या इमारतीचे अतिरिक्त बांधकाम अनधिकृत असल्याने ते पाडण्याची नोटीस महापालिकेने बजावली असली तरी महापालिकेचा हा निर्णय संशयास्पद असल्याचा आरोप शालेय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
विखे पाटील मेमोरियल शाळेने २०१२ मध्ये केलेल्या बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला महापालिकेकडून घेतल्यानंतर त्याच वर्षी नव्याने वाढीव बांधकाम केले. या कामाचाही पूर्णत्वाचा दाखला घेण्यात आला.
मात्र त्यानंतर पुन्हा केलेल्या वाढीव बांधकामाचा दाखला न घेतल्यामुळे सदर बांधकाम अनधिकृत ठरवून महापालिकेने काढण्याची नोटीस बजावली आहे. शासनाच्या कंपाऊंडींग पॉलिसी अंतर्गत अतिरिक्त बांधकाम नियमित करून घेण्यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
यासाठी शासनाने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदत दिली आहे. तसेच मुदतवाढी पूर्वी २९३३ प्रस्ताव दाखल आहेत व नवीन प्रस्तावही दाखल होत असताना महापालिकेने २९३३ पैकी केवळ विखे पाटील शाळेच्याच प्रस्तावाची छाननी करून प्रस्ताव नामंजूर केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. महापालिकेची ही भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप शाळा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये वाढली रंगत

0

पुणे । दि. 14 प्रतिनिधी
येथे सुरू असलेल्या झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये कोल्हापुरी मावळे विरुद्ध विदर्भाचे वाघ या पहिल्या सामन्यात, विदर्भाचे वाघने 2-4ने यश मिळवले आहे. तर दुसर्‍या सामन्यात, पुन्हा एकदा यशवंत सातारा संघाने 1-5ने विजय मिळवला. अंशु मलिक दुसर्‍या सामन्यातील कुस्तीवीर ठरला. दोन्ही सामन्यांमधून, राकेश तांबोलकर आणि अक्षय यांच्यातील डावाला आजचा शानदार सामना म्हणून गौरवण्यात आले.

सुप्रिया सुळे, राहुल देशपांडे, भूषण प्रधान, गौरी नलावडे, रवी जाधव, समीर धर्माधिकारी यांनी गुरुवारी झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या मंचावर उपस्थित होती. कुस्तीचा हा महामुकाबला श्री शिव छत्रपती क्रीडापीठ म्हणजेच पुण्याच्या महाळुंगे-बालेवाडी स्टेडियममध्ये आणखीन तीन दिवस रंगणार आहे.

पहिला सामना कोल्हापुरी मावळे (2) विरुद्ध विदर्भाचे वाघ(4) यांच्यात रंगला पहिला डाव 74 वजनगटातील अजित शेळके विरुद्ध अभिषेक तुरकेवाडकर यांच्यात लक्षवेधी रंगला. अखेर, कोल्हापुरी मावळेच्या अजितने अभिषेकवर 4-1ने मात केली. दुसर्‍या डावात 57 वजनगटातील बापू कोळेकर विरुद्ध विजय पाटील यांच्यात काटे की टक्कर बघायला मिळाली. या डावात, विदर्भाचे वाघमधील विजय पाटीलने 11 गुण मिळवत बापूला 3-11ने हरवले. 65 वजनगटातील तिसर्‍या डावात रावसाहेब घोरपडे विरुद्ध सोनबा गोंगाणे यांच्यात जबरदस्त डाव रंगला होता. विदर्भाचे वाघमधील सोनबाने सलग 16 गुण मिळवत यश मिळवले. चौथ्या डावात 55 वजनगटातील अंकिता शिंदे विरुद्ध सोनाली तोडकर यांच्यात तुफानी कुस्ती बघायला मिळाली.

विदर्भाचे वाघमधील सोनालीने 8 गुण मिळवत अंकिताला 3-8 ने हरवले. पाचवा डाव 86 वजनगटातील सुहास घोडके विरुद्ध मार्गरेन वॉल्टर यांच्यात रंगला या डावात आक्रमक खेळी दिसून आली. विदर्भाचे वाघमधील वॉल्टर या आंतरराष्ट्रीय खेळाडूने 16 गुण मिळवत 3-16ने सुहासला धूळ चारली. सहावा 86 पेक्षा अधिक वजनगटातील ज्ञानेश्वर जमदाडे विरुद्ध विष्णू खोसे हा कॅप्टन विरुद्ध कॅप्टन असा डाव होता. या डावातून पहिल्या दिवसानंतर आज ज्ञानेश्वर ऊर्फ माऊलीने मैदानात पुनरागमन केले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या डावात कोल्हापुरी मावळेमधील माऊलीने 11-9ने विजय मिळवला.

दुसरा सामना वीर मराठवाडा विरुद्ध यशवंत सातारा यांच्या रंगला. पहिल्या डावात 65 वजनगटातील शुभम थोरात विरुद्ध सूरज कोकाटे यांच्यात सुंदर कुस्ती बघायला मिळाली. यशवंत सातार्‍याच्या सूरजने वीर मराठवाड्याच्या कॅप्टन शुभमला 2-9ने हा डाव खिशात घातला. दुसर्‍या डावात 74 वजनगटातील राकेश तांबोलकर विरुद्ध अक्षय चोरगे यांच्यात अफलातून खेळी रंगली होती. अरुण खेंगलेच्या जागी खेळणार्‍या वीर मराठवाडाच्या राकेशने 7 गुण मिळवत अक्षयला 7-4ने हरवले. तिसर्‍या डावात 55 वजनगटातील प्रतीक्षा देबाजे विरुद्ध अंशु मलिक यांच्यात एकतर्फी डाव रंगला. अक्षरशः दीड मिनिटाच्या आत यशवंत सातार्‍याच्या अंशुने प्रतीक्षाला चितपट केले. चौथ्या डावात 86 वजनगटातील अनिल जाधव विरुद्ध जयदीप गायकवाड यांच्यात अटीतटीचा डाव बघायला मिळाला.

कौतुक डाफळेच्या जागी आज यशवंत सातारामधून जयदीप खेळला. विशेष म्हणजे 4 गुण कमवत जयदीपने अनिलला 2-4ने हरवले. पाचव्या डावात 57 वजनगटातील भारत पाटील विरुद्ध उत्कर्ष काळे यांच्यात काटा कुस्ती खेळली गेली. अखेर यशवंत सातार्‍याचा कॅप्टन असलेल्या उत्कर्षने भारतला चितपट करीत त्याचा सलग दहावा विजय मिळवला. सहाव्या डावात 86 पेक्षा अधिक वजनगटातील साईनाथ रणावडे विरुद्ध बाळा रफीक शेख यांच्यात कडवी झुंज झाली. अखेर यशवंत सातार्‍याच्या बाळाने 5गुण मिळवत 1-5ने विजयश्री खेचून आणली.

17 November 2018

0

नाशिक, दिंडोरी, धुळे मतदारासंघावर काँग्रेसचा दावा

0

नाशिक । 16 प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकिसाठी जिल्हयातील तिनही मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार द्यावा अशी आग्रही मागणी नाशिक जिल्हा कॉग्रेसच्यावतीने करण्यात आली. धुळे, दिंडोरी मतदारसंघावर दावा सांगतांनाच माजी मंत्री छगन भुजबळ स्वतः निवडणूक लढवणार नसल्यास नाशिक लोकसभा मतदारसंघही काँग्रेसकडे घ्यावा अशी आग्रही मागणी पदाधिकारयांनी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे केली. मुंबईत आज यासंदर्भात बैठक घेण्यात येवून उमेदवारांची चाचपणी करण्यात आली तसेच मतदारसंघातील सध्याच्या राजकिय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या बैठकित नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील 8 जागांसाठी इच्छुकांची तयारी व स्थानिक पदाधिकार्‍यांची मते प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, व प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आज (दि.16) जाणून घेतले. या बैठकीत हक्काच्या धुळे सह नाशिक व दिंडोरी मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी करण्यात आली. दिंडोरी मतदारसंघ जागा वाटपात राष्ट्रवादीकडे आहे. मात्र सलग तीनवेळा राष्ट्रवादीचा उमेदवार या मतदारसंघातून पराभूत झाला आहे. त्यामूळे आता ही जागा काँग्रेसला सोडण्यात यावी.

हा भाग आदिवासी बहुल असून हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसला सोडल्यास येथे उमेदवार निवडून येउ शकतो असे मतही पदाधिकारयांनी यावेळी व्यक्त केले. त्याचप्रमाणे नाशिक मतदारसंधही राष्ट्रवादीला सोडण्यात आला आहे. मात्र यंदा माजीमंत्री छगन भुजबळ निवडणूक लढविणार नसल्यास ही जागाही पक्षाने आपल्याकडे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पक्षाला मिळालेला मतदारसंघ निवडुण आणण्यासाठी सज्ज असल्याचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस शहराध्यक्ष शरद आहेर, शाहु खैरे, डॉ. हेमलता पाटील, डॉ. ममता पाटील, आश्विनी बोरस्ते, स्वप्नील पाटील, बंडुनाना भाबड, रमेश कहांडोळे, सुनील आव्हाड, काशीनाथ बहिरम, भारत टाकेकर आदी उपस्थित होते.

हे आहेत इच्छुक
नाशिक लोकसभा मतदारसंघातून माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, राहुल दिवे, बंडुनाना भाबड आदींनी निवडणुक लढविण्याची तयारी दर्शविली. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार स्व. झेड. एम. कहांडोळे यांचे पुत्र रमेश कहांडोळे, माजी आमदार काशीनाथ बहिरम, स्वप्नील गायकवाड आदींनी निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.

मालेगावला संधी द्यावी
धुळे हा काँग्रेसचा मतदारसंघ असून, या मतदारसंघातून माजीमत्री रोहिदास पाटील, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रसाद हिरे, शामकांत सनेर आदी इच्छुक असल्याचे सांगण्यात आले. मुस्लीम समाजाला काही मतदारसंघात तिकीटे देण्याचा विचार झाल्यास धुळे मतदारसंघाचा विचार व्हावा अशी मागणी मालेगावचे आमदार आसिफ शेख यांनी यावेळी केली.

लोकसभेसाठी तांबे?
पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी तरूणांनी संधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या धोरणानुसार नाशिक लोकसभा मतदारसंघातून युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी युवक काँग्रेसने केली. तांबे यांचे नाशिकशी जवळचा संबंध आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा जिल्हयात मोठा जनसंपर्क आहे. याचा फायदा पक्षाला होऊ शकते असे बैठकीत सांगण्यात आले.

गटबाजीचे दर्शन
काँग्रेसला गटबाजी नवी नाही. नाशिक जिल्हा काँग्रेस आणि गटबाजी हे तर जणू समीकरणच बनले आहे. मात्र पक्षाध्यक्ष राहूल गांधी भाजप विरोधात राण पेटवत असतांना स्थानिक काँग्रेस पदाधिकारयांमध्ये मात्र निवडणूक जवळ येवूनही एकवाक्यता दिसून येत नाही. याकरीता अधून मधून काँग्रेसच्या वरिष्ठ नेते, माजी मंत्रयांनी नाशिकमध्ये येउन काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न केला मात्र ही केवळ वरवरची मलपटटीच ठरत असल्याचे दिसून आले. आज लोकसभा निवडणुकिच्या पार्श्वभुमीवर झालेल्या बैठकितही शहर व जिल्हा पक्षातंर्गत असलेलेल्या गटबाजीचे दर्शन बैठकीत दिसून आल्याचे बघवयास मिळाले.

शहरासह जिल्हयातील अनेक महत्वाच्या पदाधिकार्‍यांनी या बैठकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. माजी आमदार शिरीष कोतवाल, अनिल आहेर, जयप्रकाश छाजेड, संपतराव सकाळे यांसह अनेक नेते बैठकीस अनुपस्थित असल्याने पक्षातंर्गत गटबाजीची जोरदार चर्चा पदाधिकार्‍यांमध्ये होती.

Social Media

26,871FansLike
5,154FollowersFollow
1,352SubscribersSubscribe
error: Content is protected !!