साडेसहा लाखांचा मुद्देमालाबरोबर दोन घरफोडे जेरबंद

0

नाशिक । दि. 25 प्रतिनिधी
शहर तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणार्‍या दोघा अट्टल घरफोड्यांना गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्यांच्याकडून 12 घरफोड्यांची उकल झाली असून, साडेसहा लाख रुपयांंचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

हसन कुट्टी (रा. म्हसरूळ, मुळे केरळ) व राजकिशोर बंगाली (रा. मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. रेकॉर्डवरील कुख्यात घरफोडे पंडित कॉलनी येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, पोसई बलराम पालकर, पोट कारवाळ, जाकीर शेख, रविंद्र बागुल अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, संजय मुळ, स्वप्नील जुंद्रे, शांताराम महाले व त्यांच्या इतर सहकार्‍यांनी बुधवारी रात्री सापळा रचला होता.

संशयित सदर ठिकाणी येताच त्यांच्यावर झडप टाकून पथकाने त्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडील चौकशी करता, त्यांनी शहरातील पंचवटी 6, म्हसरूळ2, गंगापूर 1, भद्रकाली 1, नाशिक तालुका पोलीस ठाणे 1 व औरंगाबाद 1 अशा 12 गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये सराफ दुकान, साड्या, मेडिकल स्टोअर्स, घरफोडी यांचा समावेश आहे. त्यांच्या घरांची झडती घेतली असता, त्यांनी चोरलेला मुद्देमाल काढून दिला.

यामध्ये 10 तोळे सोने, 3 किलो 570 ग्रॅम चांदी, 77 साड्या, 1 महागडे होकायंत्र,2 मोबाईल फोन, 3 लॅपटॉप, 4 एलसीडी टीव्ही असा 6 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी त्यांना पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अशी चोरीची पद्धत
हसन कुट्टी याला 7 भाषा अवगत आहेत. तो सराईत असून म्हसरूळ येथे भाडेकराराने घर घेऊन सहकुटुंब राहत होता. चोरलेल्या साड्या हातात घेऊन साड्या विक्रीचा व्यावसाय करत असल्याचे तो भासवत असे. तसेच फिरता फिरता दुकाने तसेच घरांची रेकी करून रात्री बंगालीसह शटर उचकटून चोरी करत होता. यावेळी चोरलेले चांगले मोबाईल आपण वापरत असे मात्र त्यामध्ये सीमकार्ड न टाकता त्यांचा वापर करत असे. तर मुद्दाम चोरलेले छोटे मोबाईल झोपडपट्टी, सार्वजनिक शौचालय अशा ठिकाणी सोडून देत असे. आयता मोबाईल सापडल्याने जो त्या मोबाईलचा वापर करेल तो आपोआप पोलिसांच्या जाळ्यात येत असे. व तपासाची दिशा भरकटत असे.

26 September 2018

0

2 लाख नवमतदार नोंदणीचे उद्दिष्ट

0

नाशिक । दि. 25 प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. तसेच आयोगाकडून मतदार पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार्‍या या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 2 लाख 10 हजार नवमतदारांची नोंद करण्याचे उद्दिष्ट आयोगामार्फत देण्यात आले आहे. गेल्या 24 दिवसांत 22 हजार नवमतदारांनी मतदार यादीत नावनोंदणीसाठी निवडणूक शाखेकडे अर्ज केले आहेत.

1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष छायाचित्र मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण 43 लाख 15 हजार 580 मतदार आहेत. त्यामध्ये 22 लाख 67 हजार 538 पुरुष, तर 20 लाख 47 हजार 969 महिला मतदारांचा समावेश आहे. नव्याने प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात 42 लाख 67 हजार 416 मतदार असून यात 22 लाख 37 हजार 782 पुरुष तर 20 लाख 22 हजार 536 महिला मतदारांचा सामावेश आहे. मात्र यात 29 हजार 765 पुरुष, तर 25 हजार 424 महिला मतदारांच्या संख्येत घट झाली आहे.

तर सर्व्हिस वोटरच्या संख्येत वाढ झाली असून जिल्ह्यात 7 हजार 23 सर्व्हिस वोटरची नोंद करण्यात आली आहे. यात 86 महिला तर 6 हजार 937 पुरुष मतदारांचा समावेश आहे. निवडणूक शाखेकडून गणेशोत्सवादरम्यानही विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आले. तसेच शहरातील 67 महाविद्यालयांमधूनही नवमतदारांची नोंद करण्यात येत आहे. गेल्या 24 दिवसांत प्रतिदिन सरासरी 1 हजार अर्ज प्राप्त झाल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. आजपर्यंत सुमारे 22 हजार नवमतदारांचे अर्ज निवडणूक शाखेकडे प्राप्त झाले आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

जनजागृती अभियान
मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने मतदान केंद्रांवर नागरिकांच्या माहितीसाठी याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना मतदार नोंदणी तसेच मतदार यादीमधील दुरुस्तीबाबत आवाहन करण्यासाठी चित्ररथ बनवण्यात आला आहे.

जिल्ह्यात 16 हजार दिव्यांग बांधव
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांची स्वतंत्र नोंदणी करता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने महापालिका आणि जिल्हा परिषदेकडे दिव्यांग बांधवांची यादी मागितली आहे. याखेरीज दिव्यांगांसाठी काम करणार्‍या संस्थांशीदेखील संपर्क साधण्यात येत असून त्यांनाही माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 16 हजार दिव्यांग बांधवांची यादी जिल्हा रुग्णालयाने निवडणूक शाखेकडे सोपवली आहे. तर महापालिकेने अवघे 400 दिव्यांग बांधव असल्याचे कळवले आहे. यापूर्वी या मोहिमेत 2200 दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली आहे. यादीनुसार दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचून त्यांची नोंद करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजना तात्काळ लागू करा : छगन भुजबळ

0

नाशिक । दि.25 प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने तीव्र पाणी आणि चार्‍याची टंचाई निर्माण झाली असून खरीप हंगाम शेतकर्‍याच्या हातातून गेल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात टंचाई उपाययोजना तात्काळ लागू करण्यात याव्या अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

याबाबत छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील येवला, नांदगाव, निफाड, मालेगांव, बागलाण, कळवण, देवळा, चांदवड, सिन्नर, पूर्व दिंडोरी,पूर्व नाशिकसह बहुतांश भागात जुलैपासून पाऊस नाही. जूनमध्ये थोडा फार पाऊस झाला त्यामुळे काही भागात पेरणी झाली. खरीपाच्या पिकांना जुलै-ऑगस्ट या काळात पाण्याची खूप गरज असते. मात्र पाऊस नसल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून बहुतांश गावांमध्ये टँकर सुरू आहेत.

पाऊस नसल्याने टँकरची मागणी सतत वाढत आहे. जनावरांचा चारा व जनावरांच्या पाण्याची सुद्धा मोठी समस्या निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत खरीप हंगाम तर हातातून गेलाच आहे. मात्र काही दिवसांत पाऊस झाला नाही तर रब्बी हंगामाच्याही आशा मावळणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजना तात्काळ लागू करण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी यापत्राव्दारे केली आहे.

सक्तीची वसुली थांबवा
रोहित्र नादुरुस्त झाल्यास थकबाकी भरून घेऊन मगच रोहित्र बसवून देण्याचे महावितरणकडून आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे रोहित्र फेल झाल्यानंतर थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांना पैसे भरण्याची सक्ती केली जात आहे. थकबाकी भरली तरच नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून बसून दिले जात आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांना थकबाकी भरणे शक्य नाही. त्यामुळे सक्तीची वसुली थांबवावी असेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे विजेची थकबाकी भरण्याची सक्ती न करता जिल्ह्यातील टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजना तात्काळ लागू करण्यात याव्यात अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

बुधवार, 26 सप्टेंबर 2018

0

रांजणगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
चाळीसगाव । तालुक्यातील रांजणगाव येथे शौचाहून परतणार्‍या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने शेतात नेवून अत्याचार केल्याची घटना दि.23 रोजी घडली आहे.

याप्ररकणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणगाव येथील अल्पवयीन मुलगी शौचाहून येत असताना तिला भूषण नवगीरे याने अडवून तिचे तोंड दाबून तिला बाजुला असलेल्या बाणगाव रस्त्यावरील शेतात ओढत नेले व त्याठिकाणी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस ग्रामीण स्टेशनला भूषण नवगीरे यांच्या विरोधात भा.दं.वी.कलम 376, पोक्सो 3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जगदीश मुनगीर करीत आहे.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला फैजपूरपासून प्रारंभ – अ‍ॅड.पाटील

0
जळगाव । देशात व राज्यात भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला अनेक भुलथापा देऊन सत्ता मिळविली. मात्र गेल्या चार वर्षात देशात विदारक स्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल, डिझेलची दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून सरकारच्या या कारभारावर जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून प्रहार करण्यात येणार असून दुसर्‍या टप्प्यात या यात्रेला फैजपूर येथून सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशात महागाई आणि राफेल सारखे घोटाळे उघडकीस आले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला मात्र त्यांनी यावर मौन धारण केले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात कोल्हापूर येथून जनसंघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली.

आत दुसर्‍या टप्प्यात ऐतिहासिक भुमि असलेल्या फैजपूर शहरातून दि. 4 ऑक्टोबरला शुभारंभ करण्यात येणार आहे. या यात्रेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशिलकुमार शिंदे यांसह काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार असल्याचे अ‍ॅड. संदीप पाटील यांनी सागितले. तर काँग्रेसला जेव्हा जेव्हा मरगळ आली. त्यावेळेस फैजपूरकडे मोर्चा वळवून काँग्रेस पक्षाला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे.

त्यामुळे फैजपूर येथून सुरु होणार्‍या जनसंघर्ष मोर्चातून प्रचंड उत्साह आणि ताकदीने उभारी मिळणार असल्याचे चित्र असल्याचे माजी आ.शिरीष चौधरी यांनी सांगितले. तसेच यात्रेत 10 ते 15 हजार कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रदेश सचिव डी.जी. पाटील, शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेशाम चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, युवक जिल्हाध्यक्ष हितेश पाटील उपस्थित होते.

कन्हेरे येथील दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू

0
अमळनेर । तालुक्यातील कन्हेरे येथील दोन तरुणांचा फापोरे बु.॥ येथील नदी काठावरिल गाव विहिरीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज दि 25 रोजी दुपारी 2.30 ते 3.00 वाजे दरम्यान घडली असून याबाबत अमळनेर पोलिसात रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोद करण्याचे काम सुरु होते.

याबाबत असे की समाधान जगन्नाथ पाटील (वय 30, रा. कन्हेरे), सतीश विश्वास पाटील (वय 24, रा.गंगापुरी ह.मु.कन्हेरे) हे दोघे फापोरे बु.॥ येथील गावाजवळील गाव विहिरीत दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान पडून दोघांचा मृत्यू झाला.

त्यांना अथक परिश्रमानंतर दोघानाही संध्याकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान बाहेर काढण्यात आले व त्यांचे शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी आनले व रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती.

पाचोरा प्रांताधिकारी कचरे यांना धक्काबुक्की

0
पाचोरा । पाचोरा उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, पाचोरा भाग पाचोरा राजेंद्र दिलीप कचरे यांना वाळू चोरट्याने हुज्जत व धक्काबुक्की केल्याची घटना दि.25 रोजी सकाळी 8 वाजता घडली.सरकारी कामात अडथळा केला म्हणून वाळू चोरट्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून सहा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही महिन्यांपूर्वी श्री.कचरे यांचे निवासस्थानी वाळू चोरटयांनी दगडफेक करून मुजोरी दाखविली होती.

प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांना सकाळी 8 वाजता बांबरूड महादेवाचे ठिकाणी गिरणा नदीच्या पात्रातून अवैध पध्दतीने वाळू चोर होत असल्याची गोपनीय माहीती मिळाल्याने श्री.कचरे हे त्या ठिकाणी गेले असता त्यांना महादेव रस्त्यावर 6 बैलगाड्या दिसून आल्या.त्याची चौकशी करत असतांना प्रशांत नगराज पाटील रा.बांबरूड हा मोटारसायकलवर घटनास्थळी येवून श्री.कचरे यांच्याशी हुज्जत व धक्काबुक्की करून 6 बैलगाडी यांना पळून जाण्यास मदत केली.

शासकीय कामात अडथळा केला म्हणून प्रशांत पाटील याच्यासह घटनास्थळावरून पळून गेलेले सहाही बैलगाडी चालक यांच्या विरूध्द पाचोरा पोलीसात गु.र.न. 114/18 भादवी कलम 353,379,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारात आणखी सहा अज्ञातांचा समावेश आहे.पाचोरा तालुक्यातील गिरणा नदि पात्रात मोठ्या स्वरूपात अवैध वाळू वाहतूक होत असल्याने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी कठोर दंडात्मक कार्यवाह्या सुरू केल्याने वाळू चोरट्यांचे धाबे दणाणून ह्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याबाबत त्यांचे पित्त खवळले आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी श्री.कचरे यांचे निवासस्थानी वाळू चोरटयांनी दगडफेक करून मुजोरी दाखविली होती.एकीकडे प्रातांधिकारी पर्यावरण रक्षणासाठी कर्तव्य करीत असतांना त्यांच्याच महसूल विभागातील काही? अधिकारी व कर्मचार्‍यांचे वाळू चोरट्यांशी आर्थिक लागेबांधे असल्याच्या चर्चा आहे.

याच विभागातील काही खबरे वाळू चोरट्यांना प्रांताधिकार्‍यांच्या रोजच्या लोकेशनची माहीती पूरवितात? तसेच वाळू चोरट्यांसोबत हितसंबध जोपासून महसूल विभागाच्या कार्यवाह्यांना सुरूंग लावण्याच्या प्रयत्नात असतात.या सोबतच पोलीस विभागातील काही कर्मचारी देखील ह्या प्रकारात सामिल असल्याने शहराच्या भडगाव रोड व नदिपात्रालगत वाळू चोरट्यांचा रात्रभर गोंधळ सुरू असतो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी कोंबीग ऑपरेशन राबविण्याची गरज आहे.

Social Media

26,185FansLike
5,154FollowersFollow
1,156SubscribersSubscribe
error: Content is protected !!