हिमाचल प्रदेशात ट्रेकिंगला गेलेले आयआयटीचे 35 विद्यार्थी बेपत्ता

0
शिमला – हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. त्यातच अनेक ठिकाणी बर्फवृष्टीही झाली आहे. विशेष म्हणजे या अतिवृष्टीमुळे ट्रेकिंगला गेलेल्या 35 IIT विद्यार्थ्यांसह 45 जण बेपत्ता झाले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे तिकडचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच जास्त उंचीच्या ठिकाणी बर्फवृष्टीही झाली आहे. बेपत्ता असलेला एक विद्यार्थी अंकित भाटी याच्या वडिलांनी सांगितलं की, सर्व जण हम्पता येथे ट्रेकिंगला गेले होते. त्यांना मनालीत परतायचं होतं. परंतु त्यांच्याशी संपर्क तुटला आहे.

हिमाचल प्रदेशातील अनेक ठिकाणी तुफान पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. कुल्लू, कांगरा आणि चम्बा जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. सोमवारी राज्यातील अनेक परिसरांमध्ये पावसानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी भुस्खलनदेखील झाल आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कांगरा, कुल्लू आणि हमीरपूर जिल्ह्यात मंगळवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

 

अच्छे दिन : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही वाढ

0
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज नवा उच्चांक गाठत आहेत. इंधन दरवाढ कमी व्हावी अशी मागणी सातत्याने होत असून, दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होताना दिसत आहे. सोमवारी पेट्रोलने नव्वदी पार केल्यानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी महागलं आहे.

90 रुपये प्रति लिटर असलेलं पेट्रोल लवकरच, कदाचित ऐन दिवाळीतच 100 पार करू शकतं असे स्पष्ट संकेत आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळत आहेत. भारतातल्या पेट्रोल व डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधन तेलाच्या दरांवर अवलंबून असतात. सध्या कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव प्रति बॅरल 80 डॉलर्सच्या आसपास आहे.

‘ड्रायपोर्ट’चा प्रश्न महिनाभरात मार्गी; जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक

0

नाशिक । निफाड साखर कारखान्याच्या जागेवर केंद्र शासनाकडून उभारण्यात येणार्‍या ‘ड्रायपोर्ट’ला आता विक्रीकर विभागाकडून खोडा घातला जात आहे. कारखान्याची निम्मी जागा बँकेकडे तारण आहे. उर्वरित जागेवर कुठलेही कर्ज नाही. त्यामुळे ज्या गटावर बोजा आहे, त्याऐवजी प्रत्यक्षात कारखाना जेथे आहे त्या जमिनीच्या गटांवर बोजा चढवल्यास दुसरा गट मोकळा होत तेथे ड्रायपोर्टची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

प्रशासकीय, शासकीय स्तरावरून संपूर्णपणे प्रयत्न सुरू असतानाही विक्रीकर विभागाकडून मात्र, त्यास प्रतिसाद दिला जात नसल्यानेच आज विक्रीकर अधिकारी तसेच जेएनपीटीच्या अधिकार्‍यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ड्रायपोर्ट उभारणीसंदर्भात असलेल्या अडचणी महिनाभरात सोडवल्या जातील, असे यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

‘ड्रायपोर्ट’च्या संदर्भात अडथळा ठरणारे 90 टक्के विषय आपण मार्गी लावले आहेत. उर्वरित विषयांत काही कायदेशीर बाबी आहेत त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. पुन्हा एकदा जेएनपीटीचे अधिकारी, विक्रीकर अधिकार्‍यांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर ड्रायपोर्ट विकासाबाबतचा सविस्तर अहवाल शासनाकडे सुपूर्द करणार आहोत असेही ते म्हणाले. काही विषय हे शासन स्तरावरचे आहेत, त्यामुळे याबाबत शासनाकडूनच निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले. निसाकाची आर्थिक स्थिती तकलादू झाली असून, 129 कोटींसाठी हा कारखाना जिल्हा बँकेकडे तारण आहे, तर बँकेचीही नोटबंदीत चांगलीच कोंडी झाली आहे.

दोन्ही अस्थापनांना आर्थिक पाठबळाची आवश्यकता असताना जेएनपीटीच्या माध्यमातून त्यांना एक आशेचा किरण दिसला. बंद पडलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याकडे 267.5 एकर इतकी जमीन आहे. त्यापैकी ड्रायपोर्टसाठी 108 एकरच जमिनीची आवश्यकता आहे. ती ड्रायपोर्टला दिल्यानंतरही कारखान्याकडे 160 एकर जमीन शिल्लक राहील. शिवाय 108 एकरसाठी मुद्दल असलेली 105 कोटीचे कर्जही फिटेल. याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे यापूर्वीच कारखान्याचे संचालक, बँकेचे संचालक मंडाळाची बैठकही झाली.

त्यात दोन्ही पार्ट्या राजी होताना कारखान्याच्या 108 एकर जागेवरील 105 कोटींची मुद्दल देण्यास बँक आणि कारखाना अशी दोन्ही संचालक मंडळांनी तयारी दर्शवित तसा जिल्हा प्रशासन आणि राज्य तसेच केंद्र शासनालाही संंमती दिली. शिवाय येथे संर्पू्ण खर्च हा जेएनपीटीकडून केला जाणार आहे. विशेष म्हणजे आता मनमाड-इंदूर रेल्वेमार्गालाही जेएनपीटीच्या पुढाकाराने गती प्राप्त झाली आहे. ड्रायपोर्टची उभारणीही वेगाने होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा स्थितीत आता विक्रीकर विभागाकडे घोडे आडल्याने त्यातून मार्ग काढण्याचे काम शासकीय स्तरावर सुरु आहे. त्यावर निर्णय झाल्यानंतर ड्रायपोर्टचाही मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला.

25 Septembar 2018

0

उद्या 20 ग्रामपंचायतींच्या 91 जागांसाठी मतदान

0

नाशिक । जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासह सदस्यांच्या 91 जागांसाठी बुधवारी (दि.26) मतदान होणार आहे. मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींमधील प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या. छुप्या प्रचारावर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा जोर आहे.

ऑक्टोबर ते मार्च याकाळात मुदत संपणार्‍या 25 ग्रामपंचायतींमधील 246 जागांसाठी निवडणुका होत आहेत. अर्ज माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाले असून दोन ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह सर्व जागा बिनविरोध झाल्या. एका ग्रामपंचायतीत सरपंच वगळता सर्व सदस्य बिनविरोध आले. दरम्यान, एकूण 106 जागा बिनविरोध झाल्या असून 49 जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही. तर उर्वरित 91 जागांसाठी बुधवारी सकाळी 7.30 ते दुपारी 5.30 या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक 48 जागांसाठी निवडणुका होत आहे. त्याखालोखाल त्र्यंबकेश्वरमधील 19, निफाडमधील 16, येवल्यातील 6 तर बागलाणमधील 2 जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या 48 तास अगोदर म्हणजेच सोमवारी सायंकाळी मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींमधील प्रचाराचा धुराळा बसला आहे. त्यामुळे उमेदवारांकडून आता छुप्या पद्धतीने मतदारांपर्यंत प्रचारावर भर दिला जात आहे.

दुसरीकडे मतदानाच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, बुधवारी मतदानानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी म्हणजेच गुरुवारी (दि.27) सकाळी त्या-त्या तालुक्यांच्या तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.

दोन ठिकाणी पोटनिवडणुका
जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांबरोबर 7 ग्रामपंचायतींमध्ये जनतेमधून निवडून द्यावयाच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकाही लागल्या आहेत. दरम्यान, 7 पैकी 3 ग्रामपंचायतींमध्ये एकही अर्ज दाखल झाला नाही. तर माघारीनंतर दोन सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच निफाड व कळवण तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीमध्ये बुधवारी सरपंच निवडीसाठी मतदान होणार आहे.

मनमाडला 28 पासून जिल्हा कबड्डी स्पर्धा

0

नाशिक । जिल्हा स्तरीय पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेचे 28 सप्टेंबरपासून मनमाड येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कबड्डी संघटनेचे प्रशांत भाबड यांनी दिली.

मनमाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडानागरी ,रेल्वे मैदान येथे दिनांक 28 ते 29 सप्टेंबर दरम्यान खुल्या पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन परिवर्तन सोशल अकादमीच्या वतीने जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा मनमाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जयंतराव जाधव,प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह प्रकाश बोराडे, आयोजन समितीचे अध्यक्ष आमिन शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.स्पर्धेतील विजेत्या संघास 11 हजार रुपयाचे रोख पारितोषिक रफिक खान यांच्याकडून देण्यात येणार आहे.

उपविजेत्या संघास 7 हजार 777 रुयाचे रोख पारितोषिक पापा थॉमस यांच्या कडुन, तृतीय क्रमांकाचे व चतुर्थ क्रमांकाचे 3 हजार 333 रुपयाचे पारितोषिक संतोष भालेराव, संतोष निकम यांच्या कडून देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क मोहन गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

0

सांगवीत वाळू उपसा करणारे 12 जण अटकेत

0

चार जेसीबी, ट्रॅक्टरसह दोन कोटींचा मुद्देमाल हस्तगत

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील घोड, भीमा, हंगा, सीना नदीच्या पात्रासह छोटे, मोठे नद्या नाले ओढे यातून अवैध रित्या वाळू तस्करी जोमात सुरु आहे. याबाबत कारवाई मात्र होताना दिसत नाही. प्रांताधिकारी गोविंद दाणेज याना बनपिंप्री मध्ये बेदम मारहाण करण्यात आल्याने व या प्रकरणानंतर वाळू तस्करांच्यावर जोरात कारवाई होण्याऐवजी महसूल प्रशासनाने श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भीमा आणि घोड नदीच्या संगमाजवळ पोलीस उपअधीक्षक संजय मीना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या संयुक्त पथकाने वाळू तस्करांच्या विरोधात दमदार कारवाई केली. त्यात चार जेसीबी यंत्र चार ट्रॅक्टर अंदाजे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल आणि अवैध वाळू उपसा करणार्‍या 12 जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई उशिरा पर्यंत सुरु होती.

तालुक्यात वाळू तस्करांना मोकळे मैदान मिळाले असून महसूल प्रशासनाच्या कारवाई नंतरही गावगावात वाळूचा अवैध उपसा सुरूच आहे. यावर कारवाई होताना अडचणी येत असून बनपिंप्री शिवारात प्रांताधिकारी यांच्यावर झालेला हल्ला यातून महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांनी गौण खनिज आणि वाळूच्या विरोधात पोलीस संरक्षणाशिवाय कारवाई करणार नाही असे निवेदन दिले. त्यानंतर आणि महसूल कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात आणि पोलीस प्रशासन यांच्यात सुरू असलेला अंतर्गत वाद सुरु झाला. घोड, आणि भीमा नदीच्या संगममाजवळ घोडच्या बंधार्‍या जवळ अवैध रित्या वाळू उपसा सुरु असल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांना मिळाल्यांनतर पोलीस उप अधीक्षक जयंत मीना यांच्यासह उविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या संयुक्त पथकाने सांगवी हद्दीत नदीच्या पात्रात कारवाई केली. त्यात सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात वाळू उपसा करणारे चार जेसीबी यंत्र आणि ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. तसेच विनापरवाना वाळू उपसा करणारे 12 वाळू तस्करांना ताब्यात घेतले आहे. सायंकाळी उशिरा कारवाईला सुरुवात केल्याने उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

जिल्हाधिकार्‍यांच्या डोळ्यात अंजन
तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. महसूल प्रशासन कारवाई करत असले तरी वाळू तस्करी बंद होत नाही. श्रीगोंद्याच्या तहसलीदाारांची वाळू व्यावसायिकाबरोबरच्या हवाई सफर बाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यानंतर प्रांताधिकारी दाणेज यांच्यावर वाळू तस्करांनी हल्ला केला. यानंतर पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी वादग्रस्त वक्त्यव्य केले. तेव्हा महसूल कर्मचारी आक्रमक झाले. जिल्हाधिकार्‍यांनी पोवार यांच्याकडील वाळू बाबत सर्व तपास काढून घेण्याबाबत पोलीस अधीक्षकांना पत्र दिले. या वेळी पोलीस पथकाने ही कारवाई करणे म्हणजे महसूल प्रशासन कुठे तरी कमी पडत असेल! अशी घटना जिल्हाधिकारी यांच्याच डोळ्यात अंजन घालणारी असल्याबाबत चर्चा आहे.

गणेश मंडळाचे स्टेज काढण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी

0

परस्परविरोधी फिर्यादी दाखल, चौघे अटक

संगमनेर (प्रतिनिधी) – गणेश मंडळांचे स्टेज काढण्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी वैदुवाडी येथे घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून चौघांजणांना पोलिसांनी अटक केली आहे.  वैदुवाडी येथे एकाच रस्त्यावर दोन गणेश मंडळांनी गणेश स्थापना केली होती. रविवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी संदीप साहेबराव शिंदे याने दुसर्‍या मंडळाच्या लोकांना आमची गणेश विसर्जन मिरवणूक काढायची आहे, तेव्हा तुमचे स्टेज लवकर काढून घ्या असे म्हटले, त्यावरुन राम चंद्रभान शिंदे, किरण माथा शिंदे, विनोद राजू शिंदे, अशोक सवरग्या शिंदे व इतर 9 जणांनी संदीप शिंदे यास शिवीगाळ करत दमदाटी करत काठी व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत तो जखमी झाला. याबाबत संदीप शिंदे याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील 13 जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 314/18 भारतीय दंड संहिता 143, 147, 149, 324, 504, 506 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार करत आहेत.

तर परस्पर विरुद्ध फिर्यादीत अशोक सवरग्या शिंदे यांनी म्हटले आहे की, सागर शिंदे यास तुमचे गणपतीचे स्टेज काढून घ्या, इतका वेळ कशाला लागतो. तुम्हाला सकाळीच सांगितले होते. आमची गणेश विसर्जन मिरवणूक काढायची आहे. असे म्हणाल्याचा सागर भाऊसाहेब शिंदे यास राग आला. तो व त्याच्याबरोबर राजू मुस्लीग्या शिंदे, सवरग्या रामा शिंदे, अशोक साहेबराव शिंदे व इतर 20 जणांनी तेथे येऊन फिर्यादी व साक्षीदारांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्यांनी, लोखंडी गज, दगड, बॅटने मारहाण केली. शहर पोलिसांनी अशोक सवरग्या शिंदे यांच्या फिर्यादीनुसार वरील 20 जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 315/18 नुसार दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. सदर गुन्ह्यांमध्ये अशोक सवरग्या शिंदे, संदीप साहेबराव शिंदे, दिपक ऊर्फ राजू मुस्लीग्या शिंदे, अशोक साहेबराव शिंदे या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Social Media

26,180FansLike
5,154FollowersFollow
1,151SubscribersSubscribe
error: Content is protected !!