Breaking : बंधाऱ्यात अडविलेले पाणी पोलीस संरक्षणात सोडले

0

सार्वमत ऑनलाईन 

सोनेवाडी( वार्ताहर) – जायकवाडीला सोडलेले पाणी गोदापात्रातील बंधार्‍यांत अडविल्याने जायकवाडी धरणात अपेक्षीत पाणी पोहचले नाही. त्यामुळे अडविलेले बंधार्‍यांतील पाणी सोडून देण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिल्याने गोदाकाठचा शेतकऱ्यांमध्ये नाराजीजे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार (दि.१६ नोव्हेंबर) रोजी सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात डाऊच खुर्द व हिंगणी बंधाऱ्यातून 63.42 दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीस सोडण्यात आले. दरम्यान जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये या मागणीसाठी खासदार सदाशिव लोखंडे सडे बंधारा येथे पोहचले आहे.

Live Update :
खासदार सदाशिव लोखंडे सडे बंदारा येथे जाऊन पाणी न सोडण्याची मागणी
पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह 50 पोलिसांचे पथक बंधाऱ्याजवळ तैनात
जमावबंदी आदेश असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी बंधाऱ्याकडे जाण्यास टाळले
पाणी सोडल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून साईमंदिरात निषेध सभेचे नियोजन
हिंगणी बंदरावरून कारवाईला सुरुवात नाही
डाऊच खुर्द बंधार्यावर मशीन जाण्यास परिस्थिती नसल्याने पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच खोलले बंधाऱ्याचे फाटके

Video : नाशिक शहरात हजारो विनाहेल्मेट धारकांवर कारवाई

0

नाशिक दि. १६ प्रतिनिधी | अनेक दिवसांपासून हेल्मेटसक्ती मोहीम थंडावलेली असताना नाशिक शहर पोलिसांकडून आज शहरातील विविध भागांत हेल्मेट ड्राईव्ह मोहीम हाती घेण्यात आली.

या मोहिमेंतर्गत विना हेल्मेट वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे शहरातील मध्यवर्ती सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकीधारकांची प्रचंड गर्दी झाली होती.

या मोहिमेत शहरातील १३ पोलीस ठाण्यांचा सहभाग असून विनाहेल्मेट चालकांकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला.

काही वाहनधारकांकडे यावेळी दंड भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे वाहन जमा करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या.

ज्यांनी दंड भरला नाही त्यांच्या गाड्या दंड भरल्यानंतर सोडण्यात आल्या. तसेच यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन केले.

दरम्यान, कारवाईची वार्ता अनेक ठिकाणी सोशल मीडियातून काल रात्रीपासून पसरली होती. पोलिसांकडून एक पत्रक जारी करण्यात आले होते त्यात कागदपत्र आणि हेल्मेट सोबत बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी आज दुचाकीला आराम देत रिक्षाने प्रवास केला.

या ठिकाणी झाली कारवाई

आडगाव पोलीस ठाणे – हॉटेल मिरची ढाबा आणि जत्रा हॉटेल

म्हसरूळ पोलीस ठाणे – राज स्वीट आणि ओंकार बंगला

पंचवटी पोलीस ठाणे – काट्या मारुती चौक आणि रामवाडी पूल

भद्रकाली पोलीस ठाणे – शालीमार चौक आणि काठे गल्ली सिग्नल

मुंबईनाका पोलीस ठाणे – मुंबई नका सर्कल आणि अशोक मार्ग

सरकारवाडा पोलीस ठाणे – सद्भावना पेट्रोल पंप आणि भवानी मार्ग

गंगापूर पोलीस ठाणे – होल्मार्क चौक आणि एबीबी सर्कल

सातपूर पोलीस ठाणे – अंबड टी पॉइंट आणि रिलायंस पेट्रोल पंप

अंबड पोलीस ठाणे – त्रिमूर्ती चौक आणि सिडको हॉस्पिटल

इंदिरानगर पोलीस ठाणे – कलानगर आणि पाथर्डी फाटा

उपनगर पोलीस ठाणे – डीजीपी नगर आणि तपोवन

नाशिकरोड पोलीस ठाणे – पोलीस स्टेशन समोर आणि दसक

देवळाली कॅम्प पोलीस ठाणे – भाटीया कॉलेज आणि झेंडा चौक

जि. प. उपाध्यक्षांकडून अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे कौतुक

0

वाडीवऱ्हे (वार्ताहर) | गोंदे दुमाला येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून अंगणवाडी बालकांच्या आहाराकडे योग्य लक्ष देऊन त्यांची विशेष काळजी घेत असल्यामुळेच नाशिक जिल्हात बालकुपोषनाचे प्रमाण सर्वात कमी झाले आहे. शासनाने बाल कुपोषण कमी झाल्यामुळे नाशिक जिल्हा परिषेदेला विविध पुरस्काराने सन्मानित केले. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यामागे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, यांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांनी केले.

त्या गोंदे दुमाला येथे बाल दिना निमित्ताने इगतपुरी तालुका आकार बाल शिक्षन उपक्रमा अंतर्गत कार्यक्रमा निमिताने बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर बालविकास अधिकारी मुंडें इगतपुरी तालुका बालविकास अधिकारी वंदना सोनवणे, जि प सदस्य उदय जाधव, पं स सदस्या जिजाबाई नाठे, पं स सदस्य सोमनाथ जोशी, ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप नाठे, परमेश्वोर नाठे आदी उपस्थित होते.

त्यापुढे म्हणाल्या की, माझी कन्या भाग्यश्री योजना , पोषण आहार , गरोदर माता ओटी भरणे , माता समुपदेशन ,भारत रत्न डॉ अब्दुल कलाम अमृत आहार योजना ,स्तनपान व शिशु पोषणांचे महत्व आदी विषयांवर उपस्थित अंगणवाडी सेविका ,मदतनिस ,आशा यांनी शासन राबवत असल्याल्या या विविध योजनांची योग्य माहिती व सर्व योजना अंमलात आणल्यास आपला जिल्हा कुपोषण मुक्त होईल त्या साठी तुमचा सहभाग महत्वाचा असल्याचे नयना गावित यांनी सांगितले.

या वेळी गोंदे दुमाला ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने यांनी ग्रामपंचायत च्या वतीने चार अंगणवाड्यासाठी शेगडी ,सिलेंडर, व किचनचे भांडे, आदी वस्तूंचा सेट ग्रामपंचायत ने भेट दिला असून या वेळी वैशाली सोनवणे, सीताबाई नाठे, सुनंदा सातपुते ,सुरेखा सातपुते , मनीषा सूर्यवंशी, सुनील नाठे, भाऊसाहेब कातोरे, गणेश शेळके, दत्तु नाठे , आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन वंदना सोनवणे यांनी तर आभार ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने यांनी मानले .या वेळी इगतपुरी तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा, मोठया संख्येने उपस्थित होत्या.

तामिळनाडूवर ‘गज’ चक्रीवादळाचं संकट ; सहा जणांचा मृत्यू

0

चेन्नई – ‘तितली’ चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे ‘गज’ हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. गज चक्रीवादळामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कुड्डालोरमध्ये दोन आणि थंजावूरमध्ये चार चणांचा मृत्यू झाला आहे.

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तमिळनाडूमधील नागपट्टणमजवळ किनाऱ्याला धडकले. ताशी ८० ते ९० किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे आणि तुफान पावसामुळे किनाऱ्याजवळच्या भागात काहीशी पडझड झाली आहे. पुढील २४ तासांत गज चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

भारतीय नौदल आणि तीस हजार सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. किनारपट्टी भागातील ७६ हजार २९० लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती तामिळनाडू सरकारच्या वतीने देण्यात आली.

तामिळनाडू सरकारने गुरुवार आणि शुक्रवारी किनारपट्टीलागतच्या सात जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. स्थानिक विद्यापीठांनी दोन दिवसांच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलले. गुरुवारी संध्याकाळी सहा ते शुक्रवारी सकाळी सहापर्यंत किनारपट्टी लगतच्या रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली.

पुणे हवान विभागाच्या अंदाजानुसार, गज या चक्रिवादाळामुळे महाराष्ट्राच्य़ा काही भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडू शकेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

वाडीवऱ्हेत पन्नास हजारांची घरफोडी

0

वाडीवऱ्हे (वार्ताहर) | वाडीवऱ्हे गावात अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून पन्नास हजाराचा मुद्देमाल लुटून नेला. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.

वाडीवऱ्हे ग्रामसचिवालय परिसरात भारत गॅस वितरण समोर दशरथ कचरू कातोरे यांच्या चाळीत सुदाम कचरू चव्हाण हे कुंटूबासह भाडेतत्वावर राहतात.

चव्हाण कुटुंबीय दिवाळीच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. याचाच डाव साधत चोरट्यांनी घरात शिरून दहा हजार रुपये किंमतीचे कर्णफुलाचे वेल, एक मोबाईल व घरातील ३५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेले.

याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देवीदास फड करत आहेत.

पैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘

0

मुंबई :  मायानगरी मुंबईमध्ये पैसा कमावण्यासाठी कुणावर काय वेळ येईल ते सांगता यायचं नाही. मुंबईमध्ये पैसा कमावण्यासाठीही एखाद्या जित्याजागत्या माणसाला पुतळा व्हावं लागत असेल तर? होय, असाच एक काऊबॉयचा पुतळा  मुंबईमध्ये कुठेही नजरेस बघायला मिळेल.

उत्तर प्रदेशातून आलेला गिरीजेश हा तरुण तेच करतो. काऊबॉयसारखी वेशभूषा करून तो संध्याकाळी तो मुंबईतल्या कुठल्याही प्रसिद्ध ठिकाणी पुतळ्यासारखा उभा राहतो. लोक त्याला पाहून थबकतात, त्याच्याभोवती कुतुहलानं गर्दी करू लागतात. त्याच्याबरोबर फोटो काढतात, सेल्फी काढून घेतात. तो कुणाला ‘नाही’ म्हणत नाही. साधारण चार-पाच तासांत त्याच्या डब्यामध्ये दीड-दोन हजार रुपये जमा झालेले असतात.

हिरो होण्याचं स्वप्न घेऊन गिरीजेश एक वर्षापूर्वी मुंबईत दाखल झाला. ठिकठिकाणी ऑडिशन्स देऊ लागला. पण हे वाटतं तितकं सोपं नाही हे त्याला कळून चुकलं. सेटवर कॅमेरा अटेंडंट म्हणून काम करायला त्यानं सुरुवात केली. दिवसाचे १२-१४ तास काम केल्यावर हातात जेमतेम आठशे-हजार रुपये पडायचे. शेवटी हे काम सोडून दिलं. काहीतरी वेगळं करायचं हे त्याच्या डोक्यात होतं.

परदेशात काही लोक रस्त्यांवर पुतळे म्हणून उभे राहतात आणि पैसा कमावतात हे त्यानं युट्यूबवर पाहिलं. त्यातून हे करण्याची कल्पना त्याला सुचली. चार हजार रुपये खर्च करून त्यानं काऊबॉयचे कपडे, हॅट, बूट वगैरे खरेदी केले. गेल्या महिनाभरापासून तो ती वेशभूषा करून मुंबईतल्या एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जाऊन पुतळ्यासारखा उभा राहतो. लोक उत्सुकतेनं त्याच्याकडे पाहतात, त्याला हात लावून पाहतात, सेल्फी काढतात.

आतापर्यंत गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, गिरगाव चौपाटी, जुहू समुद्रकिनारा, आझाद मैदान, विरारचा अर्नाळा समुद्रकिनारा, जीवदानी मंदिर ही ठिकाणं त्यानं पालथी घातली आहेत.

जोगेश्वरीला भाड्याच्या खोलीत राहणारा गिरीजेश दुपारच्या वेळी बॅगमध्ये कपडे, सगळं साहित्य घेऊन निघतो. त्या ठिकाणी पोहोचल्यावर वेशभूषा करून तो उभा राहतो. थोड्या-थोड्या वेळानं पोझ बदलत तो उभा राहतो. जाता-येता लोक त्याच्याकडे पाहतात आणि थबकतात. हळूहळू उत्सुकतेनं त्याच्या जवळ येतात, फोटो काढून घेतात. रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत जमा झालेले पैसे घेऊन तो घरी जायला निघतो.

‘अभिनेता होणं हे माझं खरं स्वप्न आहे. माझ्या कुटुंबियांना मी जे करतो ते आवडत नाही. पण यातून थोडे पैसे मिळतात, ज्यामुळे माझा खर्चाचा प्रश्न सुटतो.’
-गिरीजेश

शबरीमलाः तृप्ती देसाई यांना केरळमध्ये विमानतळावरच रोखले!

0

तिरुअनंतपुरमः शनिशिंगणापुरातील शनि चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई आता शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासाठी सरसावल्या आहेत. काही महिला कार्यकर्त्यांसह त्या केरळमध्ये दाखल झाल्या आहेत. मात्र, त्यांना विमानतळावरच रोखण्यात आलं आहे.

शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी भुमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई या केरळमध्ये पोहोचल्या आहेत. मात्र, येथील विमानतळावर आगमन होताच त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. महिलांच्या प्रवेशास विरोध करणाऱ्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केल्याने तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच थांबावे लागलेय. आता त्या विमानतळावरुन कधी बाहेर पडणार आणि त्या मंदिरात प्रवेश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तृप्ती देसाई आज पहाटे पुण्याहून आपल्या सात महिला कार्यकर्त्यांसह कोची येथे दाखल झाल्या. आंदोलकांनी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करू नये, असे आवाहन देसाई यांनी केलं. ‘माझ्या जिवाला धोका आहे. गेल्या दोन दिवसांपासून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. केरळ सरकार आम्हाला कशा प्रकारे संरक्षण पुरवतं, यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितलं. केरळ सरकारकडून कोणतेही संरक्षण मिळाले नाही, तरी आम्ही पुढे जाणार आहोत, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

‘प्रादेशिक परिवहन’ला ३८ कोटी महसूल

0
नाशिक| प्रतिनिधी  दसरा व दिवाळी सणांमुळे नाशिक प्रादेशिक कार्यालयावर लक्ष्मीकृपा झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ६४९१ दुचाकी तर १ हजार ३०० चारचाकी वाहनांची विक्री झाली. त्यातून १८ कोटींचा महसूल जमा झाला आहे. ऑक्टोंबर महिन्यात ३१०० दुचाकी तर १३७० चारचाकी वाहनांची विक्री होऊन त्यातून १८. ५० कोटींचा महसूल मिळाला. वाहनधारकांना आवडत्या आकर्षक क्रमांकातून ९१ लाखांचा महसूल मिळाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली.
जीवनशैली गतिमान झाली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे प्रत्येकाची अपेक्षित कामे नियोजित वेळेत होत आहेत. गणेशोत्सव, दसरा व दिवाळी या सणांमुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. साडेतीन मुहूर्तांपैकी दिवाळीत येणारा एक मुहूर्त व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुटुंबियांकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन असलेच पाहिजे, असा आग्रह अनेकांचा असतो. त्यामुळे वाहन खरेदी करण्यासाठी दुचाकी व चारचाकी शोरुममध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अनेकांंनी दसरा व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाहन मिळावे, यासाठी जादा रक्कमही मोजली.
अहिरे म्हणाले, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे एप्रिल ते ऑक्टोबर २०१८ या सात महिन्यात दुचाकी आणि चारचाकी मिळून सुमारे ४९ हजार ६०० नवीन वाहनांची नोंद झाली आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात १२,२६१ नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. या नोंदीतून परिवहन कार्यालयाला ३६ कोटी ९९लाख रुपये महसूल मिळाला आहे.
दसरा आणि दिवाळी सणादरम्यान सप्टेंबर महिन्यात व ऑक्टोबर महिन्यात १२,२६१ इतक्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री झाली आहे. वाहनविक्रीतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला ३६ कोटी ९९ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. १ लाख ५० हजार रुपयांच्या चॉइस क्रमांकाची मागणी सात वाहनधारकांनी केली होती. तर ७० हजार रुपयांच्या चॉइस क्रमांकाची मागणी ८ वाहनधारकांनी केली. ५० हजार रुपयांच्या चॉइस क्रमांकाची मागणी ३४ वाहनधारकांनी केली.
आवडत्या क्रमांकातून ९१ लाख
एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात सुमारे ४ हजार २०० वाहनधारकांनी आकर्षक क्रमांकाची मागणी केली. त्यातून ङ्गआरटीओफला ३ कोटी ११ लाखांचा महसूल जमा झाला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर २०१८ महिन्यात सुमारे १ हजार २२६ नवीन वाहनधारकांनी चॉइस क्रमांक घेतले. त्यातून परिवहन कार्यालयास ९१ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

पूर्व भागातील शेतकर्‍यांचा मंगळवारी वावीत रास्तारोको

0
सिन्नर |वार्ताहर  संपूर्ण तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती असून शासनाकडून अत्यावश्यक उपाययोजनांसह पिण्याचे पुरेसे पाणी व जनावरांसाठी चार्‍याची व्यवस्था करण्यात आली नाही. दुष्काळ जाहीर करण्यापलीकडे शेतकर्‍यांना दिलासा देणारी कोणतीही कृती शासनाकडून केली जात नसून याचा निषेध करण्यासाठी येत्या मंगळवारी (दि.२०) सकाळी ११ वाजता वावी येथे शिर्डी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पूर्व भागातील शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे यांनी दिली.
शासनाने विशेष अधिसूचनेद्वारे सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी प्रशासनाकडे कोणतेही नियोजन नाही. शेतकरी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा मागणी करत असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यात शासकीय यंत्रणेला दुष्काळात जनतेला मदत करण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडला नसल्याचा आरोप करत डॉ. शिंदे यांनी शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचा आरोप केला आहे.
पूर्व भागात जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. टँकरद्वारे वाड्या -वस्त्यांवर तसेच गावांमध्ये टँकरद्वारे सुरु असलेला पाणीपुरवठा पुरेसा नाही. याबाबत वर्णावर मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येते. दुष्काळी परिस्थितीचे प्रशासनाला गांभीर्य नसल्यानेच शेतकरी अडचणीत सापडला आल्याकडे आहे.
मागणी करूनही जनावरांसाठी चारा पुरवला जात नाही परिणामी बहुसंख्य शेतकर्‍यांनी आपल्या पशुधनाला बाजार दाखवला आहे. भुकेने व्याकुळ होणारी जनावरे दारासमोर मेलेली बघण्यापेक्षा कसायाला विकलेली बरी या निर्णयाप्रत तालुक्यातील व विशेषकरून पूर्व भागातील शेतकरी आले असल्याचे डॉ. शिंदे यांचेसह पूर्व भागातील शेतकर्‍यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शेतकर्‍यांकडे असणार्‍या जनावरांच्या संख्येच्या प्रमाणात पाणी व चारा पुरवावा. शेतीत काम नसल्याने मजुरांची होणारी उपासमार थांबवावी व त्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा ही शेतकर्‍यांची प्रमुख मागणी आहे.
या मागण्यांची शासनाकडून न मागता पूर्तता होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नसल्याने शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. मंगळवारी करण्यात येणार्‍या आंदोलनात पूर्व भागातील शेतकरी आपली जनावरे घेऊन रस्त्यावर उतरणार असून यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनची राहील असा इशारा शेतकर्‍यांच्या वतीने डॉ. शिंदे यांनी दिला आहे.
तहसीलदार नितीन गवळी यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले असून यावेळी नितीन अत्रे, भास्कर कहांडळ, चांगदेव हलवर यावेळी उपस्थित होते.
…तोपर्यंत समृध्दीचे काम नको
भोजापूरचे पूरपाणी हा पूर्व भागातील शेतकर्‍यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक पावसाळ्यात भोजापूर धरण ओव्हर फ्लो होते. मात्र अनेक वर्षांपासून एकदाही हे पाणी दुशिंगवाडीच्या बंधार्‍यात पोहचले नाही. धरणातून निघणार्‍या पुरचारीद्वारे दुशिंगपूरचा बंधारा भरून घेण्याचे नियोजन असते. मात्र पाटबंधारे विभागाकडून हे पूरपाणी भलतीकडेच वळवले जाते.
या पाण्यावर पूर्व भागातील शेतकर्‍यांचा हक्क असताना सातत्याने अन्याय केला जात आहे. याशिवाय भोजापूरमधून फुलेनगरच्या बंधार्‍यासाठी ४.३९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित आहे. मात्र हे पाणी एकदाही फुलेनगरकरांना मिळाले नाही. गेल्या महिन्यात खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकारातून फुलेनगर व दुशिंगवाडीच्या बंधार्‍यात पाणी पोचायला येणारे अडथळे दूर करून पुरचारी खोल व आवश्यक तेथे रुंद करण्यात आली आहे.
त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत असणारी गरज ओळखून या दिनही बंधार्‍यात भोजापूर धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी डॉ. शिंदे व पूर्व भागातील शेतकर्‍यांनी केली आहे. याशिवाय अकोले तालुक्यातील निळवंडे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सिन्नरमधील कहांडळवाडी, दुशिंगवाडी, मलढोण , सायाळे, पाथरे, वारेगाव हि सहा गावे येतात.
मात्र वितरिकांचे काम रखडल्याने या गावांना अद्याप प्रकल्पाचा फायदा झालेला नाही. हि सर्व गावे शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणार्‍या समृद्धी महामार्गात येतात. निळवंडेच्या वितरिकांचे काम पूण होऊन पाण्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याखेरीज समृद्धी महामार्गाचे काम सुरु करू नयेत ही देखील या आंदोलनातील मागणी असणार आहे.

 

चणकापूरचे ‘आवर्तन’ आज सुटणार

0
मालेगाव-सटाणा | प्रतिनिधी  कसमादे भागात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईचे पार्श्‍वभूमीवर आज  (दि. १६) रोजी चणकापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज दिले. या आवर्तनामुळे मालेगाव-सटाण्यासह गिरणावरील लहान-मोठ्या योजनांना पाणी उपलब्ध होवून सटाण्यासह अनेक गावांवरील पाणीटंचाईचे संकट दूर होणार असल्याने जनतेस दिलासा मिळाला आहे.
चणकापूर धरणात आजमितीस २ हजार ३११ द.ल.घ.फुट (९५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. चणकापूरच्या पाण्यावर मालेगावसह सटाणा, देवळा, दाभाडी बारागाव, कळवण आदी शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. कसमादे भागातील लहान-मोठ्या तब्बल ५२ योजनांना गिरणाव्दारे होत असलेल्या आवर्तनामुळे पाणी उपलब्ध होत असते.
मालेगाव शहरास पाणीपुरवठा करणार्‍या तळवाडे साठवण तलावालगत शंभर एकर जागेवर दुसर्‍या तलावाची निर्मिती मनपातर्फे करण्यात आल्याने ८४ द.ल.घ.फुट पाणीसाठा आवर्तनाव्दारे करता येणे शक्य झाले आहे. तळवाडे साठवण तलावात ३० द.ल.घ.फुट पाणीसाठा शिल्लक मालेगाव शहराचा पाणीपुरवठा दिवसाआड सुरळीत सुरू आहे.
मात्र अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे दाभाडी बारागाव योजनेतील अनेक गावांना १३ ते १४ दिवसाआड होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली असल्याने या गावातील नागरीकांतर्फे डिसेंबरऐवजी नोव्हेंबर महिन्यातच चणकापूरचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी केली जात होती.
चणकापूर धरणातून गत तीन वर्षापासून शेती सिंचनासाठी डिसेंबर, जानेवारी दरम्यान एक आवर्तन सोडले जात आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठला असून अनेक पाझर तलाव व नाले कोरडे आहेत.
दाभाडीसह बारा गावांमध्ये १३ ते १४ दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तोही अपुर्ण वेळ होत असल्यामुळे पाणीटंचाईने ग्रामस्थ विशेषत: महिला अक्षरश: हवालदिल झाल्या होत्या. त्यामुळे सिंचन व पिण्यासाठी संयुक्त आवर्तन नोव्हेंबरमध्येच सोडावे, अशी मागणी येथे केली जात होती.
आजअखेर जिल्हाधिकार्‍यांनी पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत पाटबंधारे विभागास आदेश दिल्याने आज  सकाळी चणकापुरातून १ हजार क्युसेस पाणी गिरणा पात्रात सोडण्यास प्रारंभ होणार आहे. गिरणा नदीत सोडण्यात येणार्‍या आवर्तनाच्या पार्श्‍वभूमीवर नदीकाठावरील गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे आदेश संबंधित विभागास देण्यात आले आहेत.
सटाणावासियांची पाणीटंचाईतून मुक्तता
गेल्या काही दिवसांपासून एैन सणासुदीच्या काळात दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सनपातर्फे घेण्यात आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासियांना अक्षरश: भटकंती करण्याची वेळ आली होती. चणकापूरचे आवर्तन सुटण्याचे जाहिर झाल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.
दहा ते अकरा दिवसाआड तोही अपुर्णवेळ होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे सनपा कारभाराविरूध्द जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. हा रोष टँकरव्दारे प्रभागात पाणीपुरवठा करत नगरसेवकांतर्फे कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. दहा दिवसाआड होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे पाणी साठविण्यासाठी शहरवासियांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत होती. तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता डिसेंबरऐवजी नोव्हेंबर महिन्यातच चणकापूरचे आवर्तन सोडावे यास्तव आ. दिपीका चव्हाण, नगराध्यक्ष सुनिल मोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत साकडे घातले होते.
दरम्यान, आज (दि. १६) चणकापूर धरणातून ४०० द.ल.घ.फुट पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिल्यामुळे लखमापूर, ठेंगोडा, सटाणा, देवळा परिसरातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना तसेच कळवण तालुक्यातील इतर पाणीपुरवठा योजनांना दि. १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत चणकापूर धरणातून सोडण्यात येणार्‍या आवर्तनामुळे दिलासा मिळणार आहे.
शहरात सनपातर्फे दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. या आवर्तनामुळे येत्या १९ नोव्हेंबरपासून एक दिवासआड पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार असल्याचे मत नगराध्यक्ष मोरे यांनी व्यक्त केले.

Social Media

26,850FansLike
5,154FollowersFollow
1,347SubscribersSubscribe
error: Content is protected !!